जगातील सात आश्चर्यांपैकी एक ताजमहल, जे पाहायला जगभरातील लोक येतात. ते ताजमहल आज तिथे नसतंच, जर इंग्रजांचा एक प्लॅन successful झाला असता. तो म्हणजे ताजमहल विकण्याचा प्लॅन. त्याकाळात ब्रिटिशांची तंगी सुरू होती, म्हणून ते तेव्हा ताजमहल भाड्यावर सुद्धा देत होते. त्यांनी एकदा ताजमहलची एक एक लादी काढून विकण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. मथुरेतील एक श्रीमंत माणूस तर ताजमहल पाडून त्यातील संगमरवराचा वापर वृंदावनमध्ये मंदिर बांधण्यासाठी करणार होता. सगळं काही ठरलं होतं, पण शेवटच्या क्षणी एक अडचण आली आणि ताजमहल तुटण्यापासून आणि विकल्या जाण्यापासून वाचला ? ब्रिटिशांनी ताजमहल विकायला का काढलं होता? आणि तो का विकला नाही, जाणून घेऊ. (Taj Mahal)
ब्रिटिश लेखक एडवर्ड लियरच्या म्हणण्यानुसार, जगात दोन प्रकारचे लोक आहेत. एक ते ज्यांनी ताजमहल पाहिलं आहे, आणि दुसरे ते ज्यांनी ताजमहल पाहिलं नाही. ही अप्रतिम वास्तु पाहिल्यानंतर त्याच्या संगमरवरी दगडाबद्दल आणि त्यावर केलेल्या सुरेख कोरीवकामाबद्दल कौतुक केल्याशिवाय राहता येतं नाही. (Story)
शाहजहानानंतर औरंगजेबच्या काळात मुघल साम्राज्य शिखरावर होतं. नंतर हळूहळू मुघल साम्राज्य कमजोर होऊ लागलं आणि ताजमहलची शोभा देखील कमी होऊ लागली. १८ व्या शतकच्या शेवटापर्यंत मुघल साम्राज्य नष्ट होऊ लागलं होतं, आणि ब्रिटिशांची ताकद वाढली होती. पुढे 19व्या शतकाच्या सुरुवातीस, १८०३ मध्ये ब्रिटिशांनी मराठ्यांकडून आग्रा जिंकलं आणि तेव्हा जनरल लेक याची नजर ताजमहलावर पडली. त्याने ताजमहलमधील दुर्लभ गोष्टींना गायब करायला सुरुवात केली. ताजमहलमध्ये असलेले मौल्यवान आणि दुर्मिळ दगड गायब झाले, हे सर्व इंग्रज निडरपणे करत होते, कारण आता आग्रा त्यांच्या ताब्यात होतं. तिथे असणारे वेगवेगळे गालिचे त्यांनी विकले. ताजमहल, आग्रा किल्ल्याचे आणि मुघलांचे अनेक चित्र लंडनला पाठवण्यात आले. याच काळात ब्रिटिशांनी ताजमहलला भाड्याने देण्यास सुरुवात केली होती. ताजमहलाच्या आसपास अनेक लॉज तयार करण्यात आले, जे हनीमूनसाठी दिले जाऊ लागले. (Taj Mahal)
पुढे १८२८ साली, ईस्ट इंडिया कंपनी घाट्यात चालत होती. तेव्हा इंग्रज सत्ता विस्तारत होते, आणि यासाठी त्यांना अनेक ठिकाणी लढायाही लढाव्या लागल्या होत्या. या दरम्यान बर्मा सोबत होणाऱ्या युद्धात ईस्ट इंडिया कंपनी खूपच अडचणीत होती, कारण या युद्धामुळे कंपनीचा खिसा जवळपास रिकामा झाला होता आणि कंपनीवर खूप कर्ज सुद्धा होऊन बसलं होतं. म्हणून मग विलियम बेंटिक याच काळी बंगालचा गव्हर्नर म्हणून भारतात आला, त्याचं काम होतं ईस्ट इंडिया कंपनीच्या खर्चात कपात करणे आणि कर्ज लवकर निपटवणे. (History)
१८३० मध्ये बेंटिक आग्रा दौऱ्यावर गेला. इथे त्याने दोन गोष्टी पाहिल्या, आग्र्यातला लाल किल्ला आणि त्याच्या समोर असलेला ताजमहल. लाल किल्ल्याच्या शाही हमामची पाहणी केल्यानंतर, त्याच्या मनात विचार आला की, यातील संगमरवर विकून चांगला पैसा मिळू शकतो. मग काय हळूहळू त्याने तिथून जेवढा जमेल तेवढा संगमरवर विकला. नंतर बेंटिक ताजमहलला देखील तसंच तोडून विकण्याचा प्लॅन करत होता. पण या प्लॅनचा विरोध स्थानिक जनता करत होती आणि काही ब्रिटिश अधिकारी सुद्धा करत होते. असंही त्यांनी आधी लाल किल्ल्यातील विकलेल्या संगमरवराला हवा तसा भाव मिळाला नव्हता. तरी सुद्धा ब्रिटिशांनी ताजमहल विकण्यासाठी काढला होता. त्यासाठी बोली सुद्धा लावली गेली होती. (Taj Mahal)
===============
हे देखील वाचा : Rammudra : जगातल्या 30 देशांमध्ये राममुद्रा वापरतात, भारतात का नाही ?
===============
१८३१ मध्ये वृंदावनच्या सेठ लक्ष्मीचंद जैन यांनी ताजमहलसाठी बोली लावली होती. तेव्हा ते भारतातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते. ब्रिटीश सरकारने ताजमहलसाठी बोली सुरू केली तेव्हा लक्ष्मीचंद यांनी २ लाख रुपयांची बोली लावली. ही रक्कम ब्रिटीशांना कमी वाटली. काही महिन्यानंतर, आणखी एक बोली त्यांनी लावली, जी त्यावेळी सर्वाधिक ७ लाख रुपयांची होती. लक्ष्मीचंद जैन हे ताजमहल विकत घेऊन त्यातील संगमरवर आणि वेगवेगळ्या गोष्टी वापरुन एक मंदीर बनवणार होते. पण त्याआधीच ही बातमी पसरली की, ब्रिटिश सरकार ताजमहल ७ लाख रुपयांना विकणार आहे. जनता आधीच नाराज होती. त्यात जर ताजमहल सारखी वास्तु पाडली गेली तर दंगली होतील. हे ब्रिटिश सरकारला समजलं आणि त्यांनी हा प्लॅन कॅन्सल केला. (Taj Mahal)
तसं बघायला गेलं तर ताजमहल बनवण्यासाठी शाहजहानला २२ वर्ष लागली होती आणि ३ कोटींपेक्षा अधिक खर्च आला होता. ताजमहालच्या बांधकामासाठी लागणारा पैसा सरकारी तिजोरीतून आणि आग्रा प्रांताच्या तिजोरीतून देण्यात आला होता. ताजमहालाच्या आसपासच्या बाजारपेठांमध्ये आकारल्या जाणाऱ्या करांमधून काही रक्कम ताजमहलसाठी वसूल केली जात असे. आज ताजमहल पाहण्यासाठी देश विदेशातून पर्यटक येतात. जर तेव्हा ताजमहल लिलावात गेला असता, तर आज जगात सहाच आश्चर्य असते.