अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री कोण हा सगळ्यांनाच प्रश्न पडला होता. मात्र आता आम आदमी पार्टीने आणि अरविंद केजरीवाल यांनी आतिशी या दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री असतील याची घोषणा केली. आतिशी यांच्या नावाची घोषणा होताच एकच जल्लोष झाला. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आतिशी यांचे नाव सुरुवातीपासूनच आघाडीवर होते.
आतिशी या आम आदमी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या विश्वासू नेत्या आहेत. मुख्यमंत्री पदासाठी आतिशी यांच्या निवडी मागे त्या महिला असणे आणि मंत्री असणे या जमेच्या बाजू मानल्या जात आहेत. केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात ज्या महिला मंत्र्यांकडे सर्वाधिक खाती आहेत त्यापैकी आतिशी या एक आहेत. यासोबतच मुख्य बाब म्हणजे आम आदमी पक्षाच्या स्थापनेनंतर विधानसभा निवडणुकीसाठीचा आपचा जाहीरनामा आतिशी यांनीच तयार केला होता. सध्या त्यांच्याकडे महिला व बालविकास, शिक्षण, पर्यटन, कला, संस्कृती व भाषा, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वीज या खात्यांचा कारभार आहे.
आतिशी कोण आहेत ?
आतिशी यांचा जन्म ८ जून १९८१ रोजी एका उच्चशिक्षित कुटुंबात झाला. आतिशी यांचे वडील विजय सिंह आणि आई तृप्ता वाही हे दोघेही प्राध्यापक होते. मार्क्स आणि लेनिन यांच्या विचारांनी आतिशी मोठ्या प्रमाणावर प्रभावित होत्या. त्यामुळेच त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना ‘मार्लेना’ असं नाव दिले. तेव्हापासून त्यांना आतिशी मार्लेना म्हणूनच ओळख मिळाली. मात्र, सक्रिया राजकारणात आल्यानंतर त्यांनी आडनाव न वापरण्याचा निर्णय घेतला. सध्या त्या आतिशी याच नावाने ओळखल्या जातात.
आतिशी यांचे कॉलेजपर्यंतचे शिक्षण दिल्लीतूनच झाले. आतिशी यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून इतिहास या विषयात पदवी घेतली असून नंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाची शेवनिंग स्कॉलरशिप मिळवून त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली. मात्र पुढे त्या उच्च शिक्षणासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात गेल्या.
आतिशी या २०१९ मध्ये सक्रिय राजकारणात आल्या. त्यावेळी आम आदमी पक्षाने आतिशी यांना पूर्व दिल्लीतून भाजपचे उमेदवार गौतम गंभीर यांच्या विरोधात उमेदवारी दिली होती. यात आतिशी यांचा या निवडणुकीत चार लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला. मात्र त्यानंतर कालकाजी विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आणि त्या विजयी झाल्या.
माजी मंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी कायदेशीर अडचणींमुळे राजीनामा दिल्यानंतर मार्च २०२३ मध्ये आतिशी यांचा दिल्ली मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यांनी शिक्षण, सार्वजनिक बांधकाम विभाग, ऊर्जा आणि पर्यटन या खात्यांचा कार्यभार सांभाळला. त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीचा त्यांच्या शैक्षणिक सुधारणांच्या कार्यावर लक्षणीय परिणाम झाला आहे.
======
हे देखील वाचा : आतिशी मार्ले दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री
======
दरम्यान अरविंद केजरीवाल सरकारमध्ये आतिशी यांच्याकडे सर्वाधिक खात्यांची जबाबदारी आहे. माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. आतिशी दिल्ली सरकारमधील उच्चशिक्षित मंत्र्यांपैकी एक आहेत.
एका मुलाखतीमध्ये आतिशी यांनी त्यांच्या आडनावाबद्दल काही गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. त्या म्हणाल्या होत्या की, “माझे खरे आडनाव सिंग आहे. मी पंजाबी राजपूत कुटुंबातली आहे. जर मला मतांसाठी खरंच काही करायचं असतं, तर मी माझे खरे आडनाव वापरले असते. मला लोकांना माझी ओळख पटवून देण्यात वेळ घालवायचा नाहीये.”