Home » BJP-Congress : भाजप सर्वशक्तिशाली तरीही काँग्रेस नेते का हवेत?

BJP-Congress : भाजप सर्वशक्तिशाली तरीही काँग्रेस नेते का हवेत?

by Team Gajawaja
0 comment
BJP-Congress | Marathi News
Share

राज्यात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर एक गोष्ट स्पष्ट झाली. महाराष्ट्रात भाजप हाच एक नंबरचा पक्ष असेल यावर शिक्कामोर्तब झाला. त्यामुळे भाजपचा केवळ मुख्यमंत्रीच झाला नाही तर महाराष्ट्रात प्रत्येक विभागात अत्यंत ताकदीने उभा असलेला पक्ष म्हणून भाजप पुढे आला. त्यामुळे सत्तेत आता फक्त भाजपचं असेल असं चित्र आहे. म्हणायला जरी भाजपाला दोन मित्र पक्ष असले तरी भाजपपेक्षा त्या मित्रपक्षांनाच भाजपाची जास्त गरज आहे. मात्र अलीकडे भाजपच्या राजकारणाचा एक वेगळाच पॅटर्न पाहायला मिळत आहे. कारण पक्षाची एवढी मोठी ताकद असतानाही पक्षात जवळपास प्रत्येक महिन्याला मोठे पक्षप्रवेश होत आहेत. यामध्येही काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या वाढतच चालली आहे.

संग्राम थोपटे, संजय जगताप, कुणाल पाटील, जयश्री पाटील, कैलास गोरंट्याल अशी लांबसडक यादी आहे. यातील संग्राम थोपटे, कुणाला पाटील, जयश्री पाटील ही नावं तर अशी आहेत की ज्यांच्या दोन ते तीन पिढ्या या काँग्रेसशी एकनिष्ठ होत्या. मात्र एका निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी आता भाजपाची वाट धरली आहे. त्यामुळे नेमकं भाजप या नेत्यांना का जवळ करत आहे. नेमक्या कोणत्या स्ट्रॅटेजीच्या जीवावर या नेत्यांचे पक्षप्रवेश घेतले जात आहेत. जाणून घेऊ. (BJP-Congress)

तर या पक्षप्रवेशामागील सर्वात पहिलं कारण म्हणता येईल ते म्हणजे या नेत्यांचा जरी निवडणुकीत जरी विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी ग्रासरूटला असलेली ताकद. कारण जरी निवडणुकीत अनेकदा लाटेच्या माध्यमातून काही उमेदवार निवडून येत असले तरी इतर संस्था जसे की जिल्हा बँका. कारखाने, दूध संघ, शिक्षण संस्था अशा माध्यमातून अनेक नेते आपली ताकद टिकवून ठेवत असतात. त्यामुळे आपआपल्या मतदारसंघात अनेकदा आमदारापेक्षाही जास्त ताकद दाखवून देण्याची क्षमता या नेत्यांमध्ये असते. महत्त्वाचं म्हणजे राजकीय वातावरण थोडं जाती बदललं तरी आपल्या या छुप्या ताकदीच्या जीवावर हे नेते मोठा धक्का देऊ शकतात. (Political News)

अशावेळी पक्षाची ताकद जमिनीपर्यंत पोहचवायची असेल आणि लॉंगटर्म सत्ता राखायची असेल तर या नेत्यांच्या ताकदीला पर्याय निर्माण करणं आवश्यक ठरतं. मात्र पर्याय निर्माण करणं जेव्हा अवघड आणि वेळखाऊ होऊन बसतं त्यावेळी सर्वात सोपा पर्याय म्हणजे पक्षप्रवेश. पक्षप्रवेशाने ही ताकद थेट आपल्या पक्षात समावेश करता येते आणि यामुळे भाजपचा झेंडा थेट जमिनीवरच्या कार्यकर्त्यांच्या हातात पोहचतो. त्यामुळेच ज्यांची जमिनीवर ताकद आहे अशा काँग्रेस नेत्यांना भाजपने थेट प्रवेश दिलेला दिसतो. (BJP-Congress)

BJP-Congress

दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकांचे निकाल. लोकसभा निवडणुकीतील कामगिरी जरी महाविकास आघाडीचे नेते विसरले असतील तरी भाजप विसरलेलं नाहीये. देशात जरी सत्ता आली असली तरी राज्यात भाजपाला मोठा धक्का बसला होता. विधानसभा निवडणुकीने जरी भाजपने हा पराभव पुसून काढला असला तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर काही तरी ऍक्शन घेणं भाजपाला भाग होतं. आणि लोकसभा निवडणुकीत या नेत्यांची मोठी भूमिका राहिली होती. विशेतः काँग्रेसचे माहित नसलेले चेहरेही जेव्हा निवडून आले होते त्यामागेही आता पक्षप्रवेश करणाऱ्या नेत्यांचं मोठं योगदान होतं.

