Home » Ayatollah Khamenei : इराणमध्ये सत्तांतराची चाहूल !

Ayatollah Khamenei : इराणमध्ये सत्तांतराची चाहूल !

by Team Gajawaja
0 comment
Ayatollah Khamenei
Share

इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे संपूर्ण जग तणावात आहे. या सर्वात आता कॅनडामध्ये होत असलेल्या जी 7 शिखर परिषदेला अर्ध्यावर सोडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वॉशिंग्टनला परतले आहेत. शिवाय ट्रम्प यांनी तेहरान त्वरित खाली करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. दुसरीकडे, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना मारण्याची प्रतिज्ञाच घेतली आहे. खामेनी यांच्या मृत्यूनंतरच हे युद्ध थांबेल आणि इराणच्या नागरिकांना नवे शासक मिळतील असेही नेतान्याहू यांनी सांगितले आहे. 86 वर्षीय अयातुल्ला अली खामेनी हे इस्रायलचे एक नंबरचे शत्रू आहेत. (Ayatollah Khamenei)

हमास या दहशतवादी संघटनेला पाठिंबा देत इस्रायलवर अनेक हल्ले करण्यास प्रोत्साहन देणा-या खामेनी यांना इराणच्या सत्तेवरुन पायउतार व्हावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण करण्यात येत आहे. अमेरिकेतील ट्रम्प सरकारचीही खामेनी यांनी नाराजी ओढवून घेतली आहे. त्यामुळे खामेनी यांना इराणच्या सत्तेपासून दूर करण्यासाठी इस्रायला अमेरिकेनंही मंजूरी दिल्याची माहिती आहे. खामेनी पायउतार झाल्यावर त्यांच्या पश्चात इराणची सत्ता कोणाकडे येणार याची चर्चा सुरु झाली आहे. यात खामेनी यांच्या मुलाच्या नावाचीही चर्चा होत आहे. मात्र स्वतः खामेनी हे परिवार वादाविरुदध आहेत, शिवाय इस्रायल हल्ल्यामध्ये इराणच्या लष्करी फळीतील वरिष्ठ अधिकारीही मारले गेले आहेत. अशावेळी इराणमध्ये कोणाची सत्ता येईल, याची चर्चा सुरु झाली आहे. अयातुल्ला खामेनी यांनी इराणमध्ये सर्वोच्च धार्मिक नेता, म्हणून आपली पकड कशी घट्ट केली, याचीही चर्चा सुरु आहे. या सर्वात खामेनी यांचे भारताबरोबर असलेले संबंधही चर्चेत आहेत. इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे. (International News)

खामेनी यांचे वाढते वय आणि त्यांच्या जीवाला असलेला धोका पाहून खामेनी यांचा उत्तराधिकारी कोण होईल, याचा शोध सुरु झाला आहे. शिवाय इस्रायली सैन्य लवकरच तेहरानमध्ये जमिनीवरील मोर्चा सांभाळणार असून अयातुल्ला खामेनी यांनी ताब्यात घेणार अशी शक्यता आहे. यासाठीच डोनाल्ड ट्रम्प हे कॅनडामधून व्हाईट हाऊसमध्ये परतल्याची चर्चा सुरु झाली आहे. यामुळे अयातुल्ला खामेनी यांच्यानंतर कोण, हा प्रश्नही विचारला जात आहे. या सर्वात अयातुल्ला खामेनी या नावाचा अर्थ जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. आयतुल्ला ही पदवी उच्च इस्लामिक पदांवर असलेल्या विद्वानांना दिली जाते. ‘देवाचे चिन्ह’ किंवा ‘देवाचे महान चिन्ह’ असा त्याचा अर्थ सांगितला जातो. खामेनी या शब्दाचा अर्थ भारताबरोबर जोडला गेलेला आहे. खामेनी यांचे आजोबा सय्यद अहमद मुसावी यांचा जन्म भारतातील उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील किंतूर गावात झाला होता. त्यांचे वडिल इस्लामचा प्रचार करण्यासाठी इराणहून भारतात आले होते. (Ayatollah Khamenei)

