विश्वास गेला पानिपतच्या युद्धात अशी म्हण आहे. ही म्हण पेवशव्यांच्या पानिपत युद्धाच्या पराभवानंतर रूढ झाली. याचप्रमाणे जर कोणी आपल्याला बोलण्यात गुंतवून आपल्याला आर्थिक गंडा घातला असेल किंवा फसवणूक केली असेल, तर त्या व्यक्तीला नटवरलाल (Natwarlal) या नावाने ओळखले जाते. तर हे नटवरलाल म्हणण्यामागची कहाणी नक्की काय आहे? कोण आहे हा नटवरलाल?
काही व्यक्ती त्यांच्या चांगल्या कर्माने लक्षात राहतात, तर काही कुकर्माने कुप्रसिद्ध होतात. फसवणूक करणारा नटवरलाल त्याने केलेल्या आर्थिक फसवणुकीच्या घटनांमुळे लोकांच्या लक्षात राहिला आहे.
नटवरलालचे (Natwarlal) मूळ नाव मिथिलेश कुमार श्रीवास्तव. मूळचा बिहारी असलेल्या मिथिलेशकडे समोरच्याला इम्प्रेस करण्यासाठी आवश्यक असणारे उत्तम संवादकौशल्ये होते. त्याने गोड बोलून अनेकांना आर्थिक गंडा घातला. इतकंच नाही तर, पोलिसांपासून ओळख लपविण्यासाठी मिथिलेशने तब्बल ५६ नावांनी ओळख निर्माण केली.
नटवरलालच्या खाजगी आयुष्याबद्दल सांगायचे तर, व्यवसायाने तो वकील होता. वकिलीचा अभ्यास पूर्ण झाल्यावर त्याने पटवारीची नोकरी केली होती. नटवरलालचे लग्न झाल्यानंतर काही काळातच त्याची पत्नी जग सोडून गेली. अपत्य नसल्याने नटवरलाल एकटाच राहत होता. वकिलीत मन रमले नाही म्हणून त्याने हेराफिरी आणि ठगेगिरी करण्यात आयुष्य घालवले. गोड बोलून फसविण्याबरोबरच त्याला खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करणं सहज जमत असे. तसेच कोणत्याही व्यक्तीची हुबेहूब सही करण्याचं कसब त्याला अवगत होतं.

एका कार्यक्रमात त्यानी डॉ.राजेंद्र प्रसाद यांची हुबेहूब सही करत उपस्थितांना “कोणती सही खरी आणि कोणती खोटी” या पेचात टाकलं होतं. फसवणूक करून आर्थिक लूट करण्यासाठी त्याची पहिली शिकार होता त्याचा शेजारी. बाजुला राहणाऱ्या व्यक्तीच्या चेकवर तंतोतंत तशीच खोटी सही करून मिथिलेशने त्या व्यक्तीला त्यावेळी १००० रुपयांचा गंडा घातला होता. इथूनच पुढे त्याचा आत्मविश्वास वाढला आणि पुढे अनेकजण त्याच्या जाळ्यात अडकत गेले.
नटवरलालने राष्ट्रपतींच्या खोट्या सह्या करून तीन वेळा ताजमहल, दोनवेळा लाल किल्ला आणि एकदा राष्ट्रपती भवन विकून टाकण्याचा पराक्रम गाजवला होता. दिल्ली, हरियाणा, बिहार आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये त्याचे कारनामे चांगलेच चर्चेत होते. त्याच्याविरुद्ध या सर्व राज्यांमध्ये तक्रारी दाखल होऊ लागल्या. परंतु, नटवरलाल चालाख होता, त्यामुळे प्रत्येकवेळी तो पोलिसांना चकवा देत फरार होण्यात यशस्वी होत असे. अखेर, या सर्व राज्यांनी त्याला पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले. पोलिसांनी त्याला ९ वेळा पकडले. परंतु, प्रत्येकवेळी पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून नटवरलाल पळून जात असे.
अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले आणि नटवरलालला पकडून कोर्टात हजर करण्यात आले. इतके गुन्हे करूनही नटवरलालने केवळ ११ वर्ष तुरुंगवास भोगला. त्याने केलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीकरिता त्याला तिहार जेल मधून कानपुर न्यायालयात दाखल केले तेव्हा तो ७५ वर्षांचा होता.
त्यावेळी त्याच्यासोबत तीन पोलीस कॉन्स्टेबल सोबत होते. “श्वास घ्यायाला त्रास होत असून, मला औषध आणून द्या. माझे नातेवाईक कोर्टात तुम्हाला पैसे देतील”, असं सांगून त्याने एका कॉन्स्टेबलला औषधे आणायला, तर दुसऱ्याला पाणी आणायला पाठवले आणि तिसऱ्या कॉन्स्टेबलला आपल्या सोबत वॉशरूमला येण्यास सांगितले.
हे ही वाचा: या महत्वाच्या कारणांसाठी आवर्जून बघा ‘शार्क टॅंक इंडिया'(Shark Tank India)
एसबीआय (SBI) संबंधित या ७ महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
“वय झाल्याने नीट चालता येत नाही म्हणून दोरीच्या साहाय्याने मला घेऊन चल म्हणजे गर्दीतून जाताना लोक मला रस्ता देतील”, असे कॉन्स्टेबल सांगितले आणि गर्दीचा फायदा घेऊन दिल्ली रेल्वे स्थानकावरून धूम ठोकली. या घटनेनंतर त्या तीन कॉन्स्टेबलांना नोकरीवरून निलंबित करण्यात आले होते.
हे सुद्धा वाचा: Unknown Places: पृथ्वीवरची पाच अशी ठिकाणं, ज्यांचा जगाशी काहीही संबंध नाही
एका वकीलाने नटवरलालच्या मृत्यूची फाईल २००४ मध्ये पोलिसांकडे सुपूर्द केली. त्याच्या नातेवाईकांच्या स्टेटमेंटनुसार नटवरलाल १९९६ मध्ये मृत झाला होता. परंतु, त्याचा मृत्यू नेमका कसा आणि केव्हा झाला, या प्रश्नाचे उत्तर अजूनही अनुत्तरित आहे. फसवणूक म्हणजे नटवरलाल आणि नटवरलाल म्हणजे फसवणूक, हे समीकरण पक्के होत गेले. म्हणून कोणी कोणाला फसवले, तर त्या व्यक्तीसाठी नटवरलाल (Natwarlal) हे विशेषण वापरले जाते.