डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी अमेरिकेचा सुवर्णकाळ सुरु झाल्याची घोषणा केली. त्याचवेळी त्यांनी एकामागून एक असे जे निर्णय घेतले, त्या निर्णयांचा जगावर मोठा परिणाम होणार आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे, जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिका बाहेर पडली आहे. WHO चा सर्वाधिक मोठा देणगीदार देश म्हणून अमेरिकेचा उल्लेख होत होता. मात्र ही WHO अमेरिकेकडून जास्त देणगी घेते आणि त्याचा फायदा अमेरिकेला होत नसल्याचा ट्रम्प यांचा दावा होता. तसेच चीनकडून अत्यंत कमी देणगी घेणारी ही संघटना अमेरिकेच्या पैशाचा अपव्यय करते, याबाबत ट्रम्प ठाम होते, त्यामुळे त्यांनी WHO मधून माघार घेतली आहे. सोबत पनामा कालवा, ब्रीक्स, पॅरिस हवामान करार आणि बंदी टाळण्यासाठी टिकटॉकला 75 दिवसांची मुदत देणे यासह अनेक निर्णयांचा समावेश आहे. (Donald Trump)
राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयानं जगभर खळबळ उडाली आहे. त्यातील पहिला मोठा निर्णय म्हणजे, WHO मधून अमेरिका बाहेर पडली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी या निर्णयावर स्वाक्षरी करतांना सांगितले की, जागतिक आरोग्य संस्थेने कोविड-19 साथीचा रोग आणि इतर आंतरराष्ट्रीय आरोग्य संकटे योग्यरित्या हाताळली नाहीत. WHO स्वतंत्रपणे काम करू शकत नाही शिवाय ही संघटना अमेरिकेकडून अवास्तव मोठ्या प्रमाणात पैसे मागत आहे, तर चीनकडून खूपच कमी रक्कम घेत आहे. अमेरिका हा WHO ला निधी देणाऱ्या सर्वात प्रमुख देशांपैकी एक आहे. (International News)
पण अमेरिकेला त्याचा फायदा होत नसल्यामुळे आपण या संघटनेतून बाहेर पडत असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले. यासह डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म टिकटॉकच्या कामकाजाची मुदत 75 दिवसांनी वाढवण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. अमेरिकेत टिकटॉकचे 17 कोटी लोक वापर करीत आहे. कॅनडा आणि मेक्सिकोवर कर जाहीर करण्यात आले आहेत. आता अमेरिका 1 फेब्रुवारीपासून कॅनडा आणि मेक्सिकोवर 25 टक्के कर लादेल. यासोबत ट्रम्प यांनी असा निर्णय घेतला आहे की, त्याचा फटका भारतालाही बसण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांवर 100% कर लावण्यावर भाष्य केले आहे. ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा समावेश आहे. स्पेन ब्रिक्सचा भाग नसूनही तो देश ट्रम्पच्या रडारवर आहे. ब्रिक्स देशांनी अमेरिकन डॉलर कमकुवत करण्याच्या प्रयत्नात नवीन चलन आणले तर अमेरिका त्यांच्यावर 100 टक्के कर लादेल, असा इशारा ट्रम्प यांनी यापूर्वीही दिला आहे. (Donald Trump)
ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्याच्या पहिल्याच दिवशी आणखी एक मोठा निर्णय घेतला. राष्ट्राध्यक्षपदाच्या व्यापक माफीच्या अधिकारांचा वापर करत त्यांनी अमेरिकेच्या न्याय विभागाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या प्रकरणाची चौकशी आणि खटला संपवला. 6 जानेवारी 2021 रोजी अमेरिकन संसद भवन संकुल, यूएस कॅपिटलवर झालेल्या हल्ल्यातील आरोपी आणि त्यांच्या सुमारे 1500 समर्थकांना त्यांनी माफी दिली आहे. या हल्ल्यात 100 हून अधिक पोलिस अधिकारी जखमी झाले होते. यासह ट्रम्प पॅरिस हवामान करारातून अमेरिका बाहेर पडणार हे जाहीर केले आहे. त्यांच्या या घोषणेमुळे जागतिक तापमानवाढीला तोंड देण्याच्या जागतिक प्रयत्नांना धक्का बसणार आहे. ट्रम्प यांनी मेक्सिकोच्या सीमेवर आणीबाणी लागू करण्याचा धडाडीचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी सांगितले की, आपल्या देशावरील विनाशकारी आक्रमण थांबवण्यासाठी मी दक्षिणेकडील सीमेवर सैन्य पाठवणार असून आम्ही बेकायदेशीर स्थलांतरितांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करू, असे सांगत मेक्सिकोच्या आखाताचे नाव बदलून अमेरिकेचे आखात करणार असल्याचेही जाहीर केले. (International News)
==================
हे देखील वाचा : Viral Monalisa : रातोरात स्टार बनलेल्या मोनालिसाला फिल्म्सच्या ऑफर ?
Donald Trump : ट्रम्पंनी का बदलली शपथविधीची परंपरा !
==================
यासह ट्रम्प यांनी पनामा कालव्याबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे भविष्यात वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी पनामा कालवा परत घेण्याचे आश्वासन देत पनामाला नियंत्रण देणे हा “मूर्खपणाचा” निर्णय असल्याचे मत व्यक्त केले आहे. याशिवाय त्यांनी युनायटेड स्टेट्स सरकारचे अधिकृत धोरण हे, पुरुष आणि महिला असे फक्त दोन लिंग असल्याचे जाहीर करत आणखी एक धक्का दिला आहे. ट्रम्प यांचे हे धडाडीचे निर्णय पहाता पुढच्या महिन्यात त्यावरुन मोठा वाद निर्माण होण्याचीही शक्यता आहे. त्यात पनामा कालव्यावरील त्यांचा दावा हा चीन आणि संबंधित देशांमध्ये तणाव वाढवण्यास कारणीभूत ठरणार आहे. (Donald Trump)
सई बने