इलहान ओमर (Ilhan Omar) या अमेरिकी कॉँग्रेसवूमन! अमेरिकेतल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या राजकारणी! त्या मिनेसोटा या अमेरिकेमधील प्रांताचं प्रतिनिधित्व करतात. ओमर या अमेरिकी कॉँग्रेसमधल्या पहिल्या सोमाली – अमेरिकन आणि पहिल्या मुस्लिम महिला राजकारणी आहेत. त्यांच्याबद्दल आज बोलायचं कारण काय? असा प्रश्न सहाजिकच विचारला जाऊ शकतो. त्याचं कारण पण विशेष आहे. या ओमर बाईनी अमेरिकी हाऊस ऑफ रिप्रेजेन्टटेटीव्ह मध्ये भारताविरुद्ध ठराव मांडला आहे. काय आहे हा ठराव?
ओमर यांचं म्हणण आहे की, भारतामध्ये सातत्याने मानवी हक्कांचं उल्लंघन होत असतं. त्यांच्या मते भारतातल्या मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, दलित तसंच आदिवासी आणि इतर अल्पसंख्याक समाजामधल्या लोकांच्या मानवी हक्कांची पायमल्ली होत आहे. हा ठराव ओमर यांनी अमेरिकी कॉँग्रेसच्या रशिदा तालिब आणि युआन वर्गा यांच्या मदतीने हाऊसमध्ये मांडला आहे.
इलहान ओमर (Ilhan Omar) यांनी भारताला “कंट्री ऑफ पर्टीक्युलर कन्सर्न” या इतर देशांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी हा ठराव मांडला आहे. याचा अर्थ काय? हे जाणून घेण्यासाठी ‘कंट्री ऑफ पर्टीक्युलर कन्सर्न’ हा काय प्रकार आहे हे जाणून घेऊयात.
‘कंट्री ऑफ पर्टीक्युलर कन्सर्न’ म्हणजे अमेरिकी राष्ट्रपतीच्या अधिकृत अधिकाराअंतर्गत, अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवाने, ज्या देशाने ‘इंटरनॅशनल रीलीजियस फ्रीडम ॲक्ट’ या कायद्यानुसार ज्या देशाने अल्पसंख्याक समाजाच्या मानवी हक्कांचं उल्लंघन केलं आहे अशा देशाला ‘कंट्री ऑफ पर्टीक्युलर कन्सर्न’ या वर्गवारीत समावेश करण्याचा अधिकार प्राप्त होतो. अल्पसंख्याक समाजाच्या मानवी हक्कांचं उल्लंघन म्हणजे त्यामध्ये छळ, अमानविय शिक्षा, विचार न करता डांबून ठेवणे, अपहरण करून गायब करणे इ. गोष्टी ज्या देशात होत असतील त्या देशावर आर्थिक निर्बंध लादण्याचा अधिकार अमेरिकेला प्राप्त होतो. अर्थात इथे हे नमूद करायला पाहिजे की अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांना हा ठराव मानणं आणि त्यानुसार कारवाई करणं बंधनकारक नाही.
या ठरावामागे, भारताचा या अशाप्रकारच्या देशांच्या यादीत समावेश केल्यास भारतावर निर्बंध लादता येतील, असा विचार आहे हे स्पष्ट आहे. या यादीतले इतर देश आहेत कोमोरोस, क्युबा, निकारागवा आणि रशिया. या प्रकारच्या ठरावामध्ये असा उल्लेख आहे की, भारताचा सलग तीन वर्ष या ‘कंट्री ऑफ पर्टीक्युलर कन्सर्न’ यादीत समावेश करावा आणि भारतावर निर्बंध लादावेत. हा ठराव अमेरिकेच्या फॉरेन अफेअर्स कमिटीकडे पाठवण्यात आला आहे. त्यावर काय निर्णय होईल तो होईल. आता थोडं ओमर यांच्याविषयी बोलूयात.
इलहान ओमर (Ilhan Omar) आणि वादविवाद हे समीकरणच आहे. ओमर यांचा जन्म आफ्रिकेतल्या सोमालिया देशातल्या मोगादीशू इथला. वडील सोमाली सैन्य दलात होते. ओमर यांच्या आईंचं निधन इलहान २ वर्षाच्या असताना झालं. इलहान यांना मग त्यांच्या आजोबानी आणि वडीलानी सांभाळलं. सोमालियात गृहयुद्ध सुरू झाल्यानंतर ओमर कुटुंबाने सोमालीया सोडून अमेरिकेत आश्रय घेतला. हे साल होतं १९९५. पुढे शिक्षण, आणि राजकारणातला प्रवेश असा त्यांचा सगळा प्रवास या दरम्यान झाला. इलहान ओमर (Ilhan Omar) यांचे आजोबा अमेरिकेत कधी कधी राजकीय सभांना जायचे तेव्हा इलहान त्यांच्यासोबत जायच्या. इथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला चालना मिळाली, असं आपण म्हणू शकतो.
