Home » Charlie Chaplin : आणि चार्ली चॅपलिनची डेड बॉडीच किडनॅप झाली !

Charlie Chaplin : आणि चार्ली चॅपलिनची डेड बॉडीच किडनॅप झाली !

by Team Gajawaja
0 comment
Charlie Chaplin
Share

रात्रीची वेळ होती. स्वित्झर्लंडमधल्या corsier-sur-vevey गावात भयाण शांतता पसरली होती. गावातले सगळे गाढ झोपलेले होते. त्याच वेळेस त्या गावातल्या कब्रस्तानात दोन माणसं चोरासारखे घुसले. ते आजूबाजूला कोणी बघत नाहीये ना ते बघत होते, त्यांना अंदाज आला की, त्यांच्या आजूबाजूला कोणीच नाहीये, आपण आपलं काम करायला मोकळे आहोत. त्यांनी ठरल्याप्रमाणे आपलं काम सुरू केलं आणि त्यांनी जे केलं, त्यामुळे अख्खं जग हादरलं. दुसऱ्याच दिवशी सिनेमाच्या दुनियेतलं सगळ्यात मोठं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं. पण यावेळी त्याचं नाव एखाद्या सिनेमासाठी नाही तर त्याचा मृतदेह चोरीला गेला म्हणून जगभर बातमी पसरली. ते मोठं नाव ऐकून शॉक बसेल. कारण ते मोठं नाव होतं द ग्रेट चार्ली चॅपलिन. (Charlie Chaplin)

आता प्रश्न असेल की, चार्ली चॅपलिन सारखा मोठा स्टार आणि त्याचा मृतदेह चोरी होण्याचं नक्की कारण काय? यामागे काही कट कारस्थान होतं का? तर याचा खुलासा आपण या आर्टिकलमध्ये करणार आहोत.

चार्ली चॅप्लिन, म्हणजे सिनेमाच्या दुनियेतला खूप मोठं नाव! जगात असा एकही माणूस सापडणार नाही, ज्याला चार्ली चॅपलिन माहिती नाही. २ फेब्रुवारी १९१४ ला त्याची मेकिंग अ लिविंग नावाची पहिली फिल्म रिलीज झाली. ही त्याची पहिली कॉमेडी फिल्म होती. त्यात त्याने द ट्रॅम्प नावाचं कॅरक्टर केलं होतं, ज्यात पहिल्यांदा टोपी, काठी, कोट आणि त्याची इंट्रेस्टिंग चाल यामुळे तो खूप चर्चेत आला. त्यानंतर त्याने ‘द गोल्ड रश’, ‘सिटी लाइट्स’, ‘मॉडर्न टाइम्स’ आणि ‘द ग्रेट डिक्टेटर’ सारखे ग्रेट सिनेमे दिले .१९५० च्या दशकात अमेरिकेत त्याच्यावर कम्युनिस्ट असल्याचा आरोप झाला आणि त्याला स्वित्झर्लंडला जावं लागलं. तिथे त्याने आपली चौथी पत्नी ऊना आणि आठ मुलांसोबत उरलेलं आयुष्य जगायला सुरुवात केली. (Charlie Chaplin)

 Charlie Chaplin

२५ डिसेंबर १९७७ ला, वयाच्या ८८ व्या वर्षी, चार्लीचं झोपेतच निधन झालं. त्याला corsier-sur-vevey मधल्या कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आलं. त्यांनंतर फक्तच तीन महिन्यांंनी १ मार्च १९७८ च्या रात्री, दोन माणसं, रोमन वार्डास आणि गँट्सचो गनेव हे corsier-sur-vevey च्या कब्रस्तानात गेले. रोमन हा मूळचा पोलिश जो २५ वर्षांचा होता आणि गँट्सचो हा मूळचा बल्गेरियन जो ३८ वर्षांचा होता. दोघंही मेकॅनिक होते आणि दोघांना पैशांची खूप अडचण होती. रोमनने एका न्यूजपेपरमध्ये बातमी वाचली की, Charlie Chaplin died at 88 आणि त्याला एक आयडिया आली. त्याने गँट्सचोला आयडिया सांगितली. त्यांना वाटलं, जर चार्ली चॅप्लिनची डेड बॉडीच चोरी केली तर, आपल्याला चार्लीच्या फॅमिलीकडून पैसे काढता येतील. (Top Stories)

