Home » व्हाईट हाऊसला पाणीपुरीची चटक

व्हाईट हाऊसला पाणीपुरीची चटक

by Team Gajawaja
0 comment
White House
Share

भारतातील लहान मुलींपासून कुठल्याही वयावृद्ध महिलेला विचारा, त्यांचा आवडता पदार्थ कुठला तर पहिलं नाव येईल, ते पाणीपुरीचे.  भारतात सर्वाधिक आवडीचा चाटपदार्थ म्हणून या पाणीपुरीचे नाव घेतले जाते.  मैदा किंवा रव्याची छोटीशी कडक पुरी,  त्यात पुदीन्याचे आणि कोथिंबीरीचे हिरवे पाणी, चिंच गुळाची चटणी,  सोबतीला बुंदीचे दाणे, पांढ-या वाटाण्याचा रगडा.  हे एवढे अमृत मिश्रण तोंडात गेले की जो तृप्तीचा भाव चेह-यावर येतो, त्याला तोड नाही. 

त्यामुळेच भारतातील गल्लीबोळात पाणीपुरीच्या गाड्या उभ्या आहेत.  सोबतच अगदी पंचतारांकित हॉटेलमध्येही पाणीपुरीचे स्टॉल असतात.  त्यातील देण्याची पद्धत जरी वेगळी असली तरी त्याचा तो स्वाद हा अमृततुल्यच असतो.  त्यामुळेच या भारतातील लाडक्या पाणीपुरीची चटक अमेरिकेतील व्हाईट हाऊसलाही (White House) लागली आहे. हे सांगितले तर आश्चर्य वाटेल, पण अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमधील (White House) पार्ट्यांमध्ये आता या चटकदार पाणीपुरीचाही समावेश होऊ लागला आहे.

व्हाईट हाऊसमध्ये अनेक मेजवान्यांचे आय़ोजन करण्यात येते.  तसाच हेरिटेज महिना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या उपस्थितीत व्हाईट हाऊसमध्ये साजरा करण्यात आला. (White House)आशियाई अमेरिकन्स, नेटिव्ह हवाईयन आणि पॅसिफिक बेटवासीयांसाठी राष्ट्रपती सल्लागार आयोगाच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या कार्यक्रमासाठी भारतीय अमेरिकन लोकांनाही आमंत्रित करण्यात आले होते.  त्यासाठी दिलेल्या मेजनावीत पाणीपुरी, समोसा आणि खव्याच्या मिठाईचा समावेश होता.  हा कार्यक्रम अमेरिकेत राहणाऱ्या अल्पसंख्याकांच्या सन्मानार्थ साजरा होतो.  तमाम भारतीयांचा आवडता चाट पदार्थ पाणीपुरी उपस्थितांना मिळाल्यावर सर्वांना आश्चर्य वाटले.

अमेरिकन भारतीय समुदायाचे नेते अजय जैन हे या मेजवानीला उपस्थित होते.  पाणीपुरी बघितल्यावर त्यांचा आनंद गगनात मावेना.  त्यांनी लगेच या पाणीपुरीचा फोटो काढून सोशल मिडियावर शेअर केला.  आणि आपली पाणीपुरी व्हाईट हाऊसमध्येही दाखल अशी ओळ लिहिली.   या फोटोला प्रचंड लाईक मिळाले असून सर्वत्र पाणीपुरीच्या चवीचा महिमा चर्चिला जाऊ लागला.  या मेजवानीमध्ये अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिसही उपस्थित होत्या, आणि त्यांनीही या पाणीपुरीवर चांगलाच ताव मारला आहे.  

भारतीय खाद्यपदार्थांची चव एकदा कुणी चाखली तर त्या चवीला ते कधीही विसरु शकत नाहीत.  आज अमेरिकेमध्ये भारतीय पदार्थांची अनेक हॉटले आहेत.  जिथे अमेरिकन नागरिकही मोठ्या संख्येनं जाऊन भारतीय पदार्थांचा आस्वाद घेतात.  याच भारतीय चवीला व्हाईट हाऊसमध्येही स्थान देण्यात आले आहे. (White House) व्हाईट हाऊससच्या मेन्यूमध्ये समोसा, बिर्याणी, जिलेबी अशा अनेक पदार्थांचा समावेश आहे.  त्यात आता पाणीपुरीची भर पडली आहे.  या पाणीपुरीचा थेला मेजवानीत जिथे असतो, त्या भागाला भारतीय स्ट्रीट फूड कॉर्नर असे नाव देण्यात आले होते. तेथील समोसा आणि पाणीपुरीवर उपस्थितांनी ताव मारला.(White House)  

या कार्यक्रमाला कोविड-१९ विरुद्धच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे यूएस सर्जन जनरल डॉ. विवेक मूर्ती यांच्यासह अनेक आशियाई अमेरिकन आणि भारतीय अमेरिकन उपस्थित होते.  या सर्वांनी व्हाईट हाऊसच्या कार्यकारी शेफ क्रिस्टेटा कॉमरफोर्ड यांचे परफेक्ट पाणीपुरीच्या चवीबद्दल कौतुक केले आहे. (White House) या चटपटीत पाणीपुरीसोबत गोड चवीची खोया मिठाईही पाहुण्यांना देण्यात आला. 

या सर्व चवदार पदार्थांची चव फक्त भारतीय नागरिकांनी चाखली आहे असे नाही, तर अमेरिकेतील मान्यवरांनीही या पाणीपुरीचा आस्वाद घेतला.  अनेक परदेशी नागरिकांनी पाणीपुरी खाण्यासाठी भारतीयांचे मार्गदर्शन घेतले.  पण जेव्हा हा चवीचा गोळा त्यांच्या तोंडात गेला, तेव्हा एक नंबर अशी खूण या सर्वांना केली.  त्यानंतर जवळपास सर्वच पाहुण्यांनी या पाणीपुरीची चव चाखली. (White House) 

==============

हे देखील वाचा : ओठांना मध लावण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे

==============

व्हाईट हाऊसच्या शेफ क्रिस्टेटा कॉमरफोर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली एक स्वतंत्र टिम फक्त भारतीय पदार्थांसाठी व्हाईट हाऊसमध्ये आहे. (White House) या सर्वांनीच पाणीपुरीची तयारी केली.  त्याच्या पु-या तयार करण्यापासून ते पाणीपुरीमध्ये वापरण्यात येणा-या चटण्या आणि पुदीना, कोथिंबीरीचे पाणी तयार करणे हा सर्व वेगळा अनुभव असल्याचे क्रिस्टेटा कॉमरफोर्ड यांनी सांगितले.

 हा पदार्थ तयार करतांना अनेकवेळा त्याची चव चाखायला लागली.  या चवीने आम्हालाही भुरळ घातल्याचे त्यांनी सांगितले आहे.  अर्थातच पाणीपुरीचे हेच तर वैशिष्ट आहे.  एकदा का पाणीपुरी चाखली की पुन्हा पुन्हा ती खावीशी वाटते.  आता काही दिवसात व्हाईट हाऊस पाणीपुरीच्या प्रेमात पडल्याची बातमी आली तर नवल नको.  (White House)

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.