Home » रशियामधले पुरुष गेले तरी कुठे….

रशियामधले पुरुष गेले तरी कुठे….

by Team Gajawaja
0 comment
Russia-Ukraine war
Share

इथे भारतात दिवाळीची धूम चालू होती.  नोव्हेंबर मध्ये जगभरात इयर एंडिंगच्या पार्ट्यांचे प्लॅनिंग सुरु होईल.  आणि तिकडे रशियामध्ये काय चाललंय…तर तिथून पलायन चालू आहे…त्याला कारण ठरत आहेत, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन.  रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान(Russia-Ukraine war) राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनच्या चार प्रांतात लष्करी राजवट जाहीर केली आहे.  शिवाय सर्व पुरुषांना युद्धासाठी तयार राहण्यासाठी सांगण्यात आले आहे. अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील पुरुषांना युद्धात पाठवण्याची तयारी सुरु झाली आहे.  पुतिन यांनी त्यासंदर्भात सूचनाही केली आहे.  पुतिन यांच्या या सुचनेवरुन रशियामध्ये एकच खळबळ उडाली आहे.  सर्व रशियात आता पलायनाची लाटच आल्यासारखे आहे.  रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये तर हॉटेलमध्येच काय पण रस्त्यावरही कुणी पुरुष दिसत नाही.  बहुतेक रशियन पुरुष लष्करात जबरदस्तीनं भरती न होण्यासाठी शेजारच्या देशाचा आसरा घेत आहेत.  आपल्या कुटुंबाची आणि सर्व संपत्तीची जबाबदारी घरातल्या महिलांवर सोपवून रशियन पुरुषांनी दुस-या देशाला आपलंसं केलं आहे.  रशिया युक्रेन युद्धाचे (Russia-Ukraine war) हा आणखी एक पैलूच म्हणावा लागणार आहे.  

रशियाची लोकसंख्या 146.7 दशलक्ष आहे.  जगातील नववा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणजे रशिया आहे. तसेच युरोपमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे.  रशियाची राजधानी मॉस्को हे युरोपमधील सर्वात मोठे शहर आहे.  सेंट पीटर्सबर्ग हे दुसरे मोठे शहर आहे.  याच रशियाच्या राजधानी मॉस्कोमध्ये सध्याचे चित्र फारच चिंताजनक आहे.  कारण या शहरातून पुरुषांना जणू हद्दपार केले आहे, असेच वाटत आहे.  येथील रस्त्यावरच काय पण हॉटेलमध्येही पुरुष दिसत नाहीत.  रशियाचे अध्यक्ष व्दादिमिर पुतिन यांनी पुरुषांना युद्धात पाठवले जाणार अशी घोषणा केली, त्यानंतर  भीतीनेच लाखोंनी रशियातून पलायन केले आहे.  आत्तापर्यंत  2 लाखाच्यावर रशियन पुरुष शेजारच्या कझाकस्तानमध्ये पोहोचले आहेत.  तर अन्य देशात विमानानं जाणा-या पुरुषांची संख्याही वाढली आहे.  

12 दशलक्ष लोकसंख्या असलेली राजधानी मॉस्कोचे चित्र वेगळे झाले आहे. या शहरात आता सर्वत्र महिलांचा वावर आहे. मॉस्कोमध्ये अनेक मोठे बार असून तिथे पुरुषांची अहोरात्र गर्दी असायची.  पण हे सर्व बार आता मोकळे दिसू लागले आहेत.  यात पुरुष ग्राहक अगदी किरकोळ आलेले असतात.  आणि जे येतात, ते आपल्याला सुरुक्षितरित्या कुठे जाता येतील, याची चर्चा करण्यासाठी आलेले असतात.  हॉटेल, मॉल आणि छोटी दुकानेही खाली-खाली दिसू लागली आहेत.  रस्त्यावर शांतता आहे.  आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांचाच वावर जास्त दिसू लागलाय.  फारकाय ज्यांची छोटी दुकानं आहेत, तिथेही महिलाच दुकान सांभाळतांना दिसत आहेत.  एकतर  रशियातील अनेकांनी युक्रेनयुद्धाच्यावेळी (Russia-Ukraine war) सैन्यात भरती होण्यासाठी उत्सुकता दाखवली होती.  मात्र युक्रेन युद्धाचे परिणाम बघता आणि आता पुतिन यांची घोषणा लक्षात घेऊन सर्वांनी आपल्या जीवाला महत्त्व दिले आहे.  त्यामुळेच काहींना काही कारण काढून आपला देश सोडण्याची धडपड चालू आहे.  रशियन सैन्याचे अधिकारीही या पलायनामुळे सतर्क झाले आहेत.  रशियन अधिकार्‍यांच्या माहितीनुसार 200,000 रशियन लोक कझाकस्तानला पळून गेले आहेत.   कझाकस्तानला जाण्यासाठी रशियन लोकांना पासपोर्टची आवश्यकता लागत नाही. त्यामुळे त्यांचे पहिले पसंतीचे ठिकाण तेच ठरले आहे.  याव्यतिरिक्त, जॉर्जिया, आर्मेनिया, अझरबैजान, इस्रायल, अर्जेंटिना आणि पश्चिम युरोपमधील देशांमध्ये अनेक रशियन लोक गेले आहेत. 

=======

हे देखील वाचा : रशिया VS युक्रेन ; युद्धामुळे सुरक्षेसाठी बंकर खरेदीची घाई

=======

रशियामधील काही शहरातील परिस्थिती एवढी भयानक आहे की, तिथे सलूनमध्ये कारागिरही नाहीत.  मास्कोतील एका सलूनचे व्यवस्थापक ओल्या सांगतात, आमचे निम्मे ग्राहक देश सोडून गेले आहेत. पुरुष कारागिरही निघून गेले आहेत. त्यामुळे आमच्यावर मंदिचे संकट आले आहे.  हिच गोष्ट अन्य दुकानांच्या बाबत आहे.  या पलायनामुळे मास्को शहराचा कारभारच कोसळण्याच्या काठावर आहे.  त्यामुळे आता स्थानिक सरकारने कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.  प्रत्येक शहराच्या मेट्रो स्थानकाबाहेर पुरुषांची कागदपत्रे तपासली जात आहेत. तसेच शंका वाटली तर प्रवास करणा-या पुरुषांना रोखण्यातही येत आहे.  काही ठिकाणी महिलाच स्वतःहून आपल्या नव-यांना देश सोडण्यासाठी आग्रह करीत आहेत.  त्यातून त्यांचा जीव सुरक्षित राहिल अशी भावना आहे.  राष्ट्राध्यक्ष पुतिन हे केव्हाही मार्शल लॉ लागू करतील अशी भीती सर्वसामान्यांना वाटत आहे.  तसे केल्यास देशाच्या सीमा सील केल्या जातील अशी भीतीही नागरिकांना आहे. 

रशियाच्या वृत्तपत्रात काम करणारे फोटोग्राफर स्टॅनिस्लावा यांनी नुकतेच आपल्या देशाचे वर्णन केले आहे.  रशिया हा केवळ महिलांचा देश झाला आहे. मेट्रोमध्ये फक्त महिलाच दिसतात. मुलं आणि वडीलधाऱ्यांची जबाबदारी महिलांवर आहे, असे त्यांनी लिहिले आहे.  या रशिया युक्रेन युद्धाचा (Russia-Ukraine war) शेवट कधी होईल हे नक्की माहित नाही.  पण त्याचे किती दुरगामी परिणाम होणार आहेत, हे आता हळूहळू स्पष्ट होत आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.