अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस (George Soros) यांचे नाव सध्या आंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चेत आलं आहे. नव्वदी उलटलेल्या या सोरोस महाशयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यांनी खळबळ उडाली आहे. सोरोस यांच्या वक्तव्यांचा भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी तिव्र शब्दात निषेध केला आहे. एवढंच काय काँग्रेसकडूनही सोरोस यांच्या वक्तव्यांचा निषेध केला आहे. यानंतर हे अब्जाधीश नेमके कोण आहेत याचा शोध सुरु झाला. तेव्हा फक्त नरेंद्र मोदीच नाही तर अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांच्यामागेही जॉर्ज सोरोस (George Soros) लागले होते हे समजले. सोरोस यांनी गौतम अदानी यांच्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या वक्तव्यावर भारताच्या लोकशाहीत कोणीही हस्तक्षेप करू नये, असे म्हणत भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. सोरोस याआधीही चर्चेत राहिले आहेत. जॉर्ज बुश अमेरिकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या विरोधातही त्यांनी भूमिका मांडली होती. तर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही त्यांनी ठग म्हटले आहे. या सर्व वाद-विवादांमध्ये जॉर्ज सोरोस (George Soros) यांचा सणकी म्हातारा असा उल्लेख करण्यात आला. अब्जोधिश असणारे हे सोरोस नेमके कोण आहेत, हे जाणून घेऊयात.

92 वर्षांचे जॉर्ज सोरोस (George Soros) हे अमेरिकन-हंगेरियन अब्जाधीश आहेत. सोरोस स्वत:ला गरजूंचा अन्नदाता म्हणवून घेतात. त्यांचा जन्म 12 ऑगस्ट 1930 रोजी एका ज्यू कुटुंबात झाला. आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचा समावेश आहे. त्यांची एकूण संपत्ती 6.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या जवळपास आहे. सोरोस 9 वर्षांचे असताना दुसरे महायुद्ध सुरू झाले. या काळात हजारो ज्युंचे हत्याकांड झाले. हंगेरीत ज्यू कुटुंबाला शोधून त्यांना मारण्यात येत होते. यातून वाचण्यासाठी जॉर्ज यांच्या कुटुंबीयांनी बनावट ओळखपत्र बनवून हंगेरीतून पलायन केले. 1945 मध्ये युद्ध संपल्यानंतर हे कुटुंब लंडनला आले. इथे जॉर्ज यांच्या प्रभावाला सुरुवात झाली. 1947 मध्ये, सोरोस यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. हे शिक्षण करताना त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती सामान्य होती. परिणामी त्यांनी वेटरचे कामही केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर सोरोस (George Soros) अमेरिकेत आले. सोरोस यांनी 1973 मध्ये स्वतंत्र कंपनीची स्थापना केली. आर्थिक क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीचे निर्णय घेऊन आर्थिक जगात आपला ठसा उमटवला. सोरोस यांनी सुरुवातीला न्युयॉर्कमध्ये युरोपियन सिक्युरिटीजसाठी विश्लेषक म्हणूनही काम केले.
जॉर्ज सोरोस (George Soros) हे अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांचे सर्वात मोठे टीकाकार होते. जॉर्ज डब्ल्यु. बुश यांना सत्तेवरून हटवणे हे त्यांचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी 2003 मध्ये जाहीर केले. या दोघांमध्ये वैर एवढं वाढलं होतं की, जॉर्ज बुश यांची सर्व संपत्तीही माझ्या नावावर करुन घेईन, असं वादग्रस्त वक्तव्यही सोरोस यांनी केलं होतं. आर्थिक क्षेत्रात सोरोस कामय पुढे होते. शीतयुद्ध संपल्यानंतर, त्यांनी 70 पेक्षा जास्त देशांमध्ये ओपन सोसायटी फाउंडेशनची स्थापना केली. ते राजकीयदृष्ट्या सक्रिय राहिले. त्यांचे राजकीय स्थान त्यांच्या संपत्तीमुळे अबाधित राहिले. बराक ओबामा, हिलरी क्लिंटन आणि जो बिडेन यांच्या अध्यक्षीय मोहिमांना त्यांनी पाठिंबा दिला. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांनी विरोध केला.
==========
हे देखील वाचा : रशियन युक्रेन युद्धाला वर्ष पूर्ण झालं तरी…
==========
आता मात्र, जॉर्ज सोरो ( George Soros) यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विधानं केली आहेत. जॉर्ज सोरोस म्हणाले की, भारत हा लोकशाही देश आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाहीवादी नसून हुकूमशहा आहेत. त्यांच्या या विधानांचा सत्ताधारी भाजपानं चांगलाच समाचार घेतलाच, शिवाय या टीकेला विरोधकांनीही विरोध केला. पंतप्रधान मोदींवर टिप्पणी केल्यानंतर परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सोरोस यांना लक्ष्य केले. त्यांनी थेट सोरोस (George Soros) यांचा वृद्ध, श्रीमंत आणि धोकादायक अशा शब्दात उल्लेख केला. एवढंच नाही तर काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी जॉर्ज सोरोसला प्रत्युत्तर दिले आहे. मोदी सरकार इतके कमकुवत नाही, आणि भारताच्या विषयात परदेशातील व्यक्तींनी मत नोंदवू नयेत अशा शब्दात चिदंबरम यांनी सोरोस यांना समज दिली आहे.
सई बने