मंडळी, सध्या मार्केटमध्ये कोक, पेप्सी सारखी कितीही कोल्ड्रिंक्स मिळत असली तरी, ऊसाच्या रसासारख्या पारंपारिक पेयाची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. कावीळ सारख्या रोगावर हमखास गुणकारी असा हा, कोणत्याही सिझन मध्ये चालणारा, विशेष म्हणजे खिशाला परवडणारा ऊसाचा रस प्यावाच असं जुनी माणसं आवर्जून सांगतात. कष्टकरी वर्ग असो वा मोठमोठाल्या कंपन्यांचे सीइओ असो या सगळ्यांची क्षुधाशांती आणि मनः शांती या ऊसाच्या रसानेच होतेच. पण तुम्ही जर नीट observe केलं, तर चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठेही जा संपूर्ण महाराष्ट्रात ऊसाच्या रसाचं जिथे जिथे दुकान असेल तिथे दोनच नाव दिसतात कानिफनाथ किंवा नवनाथ ! पण हीच नावं असण्यामागे नेमकं कारण काय ? या नावांमागे इंट्रेस्टिंग गोष्ट आहे,ती नेमकी काय ? जाणून घेऊ. (Sugarcane)
तर ही गोष्ट आहे साधारण सत्तर ऐंशी वर्षांपूर्वीची ! पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बोपगाव या दुष्काळी गावातली. गावात जरी दुष्काळ असला तरी इथले शेतकरी मोठ्या मेहनतीचे होते ! थोड्याथोडक्या पाण्यावर ते शेती जगवत होते. त्या काळात साखर कारखाने नव्हते, त्यामुळे शेतात पिकणाऱ्या ऊसाला चांगला बाजारभाव मिळत नव्हता. त्याचवेळी एक तरुण रोजगाराच्या शोधात मुंबईला गेला. तिथे त्याला कळलं की, बोपगावच्या ऊसाला तिथे खूप मागणी आहे. त्या काळात देशी ऊस होता, जो लहान मुलालाही सहज सोलता येत होता. मग या तरुणाने ऊसाचे छोटे तुकडे करून बरणीत भरून मुंबईत विकायला सुरुवात केली. नंतर त्याच्या मनात विचार आला की, दारोदारी फिरण्यापेक्षा एक दुकान उघडून तिथे रस काढून विकावा. मग काय, बोपगावच्या या गोड ऊसाचा रस मुंबईत लोकप्रिय झाला. हळूहळू बोपगाव, सासवड, चांबळी, बिव्हरी या गावातील शेतकऱ्यांनी रसवंतीचा व्यवसाय सुरू केला. हे लोक जिथे गेले तिथल्या लोकांना हा ऊसाचा रस आवडला. मग त्यांनी आपल्या व्यवसायात सचोटी ठेवली आणि रसवंतीला एक ब्रँड बनवलं.(Sugarcane)
पण मग मूळ प्रश्न पडतो, रसवंतीगृहाला कानिफनाथ /नवनाथ हेच नाव का दिलं गेलं? आता तुमच्यापैकी अनेकांना असं वाटत असेल की, जसं McDonald’s, Domino’s यांच्या ठिकठिकाणी फ्रॅंचाईस असतात, तसंच काहीसं या ऊसाच्या रसवाल्या दुकानदारांचं असेल, म्ह्णून त्यांची नाव सारखीच असतील, पण ते तस नाहीये. तर भारतामध्ये अनेक संस्कृती आणि संप्रदाय आहेत. त्यातील एक आहे दत्त संप्रदाय. या संप्रदायाची शाखा आहे ती म्हणजे नवनाथ! या नवनाथांचे गुरु आहेत भगवान दत्तात्रय, आता एक आख्यायिका अशी आहे की, या नावनाथांपैकी कानिफनाथांचा जन्म हत्तीच्या कानापासून झाला अशी आख्यायिका आहे. आणि ऊस हा हत्तीला खूप प्रिय असतो. त्यामुळे कानिफनाथ यांना ऊस , गूळ आणि ऊसचा रस अधिक आवडत असे. म्हणून त्यांच्यावरील आदरामुळे रसवंती गृहाचे नाव कानिफनाथ रसवंती गृह असे ठेवले जातं.
=============
हे देखील वाचा : Indrajeet Sawant : मार्टिनची डायरी आणि कोरटकर-सावंत वाद का घडला ?
=============
दुसरी गोष्ट अशी की, रसवंती गृह व्यवसायामध्ये असणारे जवळपास ९०% व्यावसायिक हे पुणे जिल्ह्यातील पुरंदर व भोर तालुक्यातले आहेत. या भागातील लोक नाथ संप्रदायाची भक्तिभावाने पूजा करतात. तसंच, पुरंदर तालुक्यातील बोपगावजवळच्या डोंगरावरच्या गुहेत नाथसंप्रदायाच्या नव नाथांपैकी एक कानिफनाथ तपश्चर्येला बसले होते. बोपगाव या ठिकाणी श्री कानिफनाथ यांची समाधी आहे. कानिफनाथांचे समाधी स्थळ असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी बोपगाव येत असल्याने कानिफनाथ हे बहुतेक सर्व रसवंति-गृहचालकांचे पूजनीय दैवत आहेत. (Sugarcane)
त्यामुळे हे लोक श्रद्धेने रसवंती गृहाला कानिफनाथ किंवा नवनाथांचं (Sugarcane) नाव देतात. पुढे मग नवनाथ, कानिफनाथ रसवंतीगृहाच यश बघून इतर रसवंतीगृहवाले सुद्धा तेच नाव वापरू लागले.दरम्यान पूर्वी बैलानी फिरवल्या जाणाऱ्या लाकडी घाण्यावर हे रस काढले जायचे. पुढे बैल गेले आणि त्यांची जागा लोखंडी मशीननी घेतली. पण या बैलानी आपल्याला एकेकाळी जगवलेलं याची आठवण म्हणून बैलाच्या गळ्यातले घुंगरू आजही रस काढणाऱ्या मशीनवर छुमछुम आवाज करत असतात. असा हा महाराष्ट्राच्या मातीतून तयार झालेला बिझनेस आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरला आहे.