बाप्पाचं आगमन झालं की, आपला उत्साह शिगेला पोहोचतो, पण बाप्पाचा निरोप घेताना प्रत्येक वेळी डोळे पाणावतातच. आज आपल्या लाडक्या बाप्पाचं पुढच्या वर्षी लवकर या म्हणत दीड दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन झालं. लहानपणी एकदा तरी असा प्रश्न पडला असेल की, गणपती विसर्जन दीड, पाच, सात आणि दहाव्या दिवशीच का केलं जातं? याचं कारण काहींना बरेचदा माहित नसतं, आपण ते शास्त्र म्हणून करतो. सध्या तर धावपळीच्या जीवनात बऱ्याच जबाबदाऱ्यांमुळे काही जण दीड दिवसातच विसर्जन करतात, नवस पूर्ण झाला की तीन वर्ष दीड दिवसांच्या गणपतीची स्थापना करतात. काही गौरी विसर्जनासोबत विसर्जन करतात आणि काही अनंत चतुर्दशीपर्यंत विसर्जन करतात. पण या विसर्जन परंपरेचा नक्की इतिहास काय आहे? त्या मागे काही धार्मिक कारण आहे का? हे सगळं आपण जाणून घेऊ. (Ganesh Visarjan)
आपल्याला सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कशी झाली याचं उत्तर नक्कीच देता येतं. पण गणेशोत्सवात घरात गणपतीची स्थापना कधीपासून व्हायला लागली. याचं उत्तर माहित नसतं. याच प्रश्नाचं उत्तर देताना प्रसिद्ध खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीच्या काळात शेतांमध्ये धान्याच्या लोंब्या हिरव्यागार पानांमधून डोलू लागतात. या काळात शेतकरी धरणीमातेचे आभार मानतात. पूर्वी गणेश चतुर्थीच्या दिवशी शेतकऱ्यांकडून बांधावरच मातीची गणेशमूर्ती बनवून त्याची पूजा केली जायची. पूजा झाल्यावर त्याच दिवशी मूर्तीचे नदीत विसर्जन केले जायचे. मग काळ बदलला तशी ही परंपरा बदलत गेली. लोकांनी सुबक मूर्ती बनवून घरी आणायला सुरुवात केली आणि प्राणप्रतिष्ठापनेनंतर त्या मूर्तीचं विसर्जन नदीत केलं जाऊ लागलं. हळूहळू दीड दिवसांच्या गणपती पूजनाची प्रथा रूढ झाली. तरीही, आजही अनेक गावांमध्ये चतुर्थीच्या दिवशीच गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते आणि ही प्राचीन प्रथा काही ठिकाणी कायम आहे.
गणपती विसर्जन परंपरेमागे धार्मिक कारण असल्याची एक आख्यायिकासुद्धा सांगितली जाते. जिचा संबंध थेट महाभारताशी जोडला गेला आहे. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात गणेश चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला होता. तसंच पौराणिक कथांमध्ये असाही उल्लेख आहे की, गणेश चतुर्थीच्या दिवसापासूनच महाभारताचं लिखाण सुरु झालं. महर्षी वेदव्यास यांनी महाभारताच्या रचनेसाठी गणपतीला ते लिहायची विनंती केली होती. गणपतीने त्यांना सांगितलं की, ते लिखाण सुरू करतील, पण लेखणी थांबणार नाही; जर लेखणी थांबली तर तिथेच लिखाण बंद करू. तेव्हा महर्षी म्हणाले, “भगवान, तुम्ही विद्वानांमध्ये सर्वश्रेष्ठ आहात आणि मी एक साधारण ऋषी आहे. जर माझ्या श्लोकांमध्ये काही चूक झाली तर तुम्ही ती दुरुस्त करत लिहीत जा” आणि अशा प्रकारे महाभारताचं लेखन सुरू झालं, जे सलग १० दिवस चाललं.(Ganesh Visarjan)
असं म्हणतात, अनंत चतुर्दशीच्या दिवशी जेव्हा महाभारताचं लिखाण पूर्ण झालं, तेव्हा गणपतीचं शरीर पूर्णपणे जड झालं होतं. गणपती एकाच ठिकाणी बसून राहिल्यामुळे त्याच्या शरीरावर धूळ आणि माती जमा झाली होती. तेव्हा गणपतीने सरस्वती नदीत स्नान करून आपलं शरीर स्वच्छ केलं. यामुळे गणपतीची स्थापना १० दिवसांसाठी केली जाते आणि नंतर मूर्तीचं विसर्जन केलं जातं. आता काही ठिकाणी असंही म्हटलं जातं की, १० व्या दिवशी महर्षी वेदव्यास गणपतीला उचलून पाण्यात घेऊन गेले आणि त्यांनीच गणपतीच्या शरीरावर धूळ आणि माती साफ केली होती. ज्याचा संबंध विसर्जनाशी लावला जातो. तर हे झालं विसर्जन मागचं धार्मिक कारण! (Top Stories)
================
हे देखील वाचा : Dinanath Veling : ‘या’ माणसामुळे मुंबईत सुरु झाला उंच गणेश मूर्तींचा ट्रेंड!
================
अवधूत शेंबेकर गुरुजी यांच्या मते, गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करून पूजा आणि विसर्जन करण्याचे हे जे व्रत आहे ते मूळतः एक किंवा दीड दिवसांचं आहे. पण उत्सवात रंगत आणायला किंवा नवस पूर्ण करायला काहीजण पाच, सात किंवा दहा दिवसांनी गणेशमूर्तीचे विसर्जन करतात. पण यामागे कोणतंही शास्त्रीय कारण नाही; ही पूर्णपणे भक्तांची श्रद्धा आणि इच्छा यावर आधारित आहे. (Ganesh Visarjan)
आता यानंतर आणखी एक प्रश्न.. ते म्हणजे गौरी गणपतीचं विसर्जन कधी पाचव्या दिवशी होतं, कधी सहाव्या तर कधी सातव्या दिवशी… पण याच्यामागे कारण आहे. यावर शेंबेकर गुरुजी यांनी स्पष्ट केलं की, गौरी आणि गणपती या दोन वेगवेगळ्या देवता आहेत. गौरीचे आगमन आणि विसर्जन हे नक्षत्रांवर आधारित आहे. अनुराधा नक्षत्रात गौरीचं आगमन होतं आणि मूळ नक्षत्रात तिचं विसर्जन होतं आणि नक्षत्रात जर बदल झाले की मग विसर्जनाचा दिवस बदलतो. पण गणपतीच्या विसर्जनाचा कालावधी तो भक्तांच्या श्रद्धेनुसार ठरतो.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics