Home » केदार शिंदे शाहीर साबळेंसोबतचं नातं का लपवतात?

केदार शिंदे शाहीर साबळेंसोबतचं नातं का लपवतात?

by Team Gajawaja
0 comment
Kedar Shinde
Share

सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी आपल्या चित्रपटांनी लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. विविध विषय, विविध जॉनर हाताळत त्यांनी त्यांच्या सिनेमातून तसेच ‘सही रे सही’ यांसारख्या नाटकांतून प्रेक्षकांना कायम आनंद पुरवण्याचं काम केलं. अभिनेते भरत जाधव आणि ते अगदी जीवाभावाचे मित्र. दोघांनी मिळून अनेक अजरामर कलाकृतींची निर्मिती केली. केदार शिंदे (Kedar Shinde) यांना कलेचा वारसा त्यांच्या घरातूनच लाभला. पद्मश्री शाहीर साबळे हे केदार शिंदे यांचे आजोबा. आजोबाच शाहीर असल्यामुळे घरात कलेसाठीचं अनुकूल वातावरण केदार शिंदे (Kedar Shinde) यांना लाभलं. परंतु केदार शिंदेंच्या आयुष्यात अशी एक घटना घडली होती की, त्या घटनेनंतर केदार शिंदेंनी शाहीर साबळे हे माझे आजोबा आहेत हे सांगण सोडून दिलं होतं.

सुरुवातीच्या दिवसात केदार शिंदे(Kedar Shinde), भरत जाधव आणि त्यांची कलाकार मित्रमंडळी गणपतीच्या दिवसांमध्ये मुंबईच्या परळ भागात छोटे छोटे स्कीट करत असायचे. त्यामधून त्यांना थोडेफार पैसे मिळायचे. एकदा असेच त्यांनी हा कार्यक्रम पार पडला आणि त्यातून त्यांना थोडेफार पैसे देखील मिळाले. ते पैसे घेऊन सगळेजण रस्त्याच्या एका बाजूला जमले आणि केदार शिंदे सगळ्यांना पैशातील त्यांचा हिस्सा द्यायला लागले.

त्याचं ते पैसे वाटण सुरु होत तेवढ्यात पोलिसांची एक गाडी तिथे आली. त्यांनी त्या मुलांना आणि त्यांच्या त्या पैसे वाटणाऱ्या म्होरक्याला बघितलं आणि ते त्यांच्याकडे विचारपुस करायला आले. सगळे मुलं घाबरले, पण केदार शिंदे (Kedar Shinde) मात्र आत्मविश्वासाने पुढे सरसावले. पोलीसांनी हे रस्त्यात काय चालवलंय म्हणून विचारलं तेव्हा केदार शिंदे यांनी मी शाहीर साबळे यांचा नातू आहे असं प्रतिउत्तर पोलिसांना दिलं. याचा पोलिसांना राग आला त्यांनी त्यांना दमटवून सांगितलं, शाहीरांनी तुला असं पैसे वाटायला सांगितलं आहे का मग ?

पोलिसांच्या या उत्तरानंतर केदार शिंदे (Kedar Shinde) यांना भयंकर वाईट वाटलं. आपल्या फायद्यासाठी आपण आपल्या आजोबांचं नाव घेतलं आणि त्यांच्या नावाला आपल्यामुळे अशाप्रकारे अपमानित व्हावं लागलं, याचं त्यांना भयंकर दुःख वाटलं. आयुष्यात यानंतर परत स्वतःसाठी आपल्या आजोबाच्या नावाचा कधीच वापर करायचा नाही असा त्यांनी निश्चय केला. तेव्हापासून केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी शाहीर साबळे हे माझे आजोबा आहेत ही ओळख कधीच सांगितली नाही. स्वतःच्या मेहनतीने त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवला.

केदार शिंदे (Kedar Shinde) यांचा जन्म १६ जानेवारी १९७३ रोजी मुंबई येथे झाला. शिंदे यांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले. त्यांची मावशी – चारुशीला साबळे ही एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. शिंदे यांचे १९९६ मध्ये बेला शिंदे यांच्याशी लग्न झाले. या जोडप्याला सना शिंदे ही मुलगी आहे. त्यांनी महाराष्ट्राची लोकधारा (महाराष्ट्रातील लोकनृत्ये) सह आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. महाराष्ट्राची लोकधारा शाहीर साबळे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्रातील सर्व स्थानिक नृत्य प्रकारांचे प्रदर्शन करणारी मंडळी म्हणून संपूर्ण भारतभर प्रसिद्ध होती.

=======

हे देखील वाचा : ‘या’ दोन्ही सभागृतील कार्पेटचा रंग वेगळा का असतो?

=======

केदार शिंदे (Kedar Shinde) यांची मराठी चित्रपटसृष्टीतील एक यशस्वी लेखक, दिग्दर्शक, निर्माते म्हणून गणना केली जाते. ‘सही रे सही’ या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीवर अक्षरशः धुमाकूळ घातला. भरत जाधव अभिनीत हे नाटक जवळपास वीस वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून रंगमंचावर अधिराज्य गाजवत आहे. त्यांनी पडद्यावर साकारलेल्या जत्रा, अग बाई अरेच्चा, गलगले निघाले, यंदा कर्तव्य आहे, बकुळा नामदेव घोटाळे ह्या आणि यांसारख्या कित्येक कलाकृती अजरामर झालेल्या आहेत. अभिनेते भरत जाधव यांच्यासोबत त्यांनी कित्येक दर्जेदार कलाकृती साकारल्या आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.