====
हे देखील वाचा – G7 म्हणजे काय? जर्मनीतील G7 शिखर परिषदेला नरेंद्र मोदींना आमंत्रण का देण्यात आलं?
====
इलहान ओमर (Ilhan Omar) आणि वादविवाद हे समीकरण आहे हे म्हणण्यामागे ठोस स्वरूपात तशा गोष्टी घडल्या आहेत. ओमर यांनी सौदी अरेबिया तसंच चीन मधल्या अल्पसंख्याक समाजाच्या बाजूने बोलताना मानवी हक्कांचं या दोन देशांकडून उल्लंघन होत आहे, असे आरोप केले. त्यांनी सिरियातल्या आसाद रेजीम (सरकार) वर टीका केली. त्यानी ट्रंप यांच्यावर टीका केली आणि इराणच्या बाजूने बोलताना मत व्यक्त केलं. थोडक्यात इराणच्या राजकीय भूमिकेला पाठिंबा दिला. हे झालं मानवी हक्कांविषयी.
ओमर यानी इजराईलच्या पॅलेस्टाईन धोरणावर वेळोवेळी टीका केली आहे. त्यांचा अमेरिकेतल्या ज्यू लॉबीला विरोध आहे आणि एकूणच इस्राइलला विरोध आहे. तसंच LGBTQ समाजाला त्यांनी पाठिंबा दिला आहे, मग ते पॅलेस्टाईन गट का असेनात. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर कडाडून टीकासुद्धा त्यांनी केली आहे. त्यांच्या मते अमेरिकेला इतके मिलिटरी बेसेस ते पण जगात सगळीकडे असण्याचा काय उपयोग आहे. कर भरणाऱ्यांचा पैसा हा मिलिटरीसाठी वापरला जातो, म्हणून इलहान यांनी या अमेरिकेच्या सैनिकी धोरणावर टीका केली आहे.
हे सगळं एका बाजूला ठेवून ओमर यांच्या भारताविषयी भूमिका पाहूया. जेव्हा जेव्हा भारताबद्दल अमेरिकेत कॉँग्रेशनल हिअरिंगचा मुद्दा उपस्थित झाला तव्हा तेंव्हा इलहान ओमर यांनी भारताच्या धोरणबद्दल निषेध नोंदवला. तसंच खोचकपणे भारताविरुद्ध भूमिका घेतली. हे त्यांचे पूर्वग्रहदूषित मत होते.
भारत पाकिस्तान मुद्द्यावर ओमर यांनी सतत पाकिस्तानची बाजू उचलून धरली. पाकिस्तानच्या मानवी हक्क धोरणांबद्दल ओमर का बोलल्या नाहीत? का पाकिस्तान मध्ये अल्पसंख्याक समाजाच्या बाजूने भूमिका घेतली नाही? जसे भारतामध्ये अल्पसंख्याक आहेत तसेच पाकिस्तानमध्येही आहेत. मग भारताला वेगळा नियम आणि पाकिस्तानला वेगळा नियम, अशी भूमिका का? हे अनाकलनीय आहे. बरं कहर म्हणजे एप्रिल महिन्यात ओमर बाई पाकव्याप्त काश्मीरला भेट देऊन आल्या आणि भारताविरुद्ध गरळ ओकली. भारताने त्यांच्या या भेटीबद्दल कडक शब्दात निषेध नोंदवला आणि याबद्दल आक्षेपसुद्धा घेतला आहे.
====
हे देखील वाचा – व्हाईट हाऊसच्या प्रमुख पदासाठी नामांकित डॉ आरती प्रभाकर नक्की आहेत तरी कोण?
====
इलहान ओमर (Ilhan Omar) यांचं द्वेषाचं राजकारण यातून दिसून येतं. एकीकडे मानवी हक्कांबद्दल सजग असणाऱ्या ओमर दुसरीकडे जिथे मानवी हक्क डावलले जातात अशा पाकिस्तानबद्दल गप्प तसंच, भारतालाच यावर सुनवणे आणि सतत भारताविरुद्ध भूमिका घेणे हे कितपत योग्य आहे, हे त्यांनीच ठरवावे. शेवटी सांगायचं म्हणजे भारताला नामोहरम करणे ही भूमिका सोडून उघड्या डोळ्यांनी जर ओमर यांनी पाहिलं, तर त्यांची भूमिका ही कशी पूर्वग्रहदूषित आहे हे त्यांच्याच लक्षात येईल.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची भूमिका ही अमेरिकेची भूमिका नाही. असं जरी असलं तरी भारत – अमेरिका संबंध मजबूत होत असताना भारताबद्दल अशाप्रकारच्या पूर्वग्रहदूषित मत व्यक्त करणाऱ्या अमेरिकी राजकारण्यांच्या भूमिकेवर अमेरिकी प्रशासनाने लक्ष घालायला हवं.
-निखिल कासखेडीकर