रिंकी खन्ना (Rinke Khanna) म्हटल्यावर आजच्याच काय, पण ९० मध्ये जन्मलेल्या पिढीलासुद्धा चेहरा पटकन डोळ्यासमोर येणार नाही, पण मुधल कनवे किंवा मुसु मुसु हासी म्हटल्यावर गोड चेहऱ्याची रिंकी खन्ना आठवल्याशिवाय राहाणार नाही.
मिसेस फनीबोन नावानं लिहिणाऱ्या, टोकदार विनोदांसाठी ओळखल्या जाणाऱ्या ट्विंकल खन्नानं गेल्या वर्षी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून आपल्याला कोण हमखास हसवू शकतं त्या व्यक्तीचं नाव उघड केलं होतं. ट्विंकलनं या पोस्टमध्ये लिहिलंय, ‘हॅपी बर्थडे रिंकस्टन. तू अशी एकमेव आहेस, जी अगदी उदास- गंभीर क्षणीसुद्धा मला हसवू शकते. सत्तरच्या दशकात शेवटची रिंक्स बनवली गेली आणि त्यानंतर देवाकडून तुझा साचाच हरवला असणार, कारण आता तुझ्यासारख्या बहिणी बनवल्याच जात नाहीत!’

ट्विंकललाही हसवणारी ही व्यक्ती नेमकी कोण आहे याचा अजून उलगडा झाला नसेल, तर ती व्यक्ती आहे, तिची धाकटी बहीण रिंकी खन्ना (Rinke Khanna)! ९० च्या दशकाच्या शेवटाला बॉलिवूडमध्ये आलेली आणि जेमतेम पाच वर्षात पडद्यावरून गायब झालेली अभिनेत्री.
बॉलिवूडमध्ये सहजपणे आलेल्या, सुरुवातीला बरे सिनेमे करून लक्ष वेधून घेतलेल्या, पण आपल्याला अभिनय येत नसल्याचं वेळीच ओळखून अभिनेत्री बनण्याचा हट्ट सोडणाऱ्या नायिकांमध्ये ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना या दोघी बहिणींची नावं सर्वात आधी घ्यावी लागतील. खरंतर राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया अशा दोन तगड्या कलाकारांच्या मुली म्हणून त्यांच्याकडून चाहत्यांच्या बऱ्याच अपेक्षा होत्या, पण तसं काही झालं नाही.
ट्विंकलनं अभिनय सोडल्यावर इंटेरियर डिझायनर आणि त्याहीपेक्षा लेखिका म्हणून चांगलं नाव कमावलं. अक्षय कुमारशी लग्न करून सुखानं संसार करणारी ट्विंकलनं सोशल मीडियावर सक्रिय असते. पण तिची धाकटी बहीण रिंकी बॉलिवूडच काय, पण देशातूनही गायब झाली आहे. (Where is Rinke Khanna now?)
====
हे देखील वाचा – मोनिका बेदी ते मंदाकिनी यांच्यासह ‘या’ अभिनेत्र्यांचे होते अंडरवर्ल्ड डॉनशी नाते
====
रिंकी खन्ना (Rinke Khanna) सोशल मीडियावर तर कधीच सक्रिय नसते. भारतात आलेलीही फारशी दिसत नाही… आलीच, तरी इतर स्टार्सप्रमाणे तिचं येणं- जाणं गाजत नाही. आजच्या पिढीला ती माहीतही नाही, पण तरीही दोन बाबतीत तिची आठवण हमखास काढली जाते. त्यातली एक म्हणजे मुसु मुसु हासी गाणं लागलं, की नाहीतर आज, म्हणजे तिच्या वाढदिवसाला!
रिंकीचं नाव खरंतर रिंकल होतं, पण इंडस्ट्रीत येण्यापूर्वी तिनं आपलं नाव रिंकी केलं. वयाच्या २२ व्या वर्षी सिनेक्षेत्रात येण्यापूर्वी रिंकी हिंदी- इंग्रजी नाटकातून काम करायची. ‘प्यार में कभी कभी’ नावाच्या सिनेमातून तिनं दिनो मोरियासोबत सिनेसृष्टीत पर्दापण केलं. तो सिनेमा साफ आपटला, तरी तिचा प्रसन्न वावर प्रेक्षकांना आवडला.
या चित्रपटानंतर हिंदीत बऱ्यापैकी ऑफर्स असूनही तिनं थेट ‘मजुनु’ या दाक्षिणात्य सिनेमाची निवड केली. सिनेमाचा हिरो प्रशांत आणि तिची जोडी तुफान गाजली हे फार कमी हिंदी प्रेक्षकांना माहीत आहे. त्यांचं ‘मुधल कनवे’ हे गाणं आजही तमिळमधल्या सर्वात लोकप्रिय रोमँटिक गाण्यांपैकी एक आहे. तो सिनेमा सुपरहिट झाला, पण रिंकीनं परत दक्षिणेत काम केलं नाही. असं का, याचं कारण कोणालाच कळलं नाही.

रिंकीनं पुढे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच म्हणजे अक्षरशः नऊ सिनेमे केले. जिस देश में गंगा रहता है, झंकार बीट्स, मुझे कुछ कहना है, जलवा अशा सिनेमांत ती दिसली, पण त्यात ती काहीच चमक दाखवू शकली नाही.
२००३ मध्ये तिनं बॉयफ्रेंड समीर सरनशी लग्न केलं आणि २००४ मध्ये रिंकी शेवटची पडद्यावर दिसली, ती करिना कपूरच्या चमेली सिनेमात. त्यानंतर समीरबरोबर तिनं थेट लंडन गाठत संसार थाटला. तिला एक मुलगा आणि मुलगी आहेत यापलीकडे तिच्या कुटुंबाची माहिती कोणालाच नाही. त्यांचे कधी फोटोही प्रसिद्ध झालेले नाहीत. ट्विंकलने मध्यंतरी त्यांच्या सुट्टीचे फोटो पोस्ट केले, पण त्यातही तिनं टोपीनं आपला चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला. बॉलिवूडपासून ती खूप लांब गेलेल्या मुसु मुसु हासी गर्लला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
– कीर्ती परचुरे