सध्या दिल्लीच्या राजकारणात एलिझाबेथ हे नाव गाजत आहे. एलिझाबेथ या आसमचे काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांच्या पत्नी आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी एलिझाबेथ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हिमंता बिस्वा यांनी सोशल मिडियावर पोस्ट टाकून एलिझाबेथ या पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयच्या एजंट असल्याचा गंभीर आरोप केला आहे. भाजप नेते गौरव भाटिया यांनीही या आरोपांचे समर्थन करत एलिझाबेथ यांच्याबरोबर लग्न झाल्यापासून गौरव गोगोई यांनी भारताच्या संरक्षण विभागासंदर्भात अधिक प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रश्नाला मिळालेल्या उत्तरांच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तचर संघटनेला भारतीय शस्त्रास्त्रांची माहिती मिळत असल्याचे सांगितले आहे. हेमंता बिस्वा यांच्या या आरोपांमुळे दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. (Elizabeth Gogoi)
गौरव गोगोई यांनी हे आरोप फेटाळून, माझी पत्नी पाकिस्तानी गुप्तचर संघटनेची एजंट असेल तर मी भारतीय गुप्तचर संघटनेचा एजंट आहे, अशा शब्दात या आरोपांचे खंडन केले आहे. मात्र या आरोपांवर भाजपा ठाम असून काँग्रेस नेतृत्वानं याबाबत उत्तर द्यावे आणि भारतीय गुप्तचर विभागानं याबाबत चौकशी करावी अशी मागणी केली आहे. आसामच्या राजकारणात गोगोई आणि बिस्वा हे परस्परांचे कट्टर विरोधक मानले जातात. काँग्रेसमध्ये असलेल्या बिस्वा यांनी जवळपास दहा वर्षापूर्वी गोगोई यांच्या राजकारणाला कंटाळून भाजपात प्रवेश केला. त्यानंतर या दोघांमधील वाद अधिक वाढले आहेत. हेमंत बिस्वा यांनी आसमामध्ये सीएए लागू कऱण्याची घोषणा केली, तेव्हा याच गौरव गोगोई यांनी संसदेत कडाडून विरोध केला होता. आता या गौरव गोगोईंना त्यांच्या पत्नीच्या माध्यमातून हेमंत बिस्वा शर्मा यांनी घेरलं आहे.
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा हे आपल्या आक्रमक स्वभावामुळे ओळखले जातात. या हेमंत बिस्वा यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी आसाम काँग्रेस नेते आणि खासदार गौरव गोगोई यांच्या पत्नी एलिझाबेथ गोगोई यांना लक्ष केले आहे. मुळ ब्रिटीश नागरिक असलेल्या एलिझाबेथ यांचे पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था, आयएसआयशी संबंध असल्याचा आरोप हेमंत बिस्वा यांनी आपल्या पोस्टमधून केला आहे. ही पोस्ट सोशल मिडियावर आली आणि एकच खळबळ उडाली. हेमंत बिस्वा हे आसामचे मुख्यमंत्री आहेत. एका मुख्यमंत्र्यांने जाहीर केलेल्या या पोस्टमुळे दिल्ली आणि आसाममध्येही गोंधळ निर्माण झाला. काँग्रेस आणि गोगोई यांनी हे आरोप हास्यास्पद असल्याचे सांगितले. तर भाजपानं यासंदर्भात हेमंत बिस्वा यांची बाजू घेत या आरोपांमध्ये तथ्य़ आहे, याची चौकशी झाल्यावर हे आरोप सिद्ध होतील, असे सांगितले.
