Home » टाटा समुहाचे भविष्यात नेतृत्व कोण करणार ?

टाटा समुहाचे भविष्यात नेतृत्व कोण करणार ?

by Team Gajawaja
0 comment
Tata Group
Share

टाटा हे नाव ऐकल्यावर पहिल्यांदा समोर येतात ते रतन टाटा. टाटा समुहाची जी भरभराट झाली आहे, ती रतन टाटा यांच्या कार्यकालात. रतन टाटा, हे टाटा समुहाचे नेतृत्व करतांना जगभर या समुहाचा दबदबा आहे. टाटा हे नाव फक्त उद्योग, व्यवसायातच पुढे आले नाही, तर समाजकार्यातही टाटा समुहाचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. रतन टाटा यांनी या समुहाची धुरा एन चंद्रशेखरन यांच्याकडे दिली. मात्र त्यांच्यानंतर या टाटा समुहाची धुरा कोणाकडे असेल हा प्रश्न विचारला जात होता. टाटा कुटुंबातील कोणी पुन्हा टाटा समुहाच्या प्रमुखपदी येणार का हा प्रश्न अनेकांना पडला होता. अशातच आता एक नाव पुढे येत आहे, ते म्हणजे, माया टाटा. एन चंद्रशेखरन यांच्यानंतर माया टाटा या टाटा समूहाची कमान हाती घेणार असल्याची बातमी आली आहे. (Tata Group)

जगभरातील प्रमुख उद्योग समुह असलेल्या टाटा समुहाची कमान आता एका तरुणीच्या हाती जाणार आहे. टाटा समूह हे विश्वासाचे दुसरे नाव मानले जाते. अगदी घरातील साध्या वस्तूपासून ते मोठ्या उद्योगापर्यंत कारभार या समुहानं उभारला आहे. घरातील सर्वात गरजेचे मिठ ते विमान कंपनीपर्यंत टाटांची झेप आहे. जेआरडी टाटाच्या या स्वप्नाचे रतन टाटा यांच्या मेहनतीमुळे भल्यामोठ्या वटवृक्षात रुपांतर झाले आहे. फक्त उद्योगातच नव्हे तर अनेक समाजसेवी उपक्रमांमध्ये टाटांचे नाव विश्वासानं घेतलं जाते.

 

हजारो तरुणांच्या स्टारटर्पमध्ये टाटांनी गुंतवणूक करुन तरुणांना नवी उभारी दिली आहे. याच टाटा समुहाचे भविष्यात नेतृत्व कोण करणार हा प्रश्न नेहमी विचारला जात आहे. मात्र या टाटा समुहाचे नेतृत्व एका तरुणीच्या हाती जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. ३४ वर्षाच्या माया टाटा या टाटा समुहाच्या प्रमुख होणार आहेत. टाटा कुटुंबात ठराविक मंडळी सोशल मिडियात पुढे येतात. बाकी मंडळी पडद्याआडून आपली कामे चोखपणे करत असतात. अशातच माया टाटा यांचे नाव येते. माया टाटा या सोशल मिडियाच्या जाळ्यापासून ब-याच दूर आहेत. (Tata Group)

टाटा समुहात सध्या कार्यरत असलेल्या माया टाटा यांची ओळख फारशी कोणालाच नाही. त्यामुळेच माया टाटा हे नाव टाटा समुहाच्या भावी प्रमुख म्हणून पुढे आल्यावर या माया टाटा कोण याची शोधाशोध खुद्द टाटासमुहातच सुरु झाली आहे. माया टाटा या टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या भाची आहेत. नोएल टाटा आणि आलू मिस्त्री हे त्यांचे पालक आहेत. माया टाटा यांचे वडील, नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. त्यांची आई अल्लू मिस्त्री या टाटा समूहाचे माजी अध्यक्ष दिवंगत सायरस मिस्त्री यांच्या बहिण आहेत. सायरस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट आणि स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंट ग्रुपच्या माध्यमातून मिस्त्री कुटुंबाची टाटा सन्समध्ये १८ टक्के हिस्सेदारी आहे. यामुळेच टाटा समुहाची धुरा आता माया टाटा यांच्या हाती जाण्याची चर्चा आहे.