1830 मध्ये, ते लखनौहून इराकमधील नजफ शहरातील अलीच्या दर्ग्याला भेट देण्यासाठी गेले आणि इराणच्या मरकझी प्रांतातील खोमेनी या छोट्या शहरात स्थायिक झाले. 1869 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांना पाच मुलं होती. त्यापैकी एक मुस्तफा आणि मुस्तफाचा मुलगा रुहोल्ला होता. रुहोल्लाहने आपल्या नावापुढे खामेनी नाव कायम ठेवले. 1979 मध्ये याच रुहोल्लाहने इराणमध्ये इस्लामिक क्रांतीचा पाया रचला. इराणमधील शाह राजवंशाचे शासक मोहम्मद रजा पहलवी यांचे सरकार त्यांनी उलथवून टाकले आणि रुहोल्लाह खोमेनी 1989 पर्यंत इराणचे सर्वोच्च नेते झाले. त्यांच्या मृत्यूनतंर त्यांचे पुत्र अयातुल्ला अली खामेनी यांच्या हाती इराणची सत्ता आली. अयायतुल्ला खामेनी यांनी इराणची सत्ता हाती घेताच इराणमध्ये अनेक बंधने घालायला सुरुवात केली. मुख्य म्हणजे, महिलांचे स्वातंत्र्य संपुष्टात आले. इराण भविष्यात जगावर राज्य करणार, त्यासाठी त्याला अणुसज्ज देश करण्याच्या विचारानं ते पछाडले गेले, आणि त्यांनी इराणमध्ये अणुकार्यक्रम सुरू केला. याच अणुकार्यक्रमाची परिणीती आजच्या इराणमध्ये झाली आहे. (International News)

स्वतः खामेनी हे आपल्या परिवारासह एक बंकरमध्ये लपल्याची माहिती आहे. 86 वर्षीय खामेनींचा उत्तराधिकारी कोण असा शोधही सुरु झाला आहे. खामेनी स्वतः इराणमधील कुटुंबवादाचे कट्टर विरोधक असले तरी त्यांचा दुसरा मुलगा मुज्तबा हाच इराणचा उत्तराधिकारी होण्याची शक्यता अधिक आहे. याच खामेनी यांनी एकेकाळी वंशपरंपरागत राजवटीला गैर-इस्लामी मानले होते हे लक्षात घेतले पाहिजे. सध्या इस्रायली क्षेपणास्त्रांनी उद्धवस्त होत असलेल्या इराणची परिस्थिती त्यांचा मित्रदेश पाकिस्तानपेक्षा वेगळी नाही. इराणच्या लोकसंख्येपैकी एक तृतीयांश पेक्षा जास्त नागरिक दारिद्र्यरेषेखाली राहतात. लोकशाही समर्थक कार्यकर्त्यांना तिथे तुरुंगात टाकण्यात आले आहे. अयातुल्ला खामेनी यांच्या शासनात अनेक पत्रकार, समाजसेवक, महिला कार्यकर्त्या अचानक गायब झाल्या आहेत. महिलांवर होत असलेल्या अत्याचाराला कट्टरतेच्या नावाखाली खामेनी यांनी पांघरुण घातले आहे. (Ayatollah Khamenei)

===========

हे देखील वाचा :  Israel : इस्रायलचा पॅटर्न आणि मोसादचे प्लॅनिंग !

इऱाणमधील हे सर्व अत्याचार अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनतंरच संपणार असल्याचे आता इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू सांगत आहेत. खामेनी हे इराणच्या कट्टरपंथी विचारसरणीचे आणि प्रादेशिक दहशतवादाचे मूळ आहेत त्यामुळे त्यांना काढून टाकणे, गरजेचे असल्याचा दावाही नेतान्याहू करतात. आता या सर्वांचा शेवट होत आल्याचे चित्र आहे. सध्या इस्रायली हल्ल्यांपासून वाचण्यासाठी तेहरान सोडून हजारो नागरिक जात आहेत. अमेरिका या युद्धात एन्ट्री मारणार अशी शक्यता आहे. असे झाले तर मध्य पूर्वेतील एका मोठ्या युद्धाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. यात रशिया, चीन आणि अनेक मुस्लिम देश देखील सामील होऊ शकतात. यानंतर इराणचा पुढचा शासक कोण हे नक्की होणार आहे. (International News)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.