अस्वलासारखे दिसणारे काळे-पांढरे प्राणी म्हणजेच पांडा हे चीनमध्ये आढळतात. पण चीनशिवाय पांडा जगात अन्य ठिकाणीही असले तरी त्यांच्यावर अधिकार मात्र चीनचाच आहे, हे थोडं गौडबंगाल असलं तरी खरं आहे. कारण जगात कुठेही दिसणारा पांडा चीनमधूनच पाठवलेला असतो. आणि त्याला काही वर्षानंतर पुन्हा चीनमध्ये आणण्यात येतं. 2014 मध्ये या पांडांची मोजणी करण्यात आली, त्यातून 1900 पांडा असल्याचं स्पष्ट झालं. यातील 50 पांडाहे चीनच्या बाहेर होते. पण या पांडांनी जन्म दिलेल्या बेबी पांडांवर चीनचा हक्क असतो, यालाच पांडा डिप्लोमसी (Panda Diplomacy)म्हणून ओळखले जाते.
चीन जगभर ही पांडा डिप्लोमसी (Panda Diplomacy) राबवतो. आता आपला कट्टर प्रतिस्पर्धक असलेल्या अमेरिकेवरही चीन हीच पांडा डिप्लोमसी(Panda Diplomacy) राबवत आहे. चीन आपला सर्वात मोठा शत्रू देश असलेल्या अमेरिकेला आपले दुर्मिळ पांडा भेट म्हणून देणार आहे. त्यामागे कारण आहे, ती चीनची ढेपाळणारी अर्थव्यवस्था. चीनचा डोलारा कधी पडेल हे सांगता येणार नाही, अशी तेथील अर्थव्यवस्था झाली आहे. बांधकाम क्षेत्रातील मोठ्या तुटीमळे चीनमधील व्यापाराक कमालीची घसरण झाली आहे. त्यातून अतिरिक्त उप्तादनही चीनला मारक ठरले आहे. यामुळे भरवशाची बाजारपेठ मिळवण्याचं आव्हान या देशापुढे उभे राहिले आहे. हा देश म्हणून अमेरकेकडे पहात आता चीननं आपलं हक्काचं कार्ड फेकलं आहे, ते म्हणजे, पांडा डिप्लोमसी.(Panda Diplomacy)
एकेकाळी जगभर सर्वच क्षेत्रातील उत्पादनाचा पुरवठा करणारा चीन बेरोजगारी आणि डबघाईला आलेली अर्थव्यवस्था या समस्येशी झगडत आहे. अतिरिक्त उत्पादनाच्या हव्यासापोटी चीनमध्ये उभारण्यात आलेल्या भल्यामोठ्या कंपन्यांमध्ये आता तयार झालेले उत्पादन तसेच पडून आहे. मागणी कमी झाल्यामुळे चीनमध्ये अनेक कंपन्यांमध्ये उत्पादन थांबवण्यात आले आहे. परिणामी हजारोंच्या संख्येनं चीनमधील नागरिक बेकार होत आहेत. त्यामुळे चीनमधील कामगारांमध्ये निराशा वाढली आहे. तसेच सरकारविरोधात नाराजीही वाढत आहे. याशिवाय चीनमधील परदेशी कंपन्याही आपला गाशा गुंडाळून भारताला पसंती देत आहेत. चीनला यामुळे मोठा फटका बसला आहे. ही पडझड थांबवण्यासाठी आता चीननं आपल्या शत्रू राष्ट्राबरोबर पुन्हा मैत्री करण्याचे धोरण स्विकारले आहे. अर्थात अमेरिकेने पुन्हा चीनी वस्तूनां आपली बाजारपेढ द्यावी यासाठी चीन ‘पांडा डिप्लोमसी’ खेळत आहे.
फक्त चीनमध्ये असलेले पांडा हे प्राणी चीन आपल्या राजकारणासाठी वापरतो. अन्य देशांशी चांगले संबंध निर्माण करण्यासाठी चीन वेळोवेळी पांड्यांना राजनैतिक भेट म्हणून भेट देते. हे पांडा या देशात काही वर्षासाठी रहातात, नंतर त्यांना पुन्हा चीनमध्ये आणण्यात येते. काही वर्षापूर्वी चीननं अमेरिकेला असेच पांडा भेट दिले होते. अमेरिकेतील स्मिथसोनियन राष्ट्रीय प्राणीसंग्रहालय, प्राणीसंग्रहालय अटलांटा आणि सॅन दिएगो प्राणीसंग्रहालयात पांडा होते. पण त्यांची मालकी चीनकडे असल्यामुळे त्यांना परत चीनमध्ये नेण्यात आले. 1972 नंतर प्रथमच अमेरिकेच्या प्राणीसंग्रहालयात कुठलाही पांडा नाही. ही परिस्थिती जाणून चीन आता पांडा अमेरिकेला देत आहे.
=========
हे देखील पहा : किम जोंग उन याचा वारसा कोणाकडे जाणार ?
=========
चीनची वन्यजीव संरक्षण संघटना आता वॉशिंग्टनमधील राष्ट्रीय प्राणीसंग्रहालय प्रशासनासोबत पांडा अमेरिकेत पाठवण्यासाठी काम करत आहे. यापूर्वी 1972 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या ऐतिहासिक शीतयुद्धाच्या भेटीनंतर चीन सरकारने दोन पांडा अमेरिकेला भेट दिले. त्यांच्या प्रजननामुळे पांडांची संख्या वाढली. मात्र काही वर्षानंतर हे सर्व पांडा चीनला परत देण्यात आले.
पांडा ही अस्वलांची एक दुर्मिळ प्रजाती आहे. अस्वलांच्या तुलनेत, हे पांडा शांत असतात. मोहक दिसणाऱ्या पांड्यांना जगभरातील पर्यटकांमध्ये मोठी मागणी आहे. त्यामुळे चीन ज्या देशाला पांडा भेट म्हणून देतो, त्यांच्याकडून तो कधीही त्यांना परत मागू शकतो. पांडा परत आणणे हे चीनच्या नाराजीचे लक्षण मानले जाते. फारकाय चीन कोणत्याही देशाला केवळ कर्जावर पांडा देतो. पांडा देऊन चीन आपले मित्र देश कोण आहे, याचा संदेशही देतो. चीन निवडक देशांना पांडा भाडेतत्त्वावरही देतो. पांडाचे भाडे वर्षाला 10 लाख डॉलर्स म्हणजे अंदाजे 8 कोटी रुपये आहे. ही रक्कम पांडा प्रकल्पांच्या संवर्धनासाठी वापरली जाते. आता चीन अशीच पांडांची जोडी अमेरिकेला भेट देत आहे. आपल्या शत्रू राष्ट्राला पांडा भेट देऊन चीन त्याच्याबरोबर जवळीक वाढवत आहे.
सई बने