अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथील व्हाईट हाऊस या इमारतीमधील प्रत्येक घटनेवर जगभरातील राजकारण्यांचे लक्ष असते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान आणि मुख्य कार्यस्थळ असलेल्या व्हाईट हाऊसच्या चाव्या आता एका 27 वर्षीय युवतीच्या हाती आहेत. या तरुणीचे नाव आहे, कॅरोलाइन लेविट. कॅरोलाइन ही व्हाईट हाऊस प्रेस सेक्रेटरी आहे. व्हाईट हाऊसच्या इतिहासात हे पद भुषणवणारी कॅरोलाइन ही सर्वात कमी वयाची तरुणी ठरली आहे. कॅरोलाइनची या पदासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवड केली तेव्हा अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. (Karoline Leavitt)
कारण जगभरातील पत्रकारांना तोंड देण्याची जबाबदारी या व्हाईट हाऊस प्रेस सेक्रेटरीची असते. महत्त्वाचे म्हणजे, ही व्यक्ती हजरजबाबी असावी लागते आणि राष्ट्राध्यक्षांची पत तिला सांभाळावी लागते. या सर्वात आणखी एक कसोटी म्हणजे, ट्रम्प सारख्या लहरी राष्ट्राध्यक्षांची मर्जी सांभाळणे. कारण गेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकालात ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस प्रेस सेक्रेटरी पदावर चौघांना नेमलं होतं. आता कॅरोलाइन सारखी तरुणी हा सर्व भार कसा सांभाळणार अशी शंका व्यक्त होत होती. मात्र कॅरोलाइननं अगदी थोड्या दिवसातच ती या पदासाठी किती योग्य असल्याचा दाखला दिला आहे. जिथे अमेरिका आणि चीन या दोन देशात विस्तवही जात नाही, अशी परिस्थिती आहे, त्याच चीनमध्ये सध्या कॅरोलाइनचे जबरदस्त चाहते तयार झाले आहेत. कॅरोलाइनचा ठामपणा, तिची हुशारी आणि हजरजबाबीपणा याचे अनेक व्हिडिओ चीनच्या सोशल मिडियामध्ये फिरत आहेत. अमेरिकेसोबत वाद असले तरी कॅरोलाइनबाबत चीनी मिडियामध्ये चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. कॅरोलाइन ही जबाबदार आणि प्रभावशाली महिला असल्याचा उल्लेख करत व्हाईट हाऊसच्या चाव्या तिच्या हातात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. (International News)
सध्या बदलत्या धोरणांमुळे अनेक देशांबरोबर अमेरिकेचे संबंध ताणले गेले आहेत. त्यामध्ये चीनचा नंबर सर्वात वरचा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत चीनमधील मिडियामध्ये नाराजी व्यक्त होत असली तरी व्हाईट हाऊसची प्रेस सेक्रटरी कॅरोलाइन लेविट हिच्याबाबत मात्र स्तुती सुमने उधळण्यात येत आहेत. चीन-अमेरिका व्यापार युद्धादरम्यान ट्रम्प हे चीनच्या सोशल मिडियामध्ये खलनायकासारखे दाखवण्यात येत आहेत. तर व्हाईट हाऊसच्या इतिहासातील सर्वात तरुण, व्हाईट हाऊस प्रेस सेक्रेटरी कॅरोलाइन लेविट मात्र नायिकेसारखी पुढे आली आहे. (Karoline Leavitt)
कॅरोलाइनचे अनेक व्हिडिओ क्लिप्स चीनमधील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात पत्रकारांच्या तीव्र प्रश्नांना उत्तरे देताना कॅरोलाइन ट्रम्पच्या धोरणांचा कशापद्धतीनं बचाव करते, हे दाखवणारी एक व्हिडिओ क्लिप आहे. यातून तिच्या स्पष्टवक्त्या शैलीचे आणि आत्मविश्वासाचे चीनमध्ये कौतुक करण्यात येत आहे. तसेच एक व्हिडिओमध्ये एका पत्रकाराला जशाच तसे उत्तर देत गप्प करणारी कॅरोलाइन दिसत आहे. कॅरोलाइनचे हे व्हिडिओ चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, वेइबोवर सर्वाधिक पाहिले जात असून तिचा मोठा चाहता वर्ग चीनमध्ये तयार झाला आहे. कॅरोलाइन पहिल्यांदा सर्वासमोर आली ती डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारमोहीमेमध्ये. त्यानंतर 27 वर्षाच्या कॅरोलाइन लेविटची व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी पदासाठी निवड करण्यात आली. हे पद भूषवणारी कॅरोलाइन ही सर्वात तरुण सेक्रेटरी ठरली आहे. यापूर्वी 1969 मध्ये अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी 29 वर्षीय रोनाल्ड झेगलर यांची प्रेस सेक्रेटरी म्हणून नियुक्ती केली होती. कॅरोलाइनने ट्रम्प यांच्या गत कार्यकाळात सहाय्यक प्रेस सेक्रेटरी पदही भूषवले आहे. कॅरोलाइनने कारकिर्दीची सुरुवात व्हाईट हाऊसमध्ये इंटर्न म्हणून केली. (International News)
=============
हे देखील वाचा : Vanuatu : हा वानुआतु नावाचा देश नेमका आहे तरी कुठे..
Devendra Fadanvis : भोंग्यांचं राजकारण पुन्हा महाराष्ट्रात होणार ?
=============
डोनाल्ड ट्रम्प 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर, लेविट रिपब्लिकन राजकारणी एलिस स्टेफनिक यांची सहाय्यक म्हणून तिनं काम केले. सध्या ज्या पदावार कॅरोलाइन आहे, तिथे तिला जगभरातील पत्रकारांच्या प्रश्नांचा सामना करावा लागतो. इथे तिला मीडियाचा विश्वास जिंकावा लागतो. शिवाय राष्ट्रपतींप्रती निष्ठा ठेवावी लागते. ही मोठी तारेवरची कसरत असते. कॅरोलाइन तिच्या खाजगी जीवनाबद्दलही चर्चेत असते. तिनं 2023 मध्ये 60 वर्षीय रिअल इस्टेट व्यावसायिक निकोलस रिकिओ यांच्याबरोबर लग्न केले. या दोघांमध्ये 32 वर्षाचा फरक आहे. कॅरोलाइन आता एका मुलाची आईही आहे. लहानपणापासून हुशार मुलगी म्हणून नावलौकिक प्राप्त असलेली कॅरोलाइन कम्युनिकेशन्स आणि पॉलिटिकल सायन्सची पदवीधर आहे. शाळेत असतानाच, तिने फॉक्स न्यूज आणि व्हाईट हाऊसच्या प्रेस ऑफिसमध्ये इंटर्नशिप केली आहे. या तिच्या सर्व अनुभवाचा फायदा आता तिला व्हाईट हाऊसची प्रेस सेक्रेटरी हे पद सांभाळतांना होत आहे. (Karoline Leavitt)
सई बने