एकीकडे आगीच्या ज्वाळा आणि दुसरीकडे बर्फाचे वादळ, अशा नैसर्गिक प्रकोपात अडकलेल्या अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. हा सोहळा ऐतिहासिक ठरणार आहे. यासाठी काही तासांचा अवधी बाकी आहे. अर्थात ट्रम्प यांच्या स्वभावानुसार यात बदल करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतलेल्या शपथविधी सोहळ्याची एक परंपरा असते. ही परंपरा आता 40 वर्षांनी बदलण्यात येणार आहे. त्याला कारणही अमेरिकेवर असलेल्या नैसर्गिक प्रकोपाचे झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मिडियावरुन ही माहिती दिली आहे. आता शपथविधी सोहळा यूएस कॅपिटल रोटुंडामध्ये होणार आहे. यापूर्वी अमेरिकेत माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनीही थंडीमुळे शपथविधी सोहळ्याचे ठिकाण बदलले होते. (Donald Trump)
1985 मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनीही कडाक्याच्या थंडीमुळे रोटुंडामध्ये भाषण दिले होते. आत्ताही डोनाल्ड ट्रम्प त्याची उजळणी करणार आहेत. ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याप्रसंगी वॉशिंग्टनमध्ये तापमान उणे 7 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. या काळात थंड वारे वाहणार असून आपल्या चाहत्यांना त्याचा त्रास व्हायला नको, म्हणून ट्रम्प यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा हा सोहळा कॅपिटल वन एरिनामधील स्क्रीनवरुन पाहता येणार आहे. किमान 20 हजार नागरिकांना येथे बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी अनेक परदेशी नेते अमेरिकेत उपस्थित रहाणार आहेत, हे नेते कोण याबाबतही बरीच उत्सुकता आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार यूएस कॅपिटलच्या रोटुंडाच्या आतच सर्व मान्यवरांची भाषणे होणार आहेत. वॉशिंग्टनमधील कॅपिटल वन अरेना येथे नव्या राष्ट्राध्यक्षांची परेड होणार आहे. (International News)
ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक आहेत, अशावेळी या सोहळ्याच्या निमित्तानं ट्रम्प यांच्या चाहत्यांच्या अनेक गोष्टी पुढे येत आहेत. हा सोहळा प्रत्यक्ष बघता यावा म्हणून अमेरिकेच्या वेगवेगळ्या तुरुंगात असलेल्या अनेक आरोपींनी परवानगी मागितली होती. त्यांचे हे अपील न्यायालयानं मान्य केले असून या आरोपींना ठराविक काळासाठी सुट्टी दिली आहे. अर्थात अमेरिकेच्या न्याय विभागाच्या वकिलांनी त्याला विरोध केला, परंतु न्यायाधीशांनी तो फेटाळून लावला आहे. या आरोपींमध्ये 6 जानेवारी 2021 रोजी अमेरिकन संसदेवर हल्ला करणा-यांचा समावेश आहे. कॅपिटल हिल दंगलीच्या 20 आरोपींनी आता ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा प्रत्यक्ष बघता येणार आहे. (Donald Trump)
ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यातील आणखी एक खास म्हणजे बायबल असेल. ट्रम्प त्यांच्या शपथविधी सोहळ्यात दोन बायबल वापरण्यात येणार आहेत. त्यातील एक बायबल हे ट्रम्प यांना त्यांच्या आईने भेट दिलेले आहे. 1955 मध्ये ट्रम्प यांनी न्यू यॉर्कमधील जमैका येथील संडे चर्च स्कूलमधून पदवी प्राप्त केली तेव्हा त्यांच्या आईनं ही भेट त्यांना दिली आहे. या बायबलच्या मुखपृष्ठावर ट्रम्प यांचे नाव लिहिलेले आहे. या सोहळ्यात जे दुसरे बायबल असेल त्याला लिंकन बायबल असेही म्हणतात. हे बायबल अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी 1861 मध्ये त्यांच्या शपथविधी समारंभात वापरले होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दोनदा यावरच शपथ घेतली आहे. याच सोहळ्यातच अमेरिकेचे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आलेले जेडी व्हान्स यांचाही शपथविधी होईल. जेडी हे शपथविधी समारंभात त्यांच्या आईने दिलेले बायबल वापरणार आहेत. त्याच्या आजीने ते त्यांच्या आईला दिले होते म्हणून जेडी या बायबलला कौटुंबिक बायबल देखील म्हणतात. (International News)
=============
हे देखील वाचा : Mahakhumbh 2025 : गंगा नदी लुप्त होणार !
America : बराक आणि मिशेल ओबामांच्या नात्यात आलाय दुरावा !
=============
हा शपथविधी सोहळा झाल्यावर ट्रम्प आणि जेडी यांच्या कार्यकालाची सुरुवात होईल. सीमा सुरक्षेपासून ते तेल आणि वायू उत्पादनापर्यंतच्या अनेक मुद्द्यांवर पहिल्याच दिवशी हे दोघंही स्वाक्षरी करतील अशी माहिती आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष शपथविधी सोहळ्याची परंपरा मोडत डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक परदेशी नेत्यांना आमंत्रित केले आहे. यात अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मायली, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी उपस्थित रहाणार आहेत. भारताकडून एस जयशंकर, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि नीता अंबानी हे देखील उपस्थित राहतील. याशिवाय ट्रम्प यांचे सल्लागार एलोन मस्क, टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ, अमेझॉनचे कार्यकारी अध्यक्ष जेफ बेझोस आणि मेटा प्लॅटफॉर्मचे सीईओ मार्क झुकरबर्ग हे देखील या शाही सोहळ्याला उपस्थित असतील. (Donald Trump)
सई बने