आपला शेजारी देश पाकिस्तान अस्थिरतेच्या उंबरठ्यावर आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना झालेली अटक आणि त्यानंतर त्यांच्या पाठिराख्यांनी केलेली हिंसा सर्व जगानं बघितली. हिंसक जमाव थेट लष्करी क्षेत्रातही घुसला होता. तसेच लष्करी अधिकारी आणि राजकीय नेत्यांची घरेही जाळण्यात आली. फारकाय हॉस्पिटल, रुग्णवाहिकाही जाळण्यात आल्या. या हिंसाचारात लाखो रुपयांचे नुकसान झाले. आधीच आर्थिक टंचाईग्रस्त असलेल्या पाकिस्तानला हे नुकसान भरुन काढण्यासाठी खूप वेळ द्यावा लागणार आहे. पण यापेक्षाही जगभर झालेली पाकिस्तानची बेआब्रू मोठी आहे. या सर्वाला पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ म्हणजेच पीटीआय हा इम्रान खान यांचा पक्षच जबाबदार असल्याचा ठपका आता ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पीटीआयच्या हजारो कार्यकर्त्यांची धरपकड चालू झाली आहे. यासोबत पीटीआयची मान्यताच रद्द करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. हे एकीकडे चालू असतांना इम्रान खान यांची ज्यांच्यावर मदार होती, ते त्यांचे सहकारीही इम्रान यांना सोडून जात आहेत. या सर्वांसाठी इम्रानच जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या सहका-यांनी केला आहे. इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर जी हिंसा झाली त्यात पीटीआयचे कार्यकर्ते फक्त खान यांच्या इशा-यावर सहभागी झाले होते, असा आरोप आता करण्यात येत आहे. शिवाय इम्रान खान यांनी आपल्याशिवाय अन्य कुठल्याही पीटीआय कार्यकर्त्यांची बाजू घेतली नाही. या सर्वांमुळे इम्रान खान यांचे सहकारी दुखावले आहेत. परिणामी इम्रान खान (Imran Khan) यांना त्यांचेच कार्यकर्ते सोडून जात आहेत.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांचे उजवे हात मानले जाणारे माजी कॅबिनेट मंत्री फवाद चौधरी यांनी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाला सोडचिढ्ढी दिल्याचे जाहीर केले आहे. यासोबत त्यांनी इम्रान खान यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चौधरी यांनी राजीनामा दिल्यावर आणखी एक सहकारी असद उमर यांनीही पक्ष सोडला आहे. याशिवाय माजी कॅबिनेट मंत्री शिरीन मजारी, इम्रान खान यांचे फायनान्सर फैयाज-उल-चौहान आदींनीही पीटीआयचा राजीनामा देतांना इम्रान खान यांच्यावर टिका केली आहे. इम्रान खान यांना 9 मे रोजी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक झाली. यानंतर पीटीआयच्या कार्यकर्त्यांनी जिना हाऊस आणि लष्कराच्या मुख्यालयासह अनेक लष्करी तळांवर हल्ला केला. या प्रकरणांमध्ये एक हजाराहून अधिक आरोपींना अटक करण्यात आली आहे. इम्रान खान यांचे जे सहकारी त्यांना आता सोडून गेले आहेत, त्या सर्वांनी या हिंसेचा विरोध केला होता. त्यांनी या सर्व हिंसेला इम्रान खानलाच जबाबदार धरले आहे. मुळात या घटनेनंतर आता पाकिस्तानी लष्करानं कडक भूमिका घेत ज्यांनी हिंसा करतांनाचे व्हिडिओ शेअर केले होते, त्यांना ओळखून पकडण्याचे काम सुरु केले आहे. यामुळे इम्रान खानच्या सहका-यांनी आपला या हिंसेशी काहीही संबंध नसल्याचे सांगून पीटीआय पक्षालाच सोडले आहे. इम्रान यांना सोडणा-या सहका-यांपैकी काही त्यांचे कायदेशीर सल्लागारही आहेत. त्यामुळे इम्रान खान (Imran Khan) यांचा पुढचा सर्व काळ कठिण असल्याचे सांगण्यात येत आहे.
दुसरीकडे इम्रान खान (Imran Khan) यांनी दिलेल्या चिथावणीखोर वक्तव्यांनी पाकिस्तानमध्ये हिंसा झाल्याचा आरोप आहे. त्यावरुन त्यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफवरच बंदी घालण्याची तयारी सुरू आहे. पीटीआय आणि त्याचे अध्यक्ष इम्रान खान यांनी केवळ लष्करावरच नव्हे तर देशाच्या सन्मानावरही हल्ला केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. इम्रान खान यांनी या सर्वाचा विरोध करत, मी पाकिस्तानचा सर्वात लोकप्रिय नेता आहे. असे असूनही मी पुन्हा पंतप्रधान व्हावे आणि माझ्या पक्षाने पुन्हा सत्तेत यावे असे लष्करप्रमुखांना वाटत नाही. म्हणूनच ही दडपशारी असल्याचा आरोप लष्करावर केला आहे. या सर्व प्रकरणात इम्रान खानची (Imran Khan) बायको, बुशरा बिबी हिच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. आता इम्रान फक्त आपला आणि आपल्या बायकोचा बचाव करीत आहेत, जे पीटीआयचे कार्यकर्ते अटक झाले आहेत आणि जे नेते इम्रान खानसाठी तुरुंगात गेले आहेत, त्यांच्यासाठी इम्रान खान कुठलीही हालचाल करत नाही. तसेच त्यांचा उल्लेखही इम्रान करत नसून त्यांच्या या स्वार्थी वर्तणुकीचा त्यांच्याच माजी सहका-यांनी निषेध केला आहे.
======
हे देखील वाचा : दिव्यांग असलेल्या हरि बुद्धा मागरने माउंट एवरेस्ट सर करत रचला इतिहास
======
एकूण सध्या पाकिस्तानचा भावी पंतप्रधान मीच असा शेखी मिरवणा-या इम्रान खानसमोर आपला पक्ष बचावण्याचे आव्हान आहे. त्याचे सहकारी त्याला सोडून गेले असून पीटीआयमध्ये आता हातावर मोजण्याइतके सहकारी त्याच्यासोबत आहेत. इम्रानच्या पत्नीवरीही अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. तिला 31 मे पर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाले असले तरी भविष्यात बुशरा बिबीही जेलमध्ये जाईल अशी शक्यता आहे. बुशराची खास मैत्रीण असलेली फराह गोगीलाही अटक करण्यात आली आहे. तिच्यावरही भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. पीटीआयच्या महिला नेत्या खादिजा शाहलाही अटक झाली आहे. खादीजावर लाहोर कॉर्प्स कमांडर हाऊसवर हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. या सर्वांमुळे इम्रान खान एकाकी पडला आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान आर्थिक संकटातून जात आहे. अन्न, इंधन आणि वीज यांच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. या सर्वातून आपल्याला इम्रान खान एखादी जादूची कांडी फिरवून बाहेर काढेल अशी येथील जनतेची समजूत झाली आणि हिसांचारात हजारोच्या संख्येनं नागरिक सहभागी झाल्याचे पाकिस्तानी जाणकारांचे म्हणणे आहे. असे असले तरी इम्रान खान यांचा भविष्य त्यांच्या स्वार्थी स्वभावामुले अंधारमय झाले आहे.
सई बने