द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) हे नाव काल सायंकाळपासून चर्चेत आले आहे. काल सायंकाळी भाजपाने राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा केल्यावर मुर्मू यांच्याबाबत उत्सुकता वाढली. आदिवासी महिला नेत्या, आदर्श शिक्षिका ते झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल असा द्रौपदी मुर्मू यांचा आदर्शवत प्रवास आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. पुढील राष्ट्रपती निवडणुकीसाठी १८ जुलै रोजी मतदान होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून २९ जून ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळेच भाजपातर्फे राष्ट्रपतीपदासाठी कोणाचे नाव जाहीर होणार, याची उत्सुकता होती. आता द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांचे नाव जाहीर झाल्याने अनेकांना मुर्मू यांचा जीवनप्रवास जाणण्याची उत्सुकता आहे.
संथाल नावाच्या आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांचा जन्म 20 जून 1958 रोजी ओडीसा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी येथील रायरंगपूर गावांत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बिरांची नारायण तूडू आहे. मुर्मू यांचे शिक्षण भुवनेश्वर येथील रमादेवी वुमेंन्स कॉलेज येथे झाले.
पदवी प्राप्त केल्यावर त्यांनी शिक्षिका म्हणून कारकीर्द सुरु केली. त्याचदरम्यान त्यांनी ओडीशामधील राजकारणात प्रवेश केला. मयूरभंजच्या रायरंगपूरा या मतदार संघात त्या दोनवेळा भाजपाच्या आमदार होत्या. अत्यंत हुशार आणि तेवढ्याच संयमी स्वभावाच्या द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी पक्षाच्या विविध पदांवर काम केले आहे.
=====
हे देखील वाचा – अतिशय साधे जीवन जगतात योगी आदित्यनाथ, ‘इतक्या’ संपत्तीचे आहेत मालक
=====
एका अत्यंत साधारण आदिवासी कुटुंबात जन्म घेतलेल्या द्रौपदी मुर्मू यांचे संपूर्ण जीवन संघर्षमय असेच आहे. त्यांनी राजकीय क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रात केलेले कामही उल्लेखनीय आहे. ‘आदर्श शिक्षिका’ म्हणून त्या परिचीत आहेत. रैरंगपुर येथील श्री अरबिंदो इंटीग्रल एजुकेशन सेंटर मध्ये त्यांनी विनावेतन अध्यापनाचे कार्य केले आहे.
आमदार म्हणूनही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. 2007 मध्ये ओडिसा विधानसभेमध्ये सर्वश्रेष्ठ विधायक म्हणून ‘नीलकंठ पुरस्कार’ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला होता. ओडिसातील भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल युती सरकारच्या काळात, वाणिज्य आणि वाहतूक, मत्स्यव्यवसाय आणि पशुसंसाधन विकास राज्यमंत्री म्हणून कामकाज पाहिले आहे.
झारखंड राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणूनही द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) ओळखल्या जातात. 18 मे 2015 ते 12 जुलै 2021 या काळत मुर्मू झारखंडच्या राज्यपाल होत्या. झारखंडच्या नवव्या राज्यपाल असलेल्या मुर्मू देशातील पहिल्या आदिवासी महिला राज्यपाल आहेत. द्रौपदी मुर्मू यांच्या पतीचे, श्याम चरण मूर्मू यांचे निधन झाले असून त्यांना इतिश्री नावाची विवाहीत मुलगी आहे.
द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या राज्यपाल असताना त्यांनी घेतलेले प्रशासनीक निर्णय गाजले होते. आता राष्ट्रपतीपदासाठी त्यांचे नाव नक्की झाले आहे. त्यांची निवडही नक्की मानण्यात येत आहे. देशाला लवकच एक आदर्श शिक्षिका राष्ट्रपती म्हणून मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे, असं म्हणायला हरकत नाही.
– सई बने