भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्लीमधील शानदार परेडसाठी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भारताच्या 1950 मध्ये झालेल्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुकर्णो उपस्थित होते. आता यावर्षीही इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुबियांतो भारतात आल्यानं भारत आणि इंडोनेशियामधील मैत्री अधिक दृढ झाली आहे. याच इंडोनेशियाची नवी राजधानी सध्या चर्चेत आहे. जकार्ता ही इंडोनेशियाची राजधानी काही वर्षांनी समुद्राच्या पोटात सामावून जाण्याची भीती आहे. त्यामुळे इंडोनेशियानं नुसंतारा नावाची नवी राजधानी तयार करण्यास घेतली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत तयार होणा-या या नगरीचे काम 65 टक्के पूर्ण झाले आहे. येथे सरकारी कामकाजासाठी इमारती उभारण्यात आल्या असून मोठ्या प्रमाणात होणा-या नागरी वस्तीसाठी घरे बांधण्यात येत आहेत. जानेवारी 2022 मध्ये इंडोनेशियानं जकार्ती येथून राजधानीचे ठिकाण हलवण्याचे नक्की केले आणि नुसंतारा बेटाला राजधानीचा दर्जा दिला. (Indonesia)
आता हे नुसंतारा शहर इंडोनेशियन सरकारच्या कल्पनेनुसार राजधानीसारखे तयार होत आहे. या सर्वात भारत सरकारंनही इंडोनेशियाला मोठी मदत केली आहे. जगातील काही मोजक्या देशांनी आपली राजधानी अन्य शहरात हलवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामध्ये इंडोनेशियाचा समावेश आहे. जानेवारी 2022 मध्ये इंडोनेशियानं नुसंतारा नावाचे नवे राजधानीचे शहर तयार करायला सुरुवात केली आहे. 1945 मध्ये स्वतंत्र झालेल्या इंडोनेशियाची राजधानी जकार्ता होती. मात्र जकार्तासमोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे, वाहतूक कोंडी. शिवाय जल प्रदूषणाच्या मोठ्या समस्येला जकार्ता शहर तोंड देत आहे. नागरिकांना श्वास घेण्यासही त्रास होईल, इथपर्यंत येथे प्रदूषण वाढले आहे. नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. याचा लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. त्याचबरोबर समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यामुळे पुराची समस्याही वाढली आहे. येथील बहुतांशी भागात सततच्या पुरामुळे अनेक घरे दलदलीमध्ये अडकल्यासारखी झाली आहेत. (International News)
त्यामुळे 2019 मध्ये इंडोनेशियन सरकारनं अन्य शहरात राजधानी हलवण्याचा निर्णय घेतला. जकार्तामध्ये 1 कोटीहून अधिक लोकसंख्या आहे. जगातील सर्वात दाट लोकवस्ती असलेल्या शहरांमध्ये जकार्ताचा समावेश होतो. अशाप्रसंगी राजधानीही तेथेच असल्यामुळे ही लोकसंख्या अधिक वाढत चालली होती. त्यासोबत या बेटावर पावसाळ्यात सुमद्राच्या पाण्याची पातळी अधिक होत होती. या सर्वात अनेक सरकारी कार्यालयातही पाणी साठत होते. या सर्वांचा सरकारी कामकाजावर परिणाम होत होता. त्यामुळेच आता नुसंतारा नावाची नवीन राजधानी करण्यास येत आहे. या नावाचा अर्थ द्वीपकल्प असा होतो. हा भाग पूर्व कालीमंतन प्रदेशातील बोर्नियो बेटावर आहे. नुसंताराचे एकूण क्षेत्रफळ अंदाजे अडीच लाख हेक्टर आहे. नवीन राजधानीचे बांधकाम हे सरकारच्या ‘गोल्डन इंडोनेशिया 2045’ नावाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा एक भाग आहे. या नवीन राजधानीच्या बांधकामासाठी $35 अब्ज खर्च येणार आहे. यात इंडोनेशियन सरकारची गुंतवणूक 19 टक्के असेल. उर्वरित पैसे देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून उभारण्यात येत असून हा प्रकल्प पाच टप्प्यात पूर्ण केला जाणार आहे. (Indonesia)
===============
हे देखील वाचा : Prayagraj : मस्क्युलर बाबा आणि एमटेक बाबा
Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !
===============
संपूर्ण इंडोनेशियातील सुमारे दोन लाख कामगार बांधकाम या नव्या राजधानीच्या बांधकामात व्यस्त आहेत. या नुसंतारा राजधानीत राष्ट्रपतींचे निवासस्थान, प्रमुख सरकारी इमारती, प्रशासकीय कार्यालये, रुग्णालये आणि राजधानीत काम करणाऱ्या लोकांसाठी निवासी इमारती उभारण्यात आल्या आहेत. याशिवाय विमानतळ आणि मोठे रस्तेही बांधण्यात आले आहेत. या नव्या राजधानीमध्ये टप्प्याटप्यानं नागरिकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. 2045 मध्ये या नव्या राजधानीत 20 लाख इंडोनेशियन नागरिक राहू लागतील. जागतिक व्यापाराचे केंद्र होण्यासाठीही नुसंतारा राजधानीमध्ये भव्य प्रकल्प उभारण्यात येत आहेत. नुसंतारा या राजधानीच्या आसपास पर्यावरणाची खास काळजी घेण्यात येत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात शेती होते. या शेतजमिनीचे नुकसान न होऊ देता बांधकाम कऱण्यात येत आहे. शिवाय नव्यानं येथे वृक्षसंपदा लावण्यात येत आहे. या राजधानीच्या उभारणीसाठी इंडोनेशिया अन्य देशांकडेही मदत मागत आहे. भारतानेही इंडोनेशियाचा प्राचीन इतिहास जाणून नव्या शहराच्या विकासासाठी आर्थिक मदत केली आहे. (International News)
सई बने