रशियन पॉवर सेंटर ‘क्रेमलिन’ (Kremlin) वर द्रोणद्वारे हल्ला झाल्याची बातमी आली आणि अवघ्या जगात खळबळ उडाली. रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाचा हा अंतिम क्षण असल्याची बातमी तिथून चालू झाली आणि एकच थरकाप उडाला. क्रेमलिनवर (Kremlin) ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न म्हणजेच युक्रेनने केलेला दहशतवादी हल्ला असल्याचे रशियन सरकारने सांगितले आणि याचा बदला घेण्यात येईल, असा गर्भीत इशाराही दिला. यामुळे युक्रेनचे काय होणार याची चर्चा चालू झाली. त्यासोबत क्रेमलिन म्हणजे काय? रशियाच्या राजकारणात क्रेमलिनचे महत्त्व काय याचीही चर्चा चालू झाली. द्रोणद्वारे जो काही हल्ला झाला त्यात क्रेमलिनच्या (Kremlin) ध्वजाची हानी झाली. यामुळे हा हल्ला क्रेमलिनवर झालाच पण त्याचा आघात रशियाच्या मनावर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी हा हल्ला झाल्यावर त्यांच्या कामाच्या वेळापत्रकातही कोणताही बदल केला नाही. आपल्या ठरलेल्या सर्व बैठका घेतल्या. पुतिन यांना ओळखणारे सांगतात की, पुतिन यांनी या हल्ल्यानंतर युक्रेनबाबत काय करायचे याचा ठोस निर्णय घेतला असावा. त्यामुळे भविष्यात काही घातक झाले तर त्यासाठी हा क्रेमलिनवरील हल्ला कारणीभूत ठरणार आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ला झाल्याची बातमी पुढे आल्यावर एकच खळबळ उडाली. फारकाय अमेरिकेनंही ही घटना समजताच तातडीची सुरक्षा बैठक घेतली. क्रेमलिनचे वर्णन रशियन पॉवर सेंटर असे करण्यात येते. यावर झालेला हा हल्ल्याचा प्रयत्न एका मोठ्या युद्धाची नांदी ठरु शकणार आहे. रशियन सरकारनं काढलेल्या पत्रकानुसार युक्रेन सरकारने रशियन राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यांची दोन ड्रोन्स आली पण ते क्रेमलिनची (Kremlin) हानी करु शकले नाहीत. हा ड्रोन हल्ला, रशियाचा विजय दिन आणि 9 मे च्या परेडपूर्वी केलेला पूर्वनियोजित दहशतवादी हल्ला आहे. याकडे रशिया, राष्ट्रपतींना लक्ष्य करणारा हत्येचा प्रयत्न म्हणून बघत आहे. यासर्वांला चोख उत्तर देण्यात येईल असेही रशियानं संबंधित पत्रकात स्पष्ट केलं आहे. द्रोण हल्ला आणि त्यावर रशियाची प्रतिक्रीया यामुळे जगावर पुन्हा एका मोठ्या युद्धाची सावली पडली आहे.
रशियाच्या या धमकीनंतर युक्रेनची राजधानी कीवमध्ये हवाई हल्ल्याचा अलार्म सक्रिय करण्यात आला आहे. अमेरिकन पॅट्रियट क्षेपणास्त्रे किवमध्ये तैनात आहेत. या हल्ल्याच्या वेळी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की हे फिनलॅडमध्ये होते. त्यांनी युक्रेनने क्रेमलिनवर (Kremlin) ड्रोन हल्ले केले नाहीत, त्यांच्याकडे असे हल्ले करण्याची क्षमता नसल्याचे जरी सांगितले तरी रशियाने आता झेलेन्स्की यांच्या विधानावर प्रतिक्रीया दिली नाही. त्यामुळे झेलेन्स्की यांना रशिया कृतीतून उत्तर देणार हे स्पष्ट झाले आहे.
क्रेमलिनवरील (Kremlin) या द्रोण हल्ल्यामुळे रशियामध्ये युक्रेनवरील हल्ले तीव्र करण्याची मागणी होत आहे. क्रेमलिन म्हणजे रशियाचे सर्वस्व मानले जाते. रशियाचे माजी खासदार मेदवेदेव यांनी जाहीररित्या झेलेन्स्की यांना ठार मारण्याची मागणी केली आहे. त्यांच्यामते क्रेमलिनवरील हल्ला म्हणजे रशियाच्या अस्तित्वावर केलेला हल्ला आहे.
=======
हे देखील वाचा : राज कपूर यांची हवेली आणि पाकिस्तान..
=======
रशियात सामंत युगात विविध शहरांमध्ये बांधलेल्या किल्ल्यांना क्रेमलिन म्हणतात. मॉस्को, नोव्हगोरोड, काझान आणि प्सकोव्ह, आस्ट्रखान आणि रोस्तोव्ह येथे हे किल्ले आहेत. त्यातील मॉस्को येथील क्रेमलिनवर द्रोणद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. मॉस्को येथील क्रेमलिन खास आहे, कारण तेथे रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचे मुख्य कार्यालय असते. क्रेमलिन हे अत्यंत मजबूत किल्ले आहेत. अनेक वर्षापूर्वी हे किल्ले लाकडी किंवा दगडी भिंतींनी बनवले गेले. त्यांच्या संरक्षणासाठी बुरुजही बनवण्यात आले. हे किल्ले मध्ययुगीन काळात रशियन नागरिकांचे धार्मिक आणि प्रशासकीय केंद्र होते. आता येथूनच रशियाचा प्रशासनिक कारभार पाहिला जातो. मॉस्कोमधील क्रेमलिन तर या सर्वात मजबूत किल्ला मानला जातो. या क्रेमलिनभोवती दीड मैल परिघाच्या त्रिकोणी भिंती आहेत. या भिंती 1492 च्या सुमारास गुलाबी रंगाच्या विटांनी बनवल्या गेल्या होत्या. त्याच्या आत वेगवेगळ्या कालखंडात बनवलेल्या अनेक इमारती आहेत. त्यातील काही इमारती या 1393 मध्ये बांधल्या गेल्याचा उल्लेख आहे. क्रेमलिनच्या (Kremlin) आतील भाग हा वास्तुशास्त्राचा अजोड नमुना म्हणून बघितला जातोच शिवाय अत्यंत सुरक्षित ठिकाण म्हणून या क्रेमलिनचा उल्लेख होतो. रशियन अस्मिता म्हणून या क्रेमलिनचा उल्लेख करण्यात येतो. एकेकाळी शाही दरबार असलेल्या इमारती आता रशियन सरकारी अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहेत. यापासून जवळच असलेल्या रेड स्क्वेअर आहे जेथे रशियन लष्करी प्रात्यक्षिके होतात. लेनिनची समाधीही याच चौकात आहे. येथेच काही दिवसांनी रशियाच्या विजयी दिवसानिमित्त परेड निघणार आहे. त्या परेडआधी थेट क्रेमलिनवर हल्ला करण्याचा प्रयत्न म्हणजे, रशियाच्या अस्मितेवर हल्ला असल्याचे रशियानं स्पष्ट केले आहे. आता रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतिन या हल्ल्याला कशापद्धतीनं उत्तर देतात आणि युक्रेनचा बचाव करण्यासाठी कोणता देश पुढे येतो, हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.
सई बने