नुकताच तेलुगू चित्रपट कल्की 2898 AD हा चित्रपट प्रचंड गाजतोय. त्यातील अमिताभ बच्चन यांनी साकारलेलं अश्वत्थामाचं पत्र तर लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. मायथॉलॉजी + सायन्स फिक्शन + डिस्टोपियन वर्ल्ड अशी ही कन्सेप्ट पहिल्यांदाच भारताच्या सिनेमा इतिहासात पाहायला मिळतात. आता या चित्रपटाची नाळ आपल्या संस्कृतीसोबतच जोडली असेल, तर अनेक पात्र यामध्ये दाखवणं साहजिकच आहे. असेच दोन पात्र या चित्रपटाशी जोडलेले आहेत, ज्यांची बरीच चर्चा होत आहे, ते म्हणजे कल्की आहे कली !
कल्की म्हणजे भगवान विष्णु यांचा दहावा अवतार जो कलियुगाच्या अखेरीस पृथ्वीवर अवतरणार आहे तर कली हा कलियुगातील एक नश्वर आणि शक्तिशाली राक्षस आहे. या दोघांचं महायुद्ध होऊन शेवटी सत्याचा विजय होईल, असं वर्णन आपल्याला विष्णुपुराण आणि कल्कीपुराणात मिळतं. पण हे देव आणि दानव नक्की आहेत तरी कोण ? (Kalki or Kali)
भगवदगीतेमध्ये म्हटलं आहे,
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।
अर्थात, या पृथ्वीवर जेव्हा जेव्हा पाप आणि अन्याय वाढेल, धर्माची हानी होईल, भारताला ग्लानि येईल, तेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवर वाईट लोकांचा नाश करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या स्वरुपात प्रकट होतील. भगवान विष्णु यांच्या दशावतारापैकीच एक म्हणजे कल्की अवतार! शास्त्र आणि पुरणांमध्ये भगवान विष्णू यांच्या दहा अवतारांचा उल्लेख आहे, त्यापैकी आत्तापर्यंत त्यांनी नऊ अवतार घेतले आहेत. परंतु कलियुगातील त्यांचा अखेरचा अवतार अद्याप बाकी आहे. असं मानलं जातं की जेव्हा कलियुग शिगेला पोहोचेल तेव्हा विष्णू यांचा कल्की हा अवतार पृथ्वीवर जन्म घेईल आणि कलियुग संपवून ते धर्मयुग स्थापन करतील. (Kalki or Kali)
विष्णु पुराण आणि कल्की पुराणात असलेल्या उल्लेखानुसार भगवान कल्की यांचा जन्म संभल किंवा शंभाला या गावात झाला आहे. विष्णूयश नावाच्या एका श्रेष्ठ ब्राह्मणाच्या मुलाच्या रुपात त्यांचा जन्म होईल, असा उल्लेख आहे. देवदत्त नावाच्या घोड्यावर ते तलवारीने दुष्टांचा नाश करतील, तेव्हाच सत्ययुग किंबया धर्मयुगाचि सुरुवात होईल. या अवतारात, त्यांच्या आईचं नाव सुमती असेल. तुम्ही जर कल्की हा चित्रपट पाहिला, तर दीपिका पादुकोणचं नाव सुमतीच आहे आणि तिच्या पोटात असणारं बाळ कल्की असून त्याला वाचवण्यासाठीच सुमतीला शंभालामध्ये आणलं जातं. (Kalki or Kali)
कल्की यांचे तीन भाऊसुद्धा असतील, ते म्हणजे सुमंत, प्राज्ञ आणि कवि! यज्ञवल्क्य हे पुजारी आणि भगवान परशुराम हे त्यांचे गुरु असतील. भगवान कल्की यांच्या लक्ष्मी रुपी पद्मा आणि वैष्णवी रुपी रमा अशा दोन पत्नी असतील. तर त्यांची मुलं जय, विजय, मेघमाल आणि बलाहक अशी असणार आहेत. श्री हरीच्या दहाव्या अवताराच्या पुराणात नमूद केलेल्या तिथीनुसार, श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला या अवताराचा जन्म होईल. याच कारणाने कल्की यांचा जन्म होण्याच्या आधीच त्यांची जयंती साजरी केली जाते.
आता आपण कली या राक्षसी पात्राबद्दल जाणून घेऊया!
============================
हे देखील वाचा : Mirzapur Season 3 मध्ये होणार पंचायतमधील या स्टारची एण्ट्री, अली फजलने केला खुलासा
============================
पौराणिक ग्रंथामध्ये भागवत पुराण, मार्कंडेय पुराण आणि कल्की पुराणमध्ये कली या महाकाय राक्षसाचा उल्लेख मिळतो. असंही म्हणतात की कली हा राक्षस इतका शक्तिशाली असेल, की भगवान कल्की यांच्या मदतीसाठी सप्त चिरंजीवसुद्धा येणार आहेत. हे सप्तचिरंजीव म्हणजे हनुमान, अश्वथामा, विभीषण, महर्षि वेदव्यास,, कृपाचार्य, परशुराम आणि राजा बली! महाभारतात कली हा गंधर्व होता, असं म्हणतात. कली हा क्रोध आणि हिंसा यांचा पुत्र असल्याचा उल्लेख आढळतो. तसच भय व मृत्यू ही त्याची अपत्ये आहेत.
याच राक्षसी वृत्तीच्या कलीचा पराभव करण्यासाठीच कल्की पृथ्वीवर जन्म घेणार आहेत. (Kalki or Kali)
मुळात या सर्वांचा पुराण आणि शास्त्रांमध्ये उल्लेख आपल्याला मिळतो. त्यातच पुराणातील उल्लेखणूसार कलियुगात अन्याय, अत्याचार, पाप हे सगळं वाढलं आहे. त्यामुळे या सर्वांचा नाश करून धर्माची स्थापना करण्यासाठीच कल्की अवतार येईल, अशीच हिंदूंचि श्रद्धा आहे.