२२ जुलैपासून प्रसिद्ध अशी कावड यात्रा सुरु होत आहे. भगवान शंकराची ही कावड यात्रा उत्तर भारतात मोठया प्रमाणात केली जाते. यामध्ये पवित्र स्थळांवरुन पाणी आणून त्यानं भगवान महादेवाचा अभिषेक केला जातो. कावड यात्रेला कावर यात्राही म्हणतात. या यात्रेचे नियम कडक असतात. भाविक आपल्या खांद्यावरुन कावडमधून तिर्थस्थळातील पवित्र जल आणतात. या दरम्यान अनेक भाविक पायात चप्पल घालत नाहीत. तसेच कडक उपवास करतात.
भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करण्यात येणारी ही कावड यात्रा पहिल्यांदा रावणानं केल्याची कथा पौराणिक ग्रंथांत सांगितली जाते. रावणाचा उल्लेख पहिला कंवरिया असा करण्यात येतो. शिवलिंगावर गंगाजल अर्पण करुन रावणानं या यात्रेचा शुभारंभ केल्याचे सांगितले जाते. आज हजारो कंवरिया ही यात्रा करतात. यासाठी उत्तर भारतात विशेष प्रजोजन करण्यात येते. (Kawad Yatra)
२२ जुलैपासून सर्वत्र कंवर यात्रा सुरू होत आहे. भगवान शंकराच्या भक्तांनी या यात्रेसाठी तयारी केली आहे. शिवभक्त आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी या यात्रा काळात भगवान शंकराची मनोभावे पूजा करतात. महादेवाचा आशीर्वाद घेण्यासाठी कंवर यात्रा काढली जाते. या यात्रेची सुरुवात कोणी केली, याबाबत पौराणिक ग्रंथांत अनेक कथा सांगितल्या जातात. त्यानुसार श्रवणकुमार, प्रभू राम, परशुराम, रावण यांच्याही नावाचा उल्लेख आहे. भगवान शंकरावर पवित्र नद्यांमधील पाण्यानं जो जलाभिषेक करण्यात येतो त्याला कावड यात्रा म्हणतात.
प्रभू राम, परशुराम हे स्वतः शिवभक्त होते. पण रावणही शिवभक्त होता. रावणानंच भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी दूरवरून कावड करुन पवित्र जल आणले आणि भगवान शंकराचा जलाभिषेक केला. या काळात रावणानं कडक उपवास केला आणि फक्त भगवान शंकराच्या नावाचा जप केला. त्याच्या या भक्तीवर भगवान शंकर प्रसन्न झाल्याची कथा पौराणिक ग्रंथात सांगितली जाते. तेव्हापासूनच ही कावड यात्रा करण्याची प्रथा चालू झाल्याची माहिती आहे. कथेनुसार समुद्रमंथनाच्या वेळी विष बाहेर पडल्यावर भगवान शंकरानं ते आपल्या गळ्यात ठेवले.
त्यामुळे त्याचा घसा निळा झाला. यामुळे शिवशंकराला होणारा दाह कमी करण्यासाठी रावणाने पुरा महादेव मंदिरात गंगेच्या पाण्याने भगवान शंकराचा अभिषेक केला. त्यामुळे भगवान शंकराला होणारा दाह कमी झाला. तेव्हापासूनच याच काळात ही कंवरिया यात्रा केली जाते आणि भगवान शंकराला पवित्र नद्यांच्या जलानं अभिषेक घातला जातो. (Kawad Yatra)
कावड यात्रा सामान्य कावड, डाक कावड, खडी कावड आणि दांडी कावड या चार प्रकारात केली जाते. यातील पहिली सामान्य कावड यात्रा करतांना यात्रेकरुन वाटेत आपल्या सोयीप्रमाणे थांबून विश्राम करु शकतात. डाक कावड यात्रेत कंवरियाला नदीच्या पाण्याने भगवान शंकराला अभिषेक करेपर्यंत सतत चालावे लागते. त्यांनी एकदा प्रवास चालू केला की तो जलाभिषेकानंतरच संपतो. या कंवरियांसाठी मंदिरात विशेष व्यवस्था करण्यात येते. नंतर येते ती दांडी कावड यात्रा. ही सर्वात कठिण यात्रा मानली जाते. यातील कंवरिया शंकराच्या नावाच जयघोष करीत मार्गक्रमण करतात. हा सर्व प्रवास अनवाणी करावा लागतो. या यात्रेत यात्रेकरु हे शक्यतो भगव्या रंगाचे कपडे घातलात.
================
हे देखील वाचा : जगन्नाथ मंदिराची कथा
===============
यात्रादरम्यान कंवरिया आपली कावड जमिनीवर ठेऊ शकत नाहीत. रात्रीच्या वेळी ही कावड एखाद्या झाडाच्या सहाय्यानं ठेवली जाते. २२ जुलैपासून सुरु होणारी ही यात्रा १९ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अलिकडच्या वर्षात कंवरिया यात्रेकरुंचे प्रमाण वाढले आहे. दरवर्षी सुमारे १.२ कोटी कंवरीया पवित्र गंगाजल घेण्यासाठी हरिद्वारला येतात. तिथून ते इच्छित शिवमंदिरात जाऊन भगवान शंकराला अभिषेक घालतात. आत्ताही या यात्रेसाठी उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंडमधून कंवारिया हरिद्वारला येत असून पुढच्या काही दिवसात कंवरियांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. (Kawad Yatra)
हे कंवरिया पाणी नेण्यासाठी बांबूच्या काठीवरील टोपल्यांचा वापर करतात. हा कावड खांद्यावर घेऊन प्रवास केला जातो. झारखंड येथील देवघरच्या वैद्यनाथ मंदिरातही हजारो कावडधारी भगवान शंकराच्या जलाभिषेकासाठी येतात. महाराष्ट्रातील परळी वैजनाथ मंदिरातही कांवडयात्रेकरुंची गर्दी होते. या यात्रेसाठी सर्वच शिवमंदिरात विशेष तयारी करण्यात येत आहे.
सई बने