उदाहरणच घ्यायचं झाल्यास सुप्रिया सुळे यांची बारामतीची सीट सुरक्षित करण्यात थोपटे आणि जगताप यांचा मोठा वाटा होता. खासदार शोभा बच्छव यांना धुळ्यातून खासदार करण्यात कुणाल पाटील यांनी आपली सर्व ताकद लावली होती. सांगलीत वसंतदादा घराण्याच्या सून जयश्री पाटील यांनीही विशाल पाटील यांना साथ दिली होती. जालन्यात रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला तिथे कैलास गोरंट्याल हे काँग्रेसच्या कल्याण काळे यांच्यासाठी झटले होते. त्यामुळे कोणाला अपेक्षा नसतानाही काँग्रेसने अशी कामगिरी केली होती, मात्र आता ज्यांच्या जीवावर काँग्रेसने ही कामगिरी केली होती त्या ताकदीलाच आता भाजपने सुरुंग लावला आहे. (BJP-Congress)

================

हे देखील वाचा : Donald Trump : ट्रम्पचा भारतावरील राग अमेरिकन नागरिकांचा खिसा रिकामी करणार

================

पक्षप्रवेशांमागील तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे मित्रपक्ष जरी सोबत असले तरी प्रत्येक मतदारसंघात तितक्याच ताकदीचा भाजप उमेदवार देण्याची भाजपाची तयारी. भाजपसोबत एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे मित्रपक्ष असले तरी भाजपने स्वबळावर सत्ता कायम ठेवण्याचा हट्ट सोडलेला नाही. त्यामुळेच प्रत्यक्ष मतदारसंघात भाजप एक्के भाजप हेच सूत्र डोळ्यसमोर ठेवून पक्षप्रवेश होतातायत का? असा प्रश्न निर्माण होते. कारण अनेक मतदारसंघात या पक्षप्रवेश करणाऱ्या नेत्यांचं स्थानिक लेव्हलला भाजपच्या मित्रपक्षांचीच त्यातल्या त्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांशी राजकीय वैर आहे. म्हणजे साताऱ्यात ज्या सत्यजित पाटणकर यांचा पक्षप्रवेश झाला त्यांचा मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी राजकीय संघर्ष आहे.

असंच पुरंदरमध्ये संजय जगताप आणि शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे यांचा संघर्ष आहे. जालन्यात कैलास गोरंट्याल यांचं आणि शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांचं कट्टर राजकीय वैर आहे. संग्राम थोपटे ज्या भोर मुळशीतून निवडणूक लढतात त्या ठिकाणी अजित दादा गटाचे शंकर मांडेकर आमदार आहेत. मात्र भाजपने याचा कोणत्याही विचार न करता शत प्रतिशत भाजप या सूत्राला अनुसरून पक्षप्रवेशाचा सपाटा लावल्याचं दिसतं. महत्वाचं म्हणजे या पक्षप्रवेशांतून मित्रपक्षांनाही इशारा आहे का? याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे. (BJP-Congress)

मात्र सोबतच हेही विसरून चालणार नाही के हे जे नेते ज्या पक्षांना सोडून येत आहेत त्यात त्यानं विशेतः काँग्रेसमध्ये आपलं भविष्य दिसत नाहीये. ऑपरेशन सिंदूर सारखे मास्टरस्ट्रोक मोदी सरकारकडून सातत्याने डिलिव्हर केले जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसला राहुल गांधींच्या नेतृत्वात अजूनही सरकारच्या विरोधात ठोस असा कार्यक्रम सापडत नाहीये. त्यामुळे नेतृत्वच जर दिशाहीन होत असले तर मग नेते बोटीतून उडी मारण्याच्या संधीची वाटच बघत असतात. अशावेळी मग अगदी कमी प्रयत्नात भाजपाला हे पक्षप्रवेश घेता येत आहेत.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.