Home » महाराणी एलिजाबेथ: कोण होणार राणीचा उत्तराधिकारी?

महाराणी एलिजाबेथ: कोण होणार राणीचा उत्तराधिकारी?

by Team Gajawaja
0 comment
Queen of England
Share

महाराणी एलिजाबेथ! ब्रिटनमध्ये ‘राणी एलिजाबेथ द्वितीय’ म्हणजे देवाचं दुसरं नाव आहे. महाराणी एलिजाबेथचा कालखंड असा व्यापकच आहे की, जवळपास तीन पिढ्या महाराणीसोबत जोडल्या गेल्या आहेत. ब्रिटनच्या या महाराणीनं आपल्या राज्यारोहणाची सत्तर वर्ष पूर्ण केली आहेत. त्यानिमित्त संपूर्ण इंग्लडमध्ये जून महिन्याचा पहिला आठवडा ‘उत्सव’ साजरा झाला. 

सौजन्य : गूगल

एवढ्या दिर्घकाळ प्रभावीपणे कारभार करणारी, राजेशाही ते लोकशाही असा प्रवास करणाऱ्या महाराणीनं आपल्या वैयक्तिक जीवनातही अनेक दुःखाचे डोंगर पचवले आहेत. राजकुमारी डायनाचा मृत्यू, राजकुमार हॅरी आणि त्याची पत्नी मेघन मार्कलनं तोडलेलं राजघराण्याबरोबरचं नातं…आणि गेल्यावर्षी राजकुमार फिलीप्स यांचा मृत्यू…या घटनांनी महाराणी एलिजाबेथला हादरे दिले. मात्र हे आघात सोसत नव्वदी पार केलेली राणी तिच्या कर्तव्यांबरोबर कायम बांधील राहिली. आता तिच्या राज्यारोहण समारंभाची सत्तरीही राणीला शोभेल अशाच शाही थाटात पार पडली.  

या शानदार समारंभानंतर आता इंग्लडच्या राजघराण्याचा भावी वारस कोण…याची चर्चा रंगू लागली आहे.  या समारंभात राणीनं आपल्या सर्व वारसांना बोलवलं होतं…अगदी राजघराण्यापासून दूर झालेला राजकुमार हॅरी आणि त्याची पत्नी मेघनही या समारंभात सहभागी झाले होते. त्यामुळेच राणीचा भावी वारस कोण आणि राणी आत्ता त्याची कधी घोषणा करणार याची उत्सुकता लागली आहे. (Who will be the next Queen of England?)

6 फेब्रुवारी 1952 रोजी इंग्लडचे राजे जॉर्ज यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची मुलगी एलिजाबेथ द्वितीय यांच्याकडे राज्यकारभार आला. अवघ्या 25व्या वर्षी एलिजाबेथ द्वितीय इंग्लडची राणी झाली. सुरुवातीला अगदी नवख्या असलेल्या या राणीनं राजघराण्यावर आणि इंग्लडच्या राजकारणावर आपली पक्कड घट्ट केली. आत्तापर्यंत ब्रिटनच्या 14 पंतप्रधानांसोबत राणी एलिजाबेथनं काम केलं आहे. सध्याचे इंग्लडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन हे 14 वे पंतप्रधान आहेत.  

जून 1953 मध्ये राजकुमारी एलिजाबेथ द्वितीय इंग्लडची राणी झाली. हा राज्यभिषेक समारंभ तेव्हा पहिल्यांदा टिव्हीवर दाखवण्यात आला होता.  यावेळी पहिल्या भाषणात राणीनं आपल्याकडे राज्यकारभार बघण्याचा अनुभव फारसा नाही…पण राजघराण्याचे संस्कार माझ्यावर झाले आहेत, यातूनच मी राजघराण्याचे आणि पर्यांयाने इंग्लडचे नाव खराब होईल अशी कुठलीही कृती करणार नाही, असे आश्वासन दिले. अर्थात हे आश्वासन राणीनं नंतर वास्तवात उतरवले.  

महाराणी एलिजाबेथनं आत्तापर्यंत 90 देशांची यात्रा केली आहे. राजघराण्यातील अनेक चढउतार तिनं सांभाळले आहेत. अत्यंत कडवट परंपरा सांभाळणाऱ्या राजघराण्यात तिनं काही आधुनिक परंपराही सामिल केल्या. त्यात राजकुमार चार्ल्स आणि राजकुमारी डायना यांचा घटस्फोट आणि त्यानंतर डायनाचा अपघाती मृत्यू यात राणीवरही टिका झाली होती. ही टिका स्वीकारून राणीनं काही बदल केले. राजकुमार चार्ल्स यांचा द्वितीय विवाह, नातू राजकुमार हॅरी आणि मेघन मार्कल या अमेरिकन अभिनेत्रीचं लग्न हे दोन निर्णय राणीच्या कालखंडातील महत्त्वाचे निर्णय मानले जातात. (Who will be the next Queen of England?)

====

हे देखील वाचा – स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव: स्वातंत्र्य चळवळीतील ५ बलवान महिला, ज्यांनी देशासाठी केला आपल्या ऐशोआरामाचा त्याग

====

मेघन, राजकुमार हॅरीपेक्षा वयानं मोठी आणि घटस्फोटीत होती. मात्र यावेळी राणीनं राजघराण्याच्या परंपरा बाजूला ठेवत नातवाच्या प्रेमाला महत्त्व दिलं. याच हॅरीनं घेतलेला राजघराण्याचा वारसा सोडण्याचा निर्णयही राणीनं सहज स्विकारला.  

अशाच काही राजकीय परंपराही राणीनं बदलल्या आहेत. चीन दौरा, अफ्रिकेचे राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांचा स्वागत समारंभ चर्चेत राहिले. 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये तर राणीनं कमाल केली. डेनियल क्रेग या अभिनेत्यासह राणीनं या ऑलंम्पिकच्या उद्घाटन समारंभाला हजेरी लावत सर्वांना आर्श्चयाचा धक्का दिला.  

राणीचे पती राजकुमार फिलिप्स यांचे 9 एप्रिल 2021 रोजी निधन झाले. 99 वर्षाचे फिलिप्स आणि एलिजाबेथ द्वितीय यांच्या लग्नाला 73 वर्ष झाली. या घटनेनं राणी एकटी पडल्याची चर्चा आहे. आता 96 वर्षाची ही राणी आपला उत्तराधिकारी नेमणार याची चर्चा सुरु झाली आहे. राज्यारोहण समारंभाची सत्तरी साजरी झाल्यावर तर, ही चर्चा अधिक जोमानं होऊ लागली आहे. कारण या समारंभात इंग्लडच्या गादीचे सर्वच उत्तराधिकारी हजर होते. (Who will be the next Queen of England?)

यामध्ये राजकुमार विल्यम, त्याची पत्नी राजकुमारी केट आणि त्यांच्या तीन मुलांची नाव अधिक चर्चेत आहेत. विशेष करुन राजकुमारी शार्लेट हुबेहुब राणी एलिजाबेथ द्वितीय सारखी असल्याच्या अनेक बातम्या इंग्डच्या मिडीयामध्ये येत आहेत. त्यावरुन राणीची पहिली पसंती तिच्या पणतीला असेल, अशी शक्यता आहे. अर्थात राणी एलिजाबेथ द्वितीयने आपली पकड राजघराण्यावर ठेवली, कारण तिचे धक्कातंत्र. आत्ताही राणी आपला उत्तराधिकारी निवडताना सर्व शक्यतांना धक्का देईल, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.  

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.