मध्यरात्री भर पावसात भिजत त्या दोघांनी चार्लीची १३५ किलोची लाकडाची शवपेटी खणून बाहेर काढली. ती शवपेटी कब्रस्तानातून ओढत नेली आणि गँट्सचोच्या गाडीत टाकली आणि तिथून गपचूप निघाले ते नोव्हिल नावाच्या गावाजवळ.. जिथे त्यांंनी एका शेतात, मक्याच्या शेतात, खड्डा खणला आणि तिथे शवपेटी पुरली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा गावकऱ्यांनी कब्रस्तानातली चार्लीची रिकामी खणलेली जागा बघून हादरले. त्यांनी पोलिसांना कळवलं आणि बातमी जगभर पसरली. ‘चार्ली चॅप्लिनचा मृतदेह चोरीला गेला!’ आता या विषयावरून लोकांमध्ये भरपूर चर्चा सुरू झाल्या. काही लोकं म्हणाले, चार्लीचा मृतदेह चोरणारे त्याचे फॅन्स असतील आणि त्यांना इंग्लंडमध्ये दफन करायचं असेल. काही लोकं बोलायला लागले, ती ज्यूविरोधी लोकं आहेत कारण त्यांना वाटलं चार्ली ज्यू आहे. काहींनी तर ‘द ग्रेट डिक्टेटर’ या फिल्ममुळे नाझींनी बदला घेतला असावा, असंही म्हणाले.

रोमन आणि गँट्सचोने चार्लीची पत्नी ऊनाला आणि तिच्या वकिलाला फोन करायला सुरुवात केली. त्यांनी तब्बल २७ वेळा फोन केले आणि ६ लाख डॉलर्स म्हणजे त्यावेळचे जवळपास १.२ कोटी रुपये मागितले. यावर ऊनाचा काय रिस्पॉन्स होता? तर ऊना या कॉल्स नंतर हसली आणि म्हणाली, “चार्लीला हा प्रकार विनोदी वाटला असता!” तिने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. पण पोलिसांना मदत व्हावी म्हणून ती बोलत राहिली. पोलिसांनी ऊनाच्या फोनवर नजर ठेवली आणि आसपासच्या २०० फोन बूथवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. रोमन आणि गँट्सचोला वाटलं, ते खूप हुशार आहेत म्हणून ते प्रत्येकवेळी वेगळ्या फोन बूथवरून फोन करायचे आणि पोलिस त्यांच्या मागावर होते. (Charlie Chaplin)

===============

हे देखील वाचा : Jagannath Rathyatra : भगवान जग्गनाथ यांच्या रथयात्रेची काही रंजक तथ्ये

===============

शेवटी १६ मे १९७८ ला तब्बल ७६ दिवसांनी, पोलिसांनी रोमनला एका फोन बूथमध्येच पकडलं. त्याने गँट्सचोचं नाव सांगितलं, आणि दोघांना अटक झाली. त्यांनी पोलिसांना मक्याच्या शेतात नेलं. पण खरी मज्जा तर तेव्हा झाली. जेव्हा ते ज्या शेतात गेले, जिथे चार्लीची शवपेटी पुरली होती, ती त्यांंनी चार्लीची शवपेटी एक्जॅक्ट कुठे पुरली, हे नीट आठवतच नव्हतं! कारण तोवर त्या शेतात मक्याचं पीक खूप वाढलं होतं. आता त्या शेतात चार्ली चॅपलिनच्या शवपेटीचा शोध सुरू झाला. पोलिसांनी मेटल डिटेक्टर वापरून शवपेटी शोधली. शवपेटीवर मेटलच्या हँडल्स होत्या म्हणून फायनली शवपेटी सापडली. (Top Stories)

चार्ली चॅपलिनचा मृतदेह सापडला आणि तो पुन्हा corsier-sur-vevey च्या कब्रस्तानात दफन करण्यात आला. पुन्हा अशी गोष्ट घडू नये म्हणूं यावेळी ती काँक्रीटचा वापर करून ती शवपेटी दफन केली. रोमन आणि गँट्सचोला कोर्टात उभं करण्यात आलं. रोमनला ४.५ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली, कारण तो या सगळ्याचा मास्टरमाइंड होता. गँट्सचोला १८ महिन्यांची शिक्षा मिळाली, कारण तो फक्त साथीदार होता. दोघांनीही ऊनाला पत्र लिहून माफी मागितली आणि ऊनाने त्यांना माफही केलं. तर असा झाला होता चार्ली चॅपलिनचा मृतदेह किडनॅप.. चार्ली चॅप्लिनच्या फिल्म जशा ड्रमॅटिक असायच्या तसाच काहीसा ड्रामा त्याच्या मृत्यूनंतरही घडला.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.