बनारस, जिथे मृत्यूसुद्धा एक उत्सव समजला जातो, तिथे इतर गोष्टी सामान्य कशा असू शकतात ? आता हेच बघा ना सगळ्यांना होळीचे वेध लागलेत. आता होळी म्हटलं की आपल्याला आठवतात ते विविध रंग आणि धमाल मज्जा मस्ती ! पण या बनारसमध्ये होळी एका वेगळ्याच पद्धतीने खेळली जाते. मगाशी म्हटल्याप्रमाणे जिथे मृत्यसुद्धा सेलीब्रेट केला जातो तिथे होळी सामान्य होळीसारखी कशी असू शकते ? तर इथे रंगांऐवजी, गुलालाऐवजी राख वापरली जाते आणि लाऊड म्युझिक, DJ ऐवजी तांत्रिक मंत्रांचे आवाज सगळीकडे गुंजत असतात. याला ‘मसान की होली’ म्हणतात, जी मणिकर्णिका घाटातील स्मशानभूमीवर खेळली जाते. पण ही केवळ एक परंपरा नाही तर भगवान शिव यांच्या दिव्य खेळाचा एक भाग आहे. चला तर मग जाणून घेऊ. (Masan Holi 2025)
‘मसान की होली’… वाराणसीची ही होळी जगभर प्रसिद्ध आहे. काशीच्या महास्मशान समजल्या जाणाऱ्या मणिकर्णिका घाटावर ही होळी खेळली जाते. जिथे मृत्यूची भीती नाहीशी होते आणि आत्मा मोक्षाकडे जातो असं मानलं जातं. याच मणिकर्णिका घाटावर रात्रंदिवस चिता जळत असतात. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशीला ही होळी साजरी केली जाते. याच्या एक दिवस आधी केवळ राख जमा केली जाते आणि दुसऱ्या दिवशी त्याच राखेतून होळी साजरी केली जाते. संपूर्ण जगात अशाप्रकारची होळी फक्त याच ठिकाणी साजरी केली जाते. पूर्वी ही होळी अघोरी पंथ, किन्नर आणि कपालिक अवधूत साजरी करायचे. पण काळानुसार बदल होत गेले आणि आज सर्वजण ही होळी साजरी करतात. यावर्षी ही होळी ११ मार्च म्हणजे आजच्याच दिवशी साजरी होत आहे. (Festival)
दरम्यान धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिव यांनी यमराजचा पराभव केल्यानंतर याच ठिकाणी त्यांनी चितेच्या राखेने होळी साजरी केली होती. म्हणूनच दरवर्षी हा दिवस विशेष पद्धतीने साजरा करण्याची परंपरा आहे. याशिवाय अजून एक कथा सांगितली जाते, ती म्हणजे शिव जेव्हा विवाहानंतर पहिल्यांदा पार्वतीला काशीमध्ये घेऊन आले, तेव्हा रंगभरी एकादशीच्या निमित्ताने ते गणांसोबत आणि इतर देवतांसोबत गुलालाने होळी खेळले. पण ते स्मशानातील भूत, पिशाच, राक्षस, यक्ष यांच्यासोबत होळी खेळू शकले नाहीत. त्यामुळे शिव यांनी दुसऱ्या दिवशी त्यांच्यासोबतही चितेची राख लावून होळी साजरी केली होती आणि तेव्हापासूनच ही परंपरा आहे. (Masan Holi 2025)
लोककथेनुसार, आजही या होळीमध्ये अदृश्य शक्ती, भूत आणि शिव यांचे अतृप्त अनुयायी देखील सहभागी असतात.आता रंगांऐवजी चितेची राखच का वापरली जाते ? तर मृत्युवरील विजयाचं प्रतीक म्हणून इथे चितेच्या राखेने होळी खेळली जाते. थोडक्यात जीवन आणि मृत्यूच्या चक्राचा स्वीकार करण्याच प्रतीक मानल जात, जेणेकरून एखादी व्यक्ती मृत्यूच्या भीतीचा त्याग करून मोकळ्या मनाने जीवन जगू शकेल. दरम्यान मसान होळी, ज्याला चिता भस्म होळी असही म्हणतात, हा एक खास खेळ आहे जो अनेक वर्षांपासून साजरा केला जात आहे. ही होळी भगवान शिव यांना समर्पित आहे. (Festival)
==============
हे देखील वाचा : Kim Yo Jong : आमच्या शत्रूला मदत केलीत तर याद राखा….
===============
या होळी दरम्यान, घाटावर मंत्रांचा जप, डमरू आणि शंखाचा आवाज सतत घुमत राहतो, ज्यामुळे वातावरणात अलौकिक बदल जाणवतो. ही होळी म्हणजे भगवान शिव यांच्या तांत्रिक आणि अघोरी पंथाच्या परंपरेच जिवंत उदाहरण मानल जात. मसान की होली हा केवळ एक सण नाही तर एक आध्यात्मिक प्रवास आहे जो माणसाला मृत्यूच्या भीतीशिवाय मोकळेपणाने जीवन जगण्याचा संदेश देतो. ही होळी खेळल्याने भक्तांना शिव यांच्या जवळ असल्याचा अनुभव येतो. ही होळी रंगांच प्रतीक नाही तर मोक्षाचं आणि महादेवाच्या दिव्य खेळाच प्रतीक आहे. मुळात मृत्यू हे परम सत्य आहे. ज्यामुळे जे सत्य आहे, त्याचं दुःख कधीही नसायला हवं. वाराणसीमध्ये हीच शिकवण मिळते, म्हणून तुम्हाला मणिकर्णिका हे जगातल सर्वात मोठ स्मशान असूनसुद्धा तिथे कोणीही रडताना पाहायला मिळणार नाही. मृत्यूची व्याख्या या ठिकाणी पूर्णपणे बदलते, जिथे मृत्यू उत्सव बनतो आणि भीती भक्तीत बदलते. (Masan Holi 2025)
पण आज हा उत्सव केवळ इव्हेंट म्हणून साजरा केला जातो. अघोरी साधुंपेक्षा वेशभूषा केलेले अघोरी आर्टिस्ट जास्त पहायला मिळतात. प्रचंड गर्दीमुळे या महत्त्वाच्या सणाला गालबोट लागत आहे आणि चेंगराचेंगरीची शक्यता वाढत आहे. त्यामुळे या उत्सवाचं मूळ स्वरूप आता पहायला मिळत नाही हेच दुर्दैव !