सध्या आपल्याकडे कलाकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, राजकीय हस्तक्षेप या सर्वांवर मोठी चर्चा चालू आहे. असे वादविवाद आणि चर्चा ही सुदृढ लोकशाहीचे प्रतिक समजली जाते. पण या वादविवादामुळे एका कलाकाराची आठवण होतेय, या कलाकाराचं नाव आहे, पेंग ताखॉन (Paing Takhon).
पेंग ताखॉन (Paing Takhon) हा म्यानमारचा अभिनेता आहे आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचा मॉडेल आहे. इंस्टाग्रामवर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. याशिवाय जगभरातील सुंदर चेहरा असलेल्या पुरुषांच्या क्रमवारीत पेंग पहिल्या दहामध्ये आहे. पण सध्या हा अभिनेता जेलमध्ये आहे.
सविनय कायदेभंग चळवळीला प्रोत्साहन आणि सोशल मीडियाचा वापर करून राज्याच्या शांतता, स्थैर्याला हानी पोहोचवल्याबद्दल पेंग ताखॉन याला म्यानमार सरकारने काही महिन्यापूर्वी अटक केली. भल्या पहाटे लष्कराच्या गाड्या आल्या आणि पेंगला ताब्यात घेतलं. त्याला अटक झाली तेव्हा त्याच्यावर औषधोपचार चालू होते. मात्र याची कुठलीही पर्वा न करता त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं आहे. विशेष म्हणजे पेंग कुठे आहे, कसा आहे, याची काहीही माहिती त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली नाही.
सोशल मिडीयावर लोकप्रिय असलेल्या या मॉडेलच्या अटकेनं म्यानमार सरकारवर टिकाही झाली. मात्र त्या टिकेचा म्यानमार सरकारवर काहीही परिणाम झालेला नाही. उलट सरकारने ‘देशहिताला मारक आहेत’, असा ठपका ठेऊन देशातील अनेक सेलिब्रिटी, पत्रकार, कार्यकर्ते, लेखक यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशच दिले आहेत.
इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स असलेला पेंग ताखॉन (Paing Takhon) अवघ्या चोवीस वर्षाचा आहे. एवढ्या कमी वयात त्याने कोणालाही हेवा वाटेल असे यश गाठले. परंतु, यशाच्या शिखरावर असताना त्याला जेलमध्ये जावे लागले.
पेंग ताखॉनचा जन्म १७ सप्टेंबर १९९६ रोजी म्यानमारमधील कावथौंग भागात झाला. एकूण सहा भावंडांपैकी पेंग दिसायला अत्यंत देखणा. पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यावर तो मॉडेल म्हणून काम करु लागला. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या एजन्सीचा तो प्रमुख मॉडेल होता. जाहीराती, म्युझिक व्हिडीओ, मासिकाचे कव्हर अशा ठिकाणी पेंगचे फोटो झळकू लागले. त्याला हॉलिवूडमधून चित्रपटासाठी ऑफरही आल्या. मिडनाईट ट्रॅव्हलर, अलॉन्सिगे नांग यासारख्या चित्रपाटात भूमिकाही केल्या.
म्यानमारमधील सर्वात लोकप्रिय अभिनेता म्हणून पेंग ओळखू जाऊ लागला. पेंग उत्कृष्ट गायकही आहे. त्याने आपला ‘चिट थू’ हा अल्बम लॉन्च केला. त्यातून आलेले सर्व पैसे एका अनाथ मुलांच्या शाळेला दिले. म्यानमार टुरिझम मार्केटिंग असोसिएशनने त्याची म्यानमारचा पर्यटन राजदूत म्हणून नियुक्ती केली. याशिवाय पॉन्ड्स, ओप्पो, टेलिनॉर, सनकिस्ट, टी247 एनर्जी ड्रिंक, एमजी व्हेइकल्स, सैलून टायर या प्रमुख ब्रँडसाठी म्यानमारचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून काम केले.
सन २०२० मध्ये एका मासिकानं जगातील सर्वात सुंदर चेहरा म्हणून पेंग ताखॉनचा गौरव केला. कंबोडियन दिग्दर्शक लीक लिडा दिग्दर्शित ‘द क्लॉक: रेड वॉल’ या चित्रपटासाठी त्याचे कास्टींगही झाले. पेंग व्यवसायिकही आहे. एका सौदर्य उत्पादक कंपनीचा तो संस्थापक आहे. पेंगच्या प्रगतीची घोडदौड चालू होती.
सन २०२१ मध्ये म्यानमारमध्ये सत्ता बदल झाला. याविरोधात पेंग रस्त्यावर उतरला. सोशल मिडीयाच्या माध्यमातून लष्करी उठावाचा निषेध केला. निदर्शनांमध्ये भाग घेतला. ‘वी वॉन्ट जस्टिस’ या आंदोलनात पेंग यांचा सहभाग जागतिक स्तरावर बातमीचा विषय झाला. मात्र लष्करी उठावाच्या विरोधात बोलल्याबद्दल, राज्य प्रशासन परिषदेने पेंगच्या अटकेचे वॉरंट जारी केले. अनेक सेलिब्रेटींसह त्याच्यावरही आरोप ठेवण्यात आले.
हे ही वाचा: किस्सा महेंद्र कपूर (Mahendra Kapoor) यांच्या रशियन भाषेतील गाण्याचा!
पाकिस्तानमध्ये नवा इतिहास रचणाऱ्या आयशा मलिक (Ayesha Malik) नक्की आहेत तरी कोण?
वॉरंट जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच पहाटे पाच वाजता पेंगला त्याच्या आईच्या घरातून अटक करण्यात आली. पेंगला अटक झाली तेव्हा त्याच्यावर दमा आणि इतर आजारावर उपचार चालू होते. पेंगला अटक करण्यासाठी ८ लष्करी वाहने आणि सुमारे ५० सैनिक त्याच्या आईच्या घरी आले. त्यांनतर त्याला अटक करुन कुठे नेले, याची माहिती त्याच्या नातेवाईंकांना देण्यात आली नाही.
हे सुद्धा वाचा: डोकं चक्रावून टाकणारे जगातील ५ विरोधाभास! बघा तुम्हाला काही सुचतंय का? (Top 5 Paradoxes)
पेंगला जेव्हा अटक झाली तेव्हा तो आजारी होता. त्याला औषधोपचाराची तातडीनं गरज होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत त्याच्या हाताला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अटकेपासून जगातील सर्वात सुंदर चेहरा म्हणून गौरविलेला पेंग कुठे आणि कसा आहे, याची माहिती कोणालाही नाही. आपल्याकडे कलाकारांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सरकारी हस्तक्षेप यावर चर्चा रंगली असताना पेंग ताखॉनची आठवण होणं अगदी स्वाभाविक आहे.
– सई बने