महाराष्ट्राचे प्रमुख सत्ताकेंद्र हे वर्षा निवासस्थान आहे असे म्हटल्याल वावगे ठरू नये. देशातल्या सर्वात श्रीमंत राज्याचे प्रमुख याच ठिकाणी राहतात. आणि विधीमंडळात आमदार म्हणून निवडून आलेल्या प्रत्येकाला या बंगल्याचे स्वप्न पडत असणार. पण एक वेळ होती मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवास्थान हे वर्षा नव्हतं. मग वर्षा मुख्यमंत्र्याचे निवासस्थान कधी झाले? वर्षापूर्वी मुख्यमंत्री कुठे रहायचे आणि या बंगल्याचे नाव वर्षा कसे पडले? जाणून घेऊया आजच्या या लेखातून. (Varsha Residence)
प्रकाश अकोलकर यांनी २०१० साली मुंबई ऑन सेल हे पुस्तक लिहलंय. यात नजर लागी राजा, तोरी बंगले पे या प्रकरणात वर्षा बंगल्याचा संपूर्ण इतिहास मांडला आहे. अकोलकर म्हणतात की हा बंगला पूर्वी खासगी मालकीचा होता. या बंगल्याचे नाव होतं ड्युनवेगन. पुढे १९१२ साली सरकारने हा बंगला ताब्यात घेतला. हा बंगला १.८७ एकरवर पसरलाय. ब्रिटिश सरकारने तेव्हा हा बंगला १ लाख ६२ हजार ३८८ रुपयांना विकला गेला. १९१२ म्हणजेच ११४ वर्षांपूर्वी १ लाख म्हणजे आता किती? तर तेव्हा एक तोळा सोनं १८ रुपये ९३ पैसे इतके होतं. करा हिशोब आणि सांगा उत्तर. तर वर्षा बंगल्यापूर्वी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान होते सह्याद्री. तेव्हा मुंबई प्रांताचे असलेले मुख्यमंत्री मोरारजी देसाई हे सह्याद्रीमध्येच राहत. पुढे मुंबई प्रांत आणि द्वैभाषिक असलेल्या राज्याचे मुख्यमंत्रिपद यशवंतराव चव्हाण यांच्याकडे गेले. तेव्हा ते ही मुख्यमंत्री म्हणून सह्याद्री मध्येच राहिल. अगदी १९६० साली संयुक्त महाराष्ट्र झाला आणि चव्हाण नवीन राज्याचे मुख्यमंत्री झाले तरी ते सह्याद्रीमध्येच राहिले. (Varsha Residence)
१९६२ साली चीनने आक्रमण केले आणि यशवंतराव चव्हाण दिल्लीत संरक्षणमंत्री म्हणून गेले. तेव्हा राज्याची धुरा मारोतराव कन्नमवार यांच्याकडे आली. दीड वर्ष मुख्यमंत्री राहिलेले कन्नमवार सह्याद्रीतच राहिले. पण त्यांचं अकस्मात निधन झालं आणि वसंतराव नाईक यांच्याकडे राज्याची सुत्रे आली. वसंतराव नाईक आधी कृषी मंत्री आणि महसूल मंत्री होते. आणि त्यांचे निवासस्थान होते वर्षा बंगला. नाईकांनी सह्याद्रीवर राहण्याऐवजी वर्षामध्येच राहणे पसंत केलं. त्याचं एक कारण होतं. सह्याद्री बंगल्यावर माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमावर यांचं भुत होतं अशी अफवा पसरली होती. त्यामुळे नाईक सह्याद्रीवर रहायला गेले नाही असे सांगिलते जाते. पण ही अफवा कोणी पसरवली? तर ही अफवा आचार्य अत्रे यांनी पसरवली असे सांगितले जाते. अत्रे कन्नमवारांच्या मागे हात धुवून लागले होते म्हणून अत्रेंनी अशी अफवा पसरवली असे सांगितले जाते.
वसंतराव नाईक यांनी १२ वर्षे राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. त्यानंतर वर्षा हे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान हे म्हणून शिक्कामोर्तब झाले. १९७५ साली जेव्हा आणिबाणी लागली तेव्हा वसंतराव नाईक मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले आणि शंकरराव मुख्यमंत्री झाले. पण शंकरराव वर्षामध्ये न जाता सह्याद्रीत राहिले. मुख्यमंत्री असून वर्षात न राहिलेले चव्हाण हे अपवाद. पुढे आणिबाणीनंतर शंकरराव चव्हाण यांचे मुख्यमंत्रिपद गेले. आणि वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा वर्षात जाण्याचाही एक किस्सा आहे. अकोलकर आपल्या पुस्तकात म्हणतात की काही आमदार वसंतदादा पाटील यांना त्यांच्या माहिमच्या घरी भेटायला गेले. (Varsha Residence)
====================
हे देखील वाचा : महायुतीची फाईव्ह स्टार खेळी !
====================
तेव्हा आमदार त्यांना म्हणाले की वर्षावरचं वास्तव्य राज्याच्या कारभाऱ्याला चांगलंच लाभतं, म्हणे ! कारण नाईकांनी तेथून बारा वर्षे राज्याचा गाडा हाकला होता. त्यामुळे दादांनी सह्याद्रीच्या भानगडीत न पडता वर्षावरच मुक्काम हलवावा असं या आमदारांचं म्हणणं होतं. दादांनी वर्षावर आपलं बस्तान हलवलं पण त्यांनाही सलग पाच वर्ष इथून राज्यकारभार हाकता आला नाही. या बंगल्याचं नाव वर्षा का पडलं याची एक अफवा होती. वसंतराव नाईक यांना एक मुलगी होती. या मुलीने आत्महत्या केली आणि नाशिकजवळच्या देवळाली रेल्वेस्थानकाजवळ तिचा मृतदेह आढळला होता. तिच्या नावावरूनच नाईकांनी या बंगल्याचे नाव वर्षा ठेवले असे सांगितले जात होते. पण त्यांच्या मुलीचे नाव अरुंधती होते. त्यामुळे ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. पण या बंगल्याचे नाव वर्षा का ठेवले हे अजून कळालेलेच नाही.
वर्षावर सलग पाच वर्ष राहण्याचा नशीब दोघांनाच लाभलं, पहिले वसंतराव नाईक आणि दुसरे देवेंद्र फडणवीस. फडणवीसांनी २०१४ ते २०१९ अशी पाच वर्ष वर्षावर घालवली. २०१९ च्या निवडणुकीत युतीला बहुमतही मिळालं. पण शिवसेनेसोबत भाजपचं फिस्कटलं. तेव्हा अजित पवारांसोबत पहाटे शपथ घेत तीन दिवसांसाठी फडणवीस या घरात होते. पुढे २०२२ साली एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. आणि फडणवीसांच्याच पाठिंब्यावर ते वर्षावर रहायला आले. (Varsha Residence)