Home » काशीमध्ये कालभैरवाला पहिला मान का दिला जातो ?

काशीमध्ये कालभैरवाला पहिला मान का दिला जातो ?

by Team Gajawaja
0 comment
Kalabhairava
Share

उत्तरप्रदेशमधील काशी हे शहर तमाम भारतीयांसाठी आस्थेचे प्रमुख स्थान आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी प्रमुख असलेले काशी विश्वनाथ मंदिर अनादी काळापासून आहे. काशीमध्ये भगवान शिव आणि माता पार्वती यांचे वास्तव्य असल्याचे मानले जाते. बाबा भोलेनाथ म्हणून अवघ्या काशीभर भगवान शंकाराचा जप सुरु असतो. पण या बाबा भोलेंची नगरी असलेल्या काशीमध्ये आलेले भक्त भगवान शंकराच्या आधी काशीच्या कोतवालाची पूजा करतात.  काशीचे कोतवाल म्हणून काशीमध्ये कालभैरवाला (Kalabhairava) मान देण्यात येतो. काशीमध्ये यावरुन एक म्हण आहे, आधी काशी कोतवालची पूजा करा आणि मग अन्य पूजा करा… काशीमध्ये काशीके कोतवाल, अशीच कालभैरवाची ओळख आहे.  बाबा कालभैरवाची पूजा कोणतेही धार्मिक कार्य करायचे असेल तर येथे प्रथम केली जाते.  यामागे मोठी धार्मिक मान्यता आहे.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले काशी विश्वनाथ मंदिर भगवान शंकराचे सर्वात आवडते स्थान म्हणून गौरवलेले आहे.  या काशी नगरीमध्ये भगवान शंकर माता पार्वतीसह वास्तव्यास असल्याची धारणा भक्तांमध्ये आहे.  भगवान शंकर हे काशीचे राजा म्हणून ओळखले जातात. या काशीच्या राजाचे रक्षक म्हणजेच कोतवाल म्हणून बाबा काल भैरव यांची ओळख आहे.  बाबा भोले यांची आवडती नगरी असलेल्या काशीमध्ये कालभैरवाची इच्छा चालते, असे म्हणतात. काशी नगरीमध्ये कालभैरवाची (Kalabhairava) इच्छा नसेल तर कुठलेही कार्य होऊ शकत नाही.  त्यासाठी प्रथम या काशीच्या कोतवालाची पूजा करण्यात येते, आणि त्याची परवानगी घेण्यात येते.  काशीमध्ये बाबा विश्वनाथाच्या मंदिराजवळ एक पोलीस ठाणे देखील आहे.  या पोलीस ठाण्याचे रक्षणही स्वतः कालभैरव करतात, असा भक्तांचा विश्वास आहे. अत्यंत जागृत स्थान म्हणून मान्यता असलेल्या कालभैरव मंदिराचा उल्लेख  महाभारत आणि उपनिषदांमध्येही आहे.

कालभैरव म्हणजे कोण, हा प्रश्न अनेकांना पडतो.  तसेच त्यांना काशीचा कोतवाल म्हणून कोणी नेमले असेही विचारले जाते.  यासाठी काशीमध्ये पौराणिक कथा सांगितली जाते. त्यानुसार एकदा भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू यांच्यात कोण मोठं आहे, यावर चर्चा झाली.  ही चर्चा पुढे वादात रुपांतरीत झाली. यावेळी ब्रह्मदेवाच्या पाचव्या मुखाने भगवान शंकरावर टीका केली.  ही टीका ऐकून भगवान शंकराला संताप आला.  त्याच रागातून भगवान शंकराचा एक भाग कालभैरवाच्या रूपात प्रकट झाला.  या कालभैरवानं (Kalabhairava) शंकरावर टीका करणाऱ्या ब्रह्माजींचे पाचवे मुख आपल्या नखांनी कापले.  कालभैरवाने ब्रह्माजींचा पाचवा चेहरा कापला पण तो चेहरा कालभैरवाच्या हातातून वेगळा झाला नाही. यावेळी भगवान शंकर कालभैरवाच्या भेटीस आले. 

त्यांनी  कालभैरवाला ब्रह्मदेवाच्या हत्येचा दोष दूर करण्यासाठी सामान्य माणसाप्रमाणे तिन्ही जगांत फिरण्याचा आदेश दिला.  हे करतांना ज्या ठिकाणी ब्रह्मदेवाचे पाचवे मुख कालभैरवाच्या हातापासून मुक्त होईल, तिथे कालभैरवाला त्याच्या हत्येच्या पापापासून मुक्ती मिळेल असे सांगितले.  भगवान शंकराची आज्ञा मिळताच बाबा भैरवानं तिन्ही जगाचा पायी प्रवास केला.  काल भैरव बाबा तिन्ही लोकांची यात्रा करुन काशी नगरीत पोहोचले.   काल भैरवबाबा काशी नगरीमध्ये गंगेच्या तीरावर पोहोचताच ब्रह्माजींचे मस्तक त्यांच्या हातातून वेगळे झाले. कालभैरव त्यांच्या पापांपासून मुक्त होताच, भगवान शंकर प्रकट झाले. त्यांनी कालभैरवांना याच काशी नगरीमध्ये राहण्याची आणि तपश्चर्या करण्याची आज्ञा दिली.  त्यानंतर कालभैरव या नगरीत स्थायिक झाले, आणि काशी नगरीचे रक्षण करु लागले. कालभैरव काशी नगरीत आल्यानंतरच भगवान शंकरही माता पार्वतीसह या नगरीमध्ये वास्तव्यास आले.  

============

हे देखील वाचा : दिवसभरात तीन रुपात दर्शन देणारी ‘ही’ माता !

============

प्रत्यक्ष भगवान शंकरानं कालभैरवांना काशीचे रक्षक म्हणजेच कोतवाल केल्यानं आधी कालभैरवाची पूजा करण्याची प्रथा सुरु झाली.  ज्याने काशीमध्ये कालभैरव (Kalabhairava) पूजले नाहीत त्याला बाबा विश्वनाथाची पूजा केल्याचे फळ मिळत नाही, असेही म्हटले जाते.  काशीमध्ये प्रत्यक्ष यमराज देखील कालभैरवाच्या संमतीशिवाय कोणाचेही प्राण घेऊ शकत नाहीत, असे सांगतात. कालभैरवांच्या मंदिरात रविवारी आणि मंगळवारी भाविकांची मोठी गर्दी होते.  या दोनवेळी कालभैरवांची मोठी आरती होते. यावेळी ढोल, घंटा आणि डमरू यांचा आवाज भाविकांना गुंग करुन जातो.  गेली अनेक वर्ष ही परंपरा चालू आहे.  बाबा शंकरांची जो रक्षा करतो, तो आपली का नाही करणार, असा विश्वास ठेवत भक्त या कालभैरवांच्या चरणी, म्हणजे काशीचे कोतवालाच्या चरणी लीन होतात.  

सई बने  


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.