कोर्टाची पायरी कधी चढू नये असं म्हणतात…पण कोर्ट म्हटलं की समोर येतात ते वकील…काळ्या कोटमध्ये फिरणारे वकील हे फक्त आपल्याकडेच नसतात, तर बहुतांशी सर्व जगभर वकीलांच्या ड्रेसकोडमध्ये काळा कोट हा अविभाज्य भाग आहे. जसं वकीलांच्या बाबतीत ड्रेसकोडचं महत्त्व आहे, तसंच डॉक्टरांच्या ड्रेसकोडबाबतीतही आहे. डॉक्टरही कायम पांढऱ्या रंगाच्या ॲप्रनमध्ये असतात. वकील आणि डॉक्टर हे आपल्या समाजातील महत्त्वाचे घटक आहेत. या दोघांच्याही ड्रेसकोड बाबत अनेक रंजक कथा आहेत. (Professional Outfits)
वकीलांच्या काळ्या रंगाच्या कोटचा इतिहास हा थेट इंग्रजांपर्यंत पोहचला आहे. ब्रिटीश राजघराण्याचे कायदे कडक होते. राजाचे स्वतंत्र असे न्यायदालन होते. या रॉयल कोर्टात उपस्थित राहण्यासाठी 1327 -1377 या काळात ब्रिटीश राजा एडवर्ड तिसरा यांनी एक शिस्त आणण्याचा प्रयत्न केला. त्यातून सर्वांना सारख्या रंगाचा पोशाख असावा अशी कल्पना मांडली गेली. त्यातून काळ्या रंगाची निवड करण्यात आली.
काळा रंग हा गंभीरतेचे लक्षण मानण्यात येतो. कोर्टात वातावरण गंभीर असते. तिथे आरोपीला त्याने केलेल्या गुन्ह्यांबाबत शिक्षा देण्यात येते. अशावेळी उपस्थित वकीलांचा पोशाख हा काळ्या रंगाचा असण्यास प्राधान्य देण्यात आले. आणखी एक कारण म्हणजे काळा रंग उष्णता शोषून घेतो. कोर्टाच्या गरमा गरम वातावरणात हा कोट वकिलांसाठी फायदेशीर ठरेल, असाही अंदाज करण्यात आला.

यातून वकीलांच्या व्यवसायाला आकार यायला सुरुवात झाली. सुरुवातीला हा काळा कोट अगदी लांब असायचा. नंतर काळाच्या ओघात त्याची लांबी कमी झाली. मात्र काळ्या रंगात बदल झाला नाही. काळा रंग हा सहज उपलब्ध असतो, त्यामुळेही हा रंग जगभर कायम राहिला. काळ्या रंगाच्या कोटामुळे वकीलांच्या पेशाला एकप्रकारचे गांभीर्यही प्राप्त झाले. (Professional Outfits)
काळा रंग प्रतिष्ठेचे, सन्मानाचे, आणि न्यायाचे प्रतिक मानण्यात येतो. त्यामुळेही हा रंग कायम राहिला. अर्थात वकीलांचा कोट मात्र परिस्थितीनुसार बदलत गेला. सन 1961 मध्ये भारतातील वकीलांच्या पोशाखाबाबतही काही नियम करण्यात आले. वकिलांना काळ्या रंगाचा कोट घालणे बंधनकारक करण्यात आले.
जसे वकिलांच्या काळ्या कोटबाबत कथा सांगितल्या जातात असेच डॉक्टरांच्या पांढऱ्या शुभ्र अप्रनबाबत सांगितले जाते. 19 व्या शतकात केवळ प्रयोगशाळांमध्ये काम करणारे वैज्ञानिक प्रयोगशाळेतील कोट घालायचे. हे कोट गुलाबी किंवा पिवळ्या रंगाचे असायचे. वैज्ञानिकांनी शोधलेल्या किंबहुना प्रयोग करुन निर्मिती केलेल्या औषधांचा वापर डॉक्टर करत असत. त्यामुळे त्यांनाही वैज्ञानिकांप्रमाणे कोट घालायला सुरुवात केली. 1889 पर्यंत सर्वच डॉक्टरांनी पांढऱ्या रंगाचा कोट घालायला सुरुवात केली. (Professional Outfits)
=====
हे देखील वाचा – एखाद्यासाठी Loan Guarantor रहाण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
=====
मॉन्ट्रियल जनरल हॉस्पिटलचे सर्जन आणि कॅनेडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जॉर्ज आर्मस्ट्राँग यांनी 1855-1933 मध्ये कॅनडामध्ये पांढरा कोट डॉक्टरांच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असल्याचे नमुद केले. त्यानंतर या पांढऱ्या कोटला सर्वमान्यता मिळाली. वैद्यकीय व्यवसायाचे प्रतिक म्हणून पांढरा रंग निवडला गेला. (Professional Outfits)
पांढऱ्या रंगात अनेक अर्थ दडलेले आहेत. हा रंग शुद्धतेचे प्रतिनिधित्व करतो. चांगुलपणाचे प्रतिनिधित्व करतो. त्याचबरोबर पांढरा रंग स्वच्छताही दर्शवतो. याशिवाय डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील व्यावसायिक अंतर राखण्यासही या रंगाने मदत होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पांढरा रंग हा शांतीचा रंग आहे. डोळ्यांना तो सुखकारक असतो. रुग्ण जेव्हा डॉक्टरांकडे जातो तेव्हा तो तणावात असतो. तेव्हा त्याचे लक्ष प्रथम डॉक्टराच्या पांढऱ्या कोटकडे गेल्यास त्याचा ताण कमी व्हायला मदत होते, अशीही समजूत आहे.

हॉस्पिटलच्या गंभीर वातावरणात पांढऱ्या रंगाचे कोट घातलेले डॉक्टर आसपास असले की, रुग्णाला आणि त्यांच्या नातेवाईकांना विश्वास वाटतो असेही एका निरिक्षणात आढळून आले आहे. लंडनमध्ये तर याबाबत संशोधनही करण्यात आले आहे. या अभ्यासांतर्गत बहुतेक रुग्ण पांढरा कोट घातलेल्या डॉक्टरांकडे जाणे अधिक पसंत करतात. (Professional Outfits)
एकूण काय पोशाख हा व्यवसायाचे प्रतिनिधित्व करतो. वकीलांचा काळा कोट हा त्यांच्या पेशातील गंभीरता व्यक्त करतो. तर डॉक्टरांचा पांढरा रंग हा त्यांच्यावरचा विश्वास व्यक्त करतो.
– सई बने