आठवड्यावर वर्षातला सर्वात मोठा सण दिवाळी येऊन ठेपला आहे. दिवाळी म्हटले की दिवे, पणत्या, आकाशकंदील, फराळ, दिव्यांची रोषणाई आदी सर्वांची बाजारांमध्ये रेलचेल पाहायला मिळते. या सर्वांसोबतच बाजारात आपले लक्ष वेधून घेतात रांगोळी आणि तिचे सुंदर सुंदर रंग. दिवाळीमध्ये विविध प्रकारच्या एकापेक्षा एक रांगोळ्या काढल्या जातात. ही दिवाळीची मोठी मजेशी बाब असते.
आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनेक लहान लहान गोष्टींना देखील अनन्यसाधारण महत्व आहे. रांगोळी ही देखील शुभ प्रतीक आहे. अतिशय छोटी आणि साधारण गोष्ट म्हणून अनेकदा आपण याकडे दुर्लक्ष करतो, मात्र या रांगोळीला आपल्या धर्मामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये मोठे महत्व आहे. रोज रोज नाही मात्र आपल्या सणावारांना, शुभ दिवशी घरात दारासमोर रांगोळी काढली पाहिजे. रांगोळीचेही खूप प्रकार आहेत. संस्कार भारती, ठिपक्यांची रांगोळी, फ्री हॅन्ड रांगोळी आदी अनेक प्रकार रांगोळीचे पाहायला मिळतात.
सुरुवातीच्या काळात दररोज घरासमोर सकाळी उठून महिला सडा टाकायच्या आणि रांगोळी काढायच्या. रांगोळीमुळे घराची शोभा वाढून त्याला एक वेगळीच चमक मिळते. मात्र काळानुसार ही परंपरा ,आहे पडत आहे. आता फक्त दिवाळीचे पाच दिवस आणि दसरा आदी महत्वाच्या दिवशी रांगोळी काढली जाते. आपल्या शास्त्रामध्ये देखील या रांगोळीचे महत्व सांगितले आहे. चला जाणून घेऊया रांगोळीचे महत्व.
रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आहे. रांगोळीचा हेतू म्हणजे शक्ती, उदारता जाणवणे आहे. रांगोळी काढल्यामुळे घरात सकारत्मकता येते. रांगोळी हे शुभतेचे प्रतीक आहे. संस्कृत भाषेत रांगोळीला रंगवल्ली म्हटले जाते. रांगोळी ही एका विशिष्ट दगडापासून तयार केली जाते. याशिवाय अनेक ठिकाणी दारासमोर शुभ कार्यात मैदा, तांदळाचे पीठ वापरून देखील ही रांगोळी काढली जाते. ‘रांगोळी’ म्हणजे ‘रंग’ आणि ‘अवल्ली’ (पंक्ती). दिवाळी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या रंगांचा वापर करून रांगोळी काढली जाते.
रांगोळी हे उत्साहाचे प्रतीक आहे आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. रांगोळी काढल्याने तणाव कमी होतो. रांगोळी काढणे हे एक सर्जनशील काम आहे आणि जे लोक हे काम करतात त्यांनी पूर्ण एकाग्रता आणि सावधगिरी बाळगली पाहिजे. जेव्हा आपण कोणतेही काम एकाग्रतेने करतो तेव्हा आपला तणाव दूर होतो आणि आपल्या मनात नकारात्मक विचार येत नाहीत.
ज्या घरांमध्ये रांगोळी काढली जाते त्या घरांमध्ये देवी-देवतांचा वास असतो असे मानले जाते. फुलांनी रांगोळी काढली जाते. रांगोळी देवी, आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घराकडे आकर्षित करते. केवळ दिवाळीतच नाही तर रोज घराबाहेर रांगोळी काढावी. जुन्या काळी लोक रोज घराबाहेर रांगोळी काढत असत.
रांगोळी काढताना अंगठा आणि बोटं जोडली जातात. त्यामुळे ज्ञान मुद्रा तयार होते. जेव्हा जेव्हा आपण रांगोळी काढतो तेव्हा ही ज्ञान मुद्रा तयार होते. आणि जेवढा वेळ रांगोळी काढतो, तेवढा वेळ ती मुद्रा जोडलेल्या स्थितीत असते. त्यामुळे आपोआप आपले मन केंद्रित होते आणि शांत व स्थिर होते. त्यामुळे मनःशांती लाभते. चित्त स्थिर होते. यासोबतच आकलन क्षमता वाढते.
ठिपक्यांच्या रांगोळीत रेघा चुकवून चालत नाही त्यामुळे गणित डोक्यात पक्कं बसतं आणि रंग संगतीची निवड करताना विज्ञान कार्यन्वीत होऊन मेंदूचा डावा भाग अधिक सक्षम होतो. खाली बसून रांगोळी काढण्याची गुडघ्यांची लवचिकता वाढते. मन आनंदी असेल तर तनालाही प्रसन्नता जाणवते आणि त्याचे पडसाद वास्तूवर पडतात.
========
हे देखील वाचा : या दिवाळीत नक्की करून बघा ‘हे’ विविध प्रकारचे लाडू
========
प्राचीन काळात लोकांचा असा विश्वास होता की रांगोळीमध्ये काढल्या गेलेल्या कलात्मक चित्रांमुळं शहरं आणि गाव धनधान्याने समृद्ध राहतात तसेच वाईट शक्तींच्या प्रभावापासून सुरक्षित राहतात. याच दृष्टीकोनातून ‘रांगोळी’ धार्मिक आणि सांस्कृतिक समारंभाच्या वेळी काढण्याची प्रथा सुरू झाली. असं म्हणतात की रांगोळी घरात येणाऱ्या ‘अशुभ’ शक्तींना घराचा उंबरठा ओलांडू देत नाही.
रांगोळी कशी बनते?
रांगोळी एका विशिष्ट्य खडकापासून तयार केली जाते. या खडकाचे नाव ‘डोलोमाइट’ असं आहे. सर्वप्रथम हा दगड भट्टीत भाजून, बारीक कुटून मग वस्त्रगाळ करून वा चाळून काढतात. रांगोळीच्या दगडाला ‘शिरगोळे’ असे म्हणतात. नागपूर जवळच्या कोराडी येथे शिरगोळे मोठ्या प्रमाणात सापडतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर रांगोळीचा व्यापार होतो. पांढऱ्या रांगोळीला वेगवेगळ्या प्रकारचे रंग देऊन रंगीत रांगोळी तयार केली जाते.