टाटा घराण्याचा वारसा असल्यामुळे माया यांनाही उद्योग व्यवसायाचे बाळकडू मिळाले आहे. शिक्षण चालू असतानाच त्यांनी टाटा समूहातील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यापूर्वीच सांभाळल्या आहेत. वारविक युनिव्हर्सिटी आणि यूके मधील बेज बिझनेस स्कूलमध्ये माया यांचे शिक्षण झाले आहे. टाटा कॅपिटलचा फ्लॅगशिप प्रायव्हेट इक्विटी फंड, टाटा अपॉर्च्युनिटीज फंडातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. पोर्टफोलिओ व्यवस्थापन आणि गुंतवणूकदार संबंधांमध्ये काम करतांना माया टाटा यांची कामगिरी सर्वोत्कृष्ट होती. (Ratan Tata)

शिवाय टाटा डिजिटलमध्ये काम करत असताना टाटा न्यू ॲप लॉन्च करण्यातही माया यांची महत्त्वाची जबाबदारी होती. सध्या माया या टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टच्या सहा बोर्ड सदस्यांपैकी एक आहेत. कोलकाता येथील या कर्करोग रुग्णालयाचे उद्घाटन २०११ मध्ये रतन टाटा यांनी केले होते. टाटा सन्सच्या एजीएममध्ये माया यांची भूमिका पाहिल्यानंतर भविष्यात समुहाची जबाबदारी माया टाटांच्या हाती येणार असल्याची खात्री अनेकांनी व्यक्त केली आहे. माया टाटा सध्या टाटा समुहाच्या अनेक जबाबदा-या पार पाडत आहेत. मात्र त्यांच्या अगदी निकटवर्तीयांच्या पलिकडे त्यांची ओळख कोणालाही नाही. हा टाटा घराण्याचा चोख वारसा असल्याचे सांगितले जाते. (Tata Group)

===============

हे देखील वाचा : टाटा ग्रुपच्या झुडिओच्या यशस्वी होण्यामागचं रहस्य ?

================

टाटा कुटुंबातील व्यक्ती कोणालाही कळू न देता आपले काम चोखपणे पार पाडत असतात. कुठलाही गाजावाजा वा बडेजाव न मारता ही मंडळी व्यवसाय आणि सामाजिक कार्य एकाचवेळी उत्कृष्ठपणे पार पाडतात. अशातच माया टाटा यांचा नंबरही आहे. मात्र त्यांचे नाव फारसे कुठेही नसल्यामुळे माया टाटा यांचे फोटोही सोशल मिडियावर दुर्मिळ आहेत. या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, माया टाटा या रतन टाटा यांच्या सर्वात जवळच्या आहेत. ८५ वर्षाच्या रतन टाटा यांचे त्या वेळोवेळी मार्गदर्शन घेतात. रतन टाटा यांच्याप्रमाणेच माया टाटा यांना समाजसेवेची आवड आहे.

टाटा समुहाची स्थापना १८६८ साली जमशेदजी टाटा यांनी केली. भारतातून सुरु झालेल्या या उद्योग समुहाचा आता जगभरात दबदबा आहे. टाटा काय तयार करत नाहीत, हा प्रश्न विचारला जातो. कारण ऑटोमोटिव्ह, केमिकल्स, डिफेन्स, इलेक्ट्रॉनिक्स, एफएमसीजी, ज्वेलर्स, घरगुती उपकरणे, मीठ,स्टील, सिमेंट, चहा, कॉफीही टाटा तयार करतात. या समुहाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. जगभरातील १५० पेक्षा जास्त देशांमध्ये टाटा समुहांची कार्यालये आहेत. आता या सर्वाची धुरा माया टाटा यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. (Tata Group)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.