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी एलिझाबेथ गोगोई यांच्यावरील आरोप खरे असल्याचे सांगून काही उदाहरणेही दिली आहेत. त्यानुसार 2015 मध्ये गौरव गोगोई यांनी ‘पॉलिसी फॉर युथ’ या संस्थेच्या माध्यमातून पाकिस्तान उच्चायुक्तालयाला भेट दिली होती. त्यावेळी गौरव हे संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे सदस्य नव्हते, त्यामुळे त्यांच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याशिवाय गौरव गोगोई यांनी संसदेत भारतीय तटरक्षक दलाची रडार प्रणाली, शस्त्रास्त्र कारखाने, संरक्षण उपकरणे आणि भारत-इराण व्यापार मार्ग यासारख्या संवेदनशील मुद्द्यांवर प्रश्न विचारले आहेत.(Elizabeth Gogoi)
मात्र आसामच्या या खासदारानं त्यांच्या मतदार संघातील प्रश्न कधीही विचारला नाही. पण भारतीय सैन्यांबद्दल गोगोई यांनी विचारलेल्या प्रश्नाबाबत हेमंता बिस्वा यांनी संशय व्यक्त केला आहे. व्यावसायीक पार्श्वभूमी असलेल्या ब्रिटिश महिलेबरोबर लग्न केल्यापासूनच हा बदल झाल्याचेही हेमंता बिस्वा यांनी सांगितले आहे. याशिवाय एलिझाबेथ या काही काळ पाकिस्तानमध्ये होत्या, असेही हेमंता बिस्वा यांनी सांगितले आहे. हेमंत बिस्वा यांचे आरोप खरे असून एलिझाबेथ आणि पाकिस्तान नियोजन आयोगाचे सल्लागार अली तौकीर शेख आणि आयएसआय यांचा संबंध असल्याचा दुजोरा भाजपाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी दिला आहे. याशिवाय त्यांच्या नागरिकत्वावर प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहेत.
यामुळे सध्या एलिझाबेथ यांच्याबद्दल चर्चा सुरु झाली आहे. ब्रिटीश वंशाच्या एलिझाबेथ कोलबर्न यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्थेत पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांची आणि गौरव गोगई यांची ओळख 2010 मध्ये झाली. या दोघांनी 2013 मध्ये लग्न केलं. एलिझाबेथ आणि गौरव गोगोई यांना दोन मुलेही आहेत. लग्नापूर्वी एलिझाबेथ या क्लायमेट अँड डेव्हलपमेंट नॉलेज नेटवर्क मध्ये काम करत होत्या. याच सीडीकेएनला भाजपानं लक्ष केलं आहे. या सीडीकेएनच्या आडून पाकिस्तानी गुप्तचर संघटना, आयएसआय काम करत असल्याचा आरोप आहे. सीडीकेएन हवामान बदल, विकास धोरण आणि संशोधन याबाबत काम करते. याच सीडीकेएनमध्ये एलिझाबेथ यांनी युरोपियन युनियनच्या हवामान बदल पॅकेजवर काम केले आहे. याशिवाय त्यांनी युरोपियन युनियनसाठी ओव्हरसीज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमध्येही काम केले आहे. याशिवाय एलिझाबेथ यांनी टांझानिया आणि दक्षिण आफ्रिकेतील स्वयंसेवी संस्थांसाठीही काम केल्याची माहिती आहे.(Elizabeth Gogoi)
=============
हे देखील वाचा : Chhatrapati Shivaji Maharaj : जाणून घ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टराज्ञींबद्दल!
=============
एलिझाबेथ गोगोई यांच्या माध्यमातून हिमंता बिस्वा यांनी पुन्हा गोगोई कुटुंबाला लक्ष केले आहे. आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई आणि त्यांचे पुत्र गौरव गोगोई यांच्या आसाम काँग्रेसमधील एकाधिकारशाहीमुळेच 2015 साली भाजमध्ये प्रवेश केला. आता या गोगोई-बिस्वा वादाचा पुढचा टप्पा सुरु झाला आहे. गौरव गोगोई यांनी बिस्वा यांचे सर्व आरोप हे हास्यास्पद असल्याचे सांगितले आहे. मात्र एलिझाबेथ गोगोईंवर आरोप गंभीर असून याबाबत अधिक चौकशी करावी अशी मागणी भाजपानं केल्यामुळे पुढचे काही महिने एलिझाबेथ गोगोई हे नाव दिल्ली आणि आसामच्या राजकारणात गाजत रहाणार आहे.
सई बने