Home » Karuna Munde : करुणा मुंडे यांचं पोटगी प्रकरण काय ?

Karuna Munde : करुणा मुंडे यांचं पोटगी प्रकरण काय ?

by Team Gajawaja
0 comment
Karuna Munde
Share

संतोष देशमुख हत्याप्रकरणी अखेर ८४ दिवसांच्या मागणीनंतर धनंजय मुंडे (Dhananjay Munde)यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध असल्यामुळे या प्रकरणात त्यांचाही हात आहे, अशा वावड्या उठल्या होत्या. परिणामी राजकीय दबावामुळे आणि प्रचंड मागणीमुळे मुंडेंनी राजीनामा दिला, पण मुंडेच्या राजीनाम्याच्या मागणीची ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वीही त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने प्रचंड जोर धरला होता, काय होतं, ते प्रकरण जाणून घेऊ.

३ मार्च २०२५ को राजीनामा होगा ! Hashtag करुणा धनंजय मुंडे… अशी एक फेसबुक पोस्ट २ मार्चला करुणा शर्मा मुंडे यांच्या अकाउंटवरून पडली आणि त्याच्या दोन दिवसांनी खरच मंत्री धनंजय मुंडे यांच्या रुपात फडणवीस सरकारची पहिली विकेट पडली. धनंजय मुंडे म्हटलं तर पहिलं नाव डोळ्यांसमोर येत ते म्हणजे करुणा शर्मा ! एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरण… दुसरीकडे करुणा शर्मा यांच्या पोटगीचं प्रकरण त्यांच्याभोवती फिरत होतं. करूणा शर्माचा वाद २०२१ लाच उफाळून बाहेर आला होता, ज्यावेळी ते ठाकरे सरकारमध्ये मंत्री होते. २०२१ साली रेणू शर्मा नावाच्या एका मुलीने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. रेणू शर्मा ही करुणा शर्मा यांची बहिण ! (Karuna Munde)

रेणू शर्माचा मुद्दा उफाळून वर आल्यानंतर या प्रकरणात करुणा शर्मानेही उडी घेतली. तिनेही मुंडेंवर आरोप केले. यावेळी मुंडेवर राजीनामा देण्यासाठी फार दबाव टाकण्यात आला होता. कारण प्रतिज्ञापत्रात त्यांनी एकाच लग्नाचा उल्लेख केला होता. मात्र करुणा शर्मा यांनीही माझ आणि धनंजय मुंडे यांचं लग्न १९९८ सालीच झालं असल्याचं कबूल केलं. राजश्री मुंडे यासुद्धा धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे कायद्यानुसार त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी उठली होती. इथे अजून गोष्ट नमूद करण्यासारखी आहे की, २०१९ च्या प्रतिज्ञापत्रात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी वैष्णवी मुंडे, जान्हवी मुंडे आणि आदिश्री मुंडे या तीन अपत्यांचा उल्लेख केलेला होता, मात्र २०२४ च्या शपथपत्रात दोन अपत्यांची नाव त्यांनी वाढवली, ती म्हणजे सिशीव मुंडे आणि शिवानी मुंडे ! सिशीव आणि शिवानी ही करुणा आणि धनंजय मुंडे यांची मुले आहेत.

या सर्व प्रकरणावर धनंजय मुंडे यांनी नमूद केलं होतं की, करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधात होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी म्हणजेच राजश्री आणि मित्र परिवार यांना माहित होती. या परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी झाली. दोन्ही मुलांना मी माझं नाव दिलंय. शाळेच्या दाखल्यापासून सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझच नाव आहे, ही मुल माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतल असून स्वीकृती दिलेली आहे. पण करुणा या धनंजय यांच्याशी लग्न झालं आहे, यावर ठाम होत्या. (Karuna Munde)

गेल्या चार वर्षांपासून हा वाद सुरूच होता, यानंतर करुणा शर्माने वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यांनी जबाब नोंदवला होता की, माझं आणि धनंजय मुंडे यांचं लग्न १९९८ सालीच प्रेमविवाहातून झालं होतं. सध्याच्या परिस्थितीनुसार कुटुंबांचा सांभाळ करण्यासाठी त्यांना एक ठराविक रक्कम मिळावी, असंही त्यांनी सांगितलं होतं. यावर नायालयाने निकाल देत म्हटलं की, करुणा शर्मा ही धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी आणि राजश्री ही त्यांची दुसरी पत्नी आहे. करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचं ९ जानेवारी १९९८ रोजी लग्न झालं होतं. राजश्री यांच्याशी लग्न केल्यानंतर करुणा यांना धनंजय मुंडे यांनी ज्याप्रकारे वागणूक दिली ती अन्यायकारक आहे. करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचं वैवाहिक आयुष्य २०१८ पर्यंत सुरळीत होतं. पण नंतर धनंजय मुंडे यांनी करुणा यांच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. त्यामुळे करुणा शर्मा पोटगीसाठी पात्र आहेत. धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दरमहा एक लाख २५ हजार रुपये पोटगी म्हणून द्यावेत. तसेच मुलगी शिवानीला लग्न होईपर्यंत दरमहा ७५ हजार रुपये द्यावे. यासोबतच न्यायालयीन कारवाईसाठी झालेल्या खर्चाची भरपाई म्हणून धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना २५ हजार रुपये द्यावे, असाही आदेश न्यायालयाने दिला. (Karuna Munde)

यावर करुणा शर्मा  (Karuna Munde) यांनीही स्टेटमेंट दिली की, कौटुंबिक छळ हे प्रकरण आता पुढे चालणार आहे. आता फक्त पोटगीचा निर्णय देण्यात आला आहे. कोर्टाकडून मला धनंजय मुंडे यांची बायको म्हणून पोटगी मिळाली पाहिजे हे मान्य झालं आहे. पण पुढे कौटुंबिक हिंसाचाराचा जो भाग आहे, ज्यामध्ये माझ्या बहिणीवर अत्याचार झाला, माझ्या आईसोबत अन्याय झाला, मला जेलमध्ये टाकलं, हे सर्व पुढचे विषय आहेत. या प्रकरणाची केस पुढे सुरु राहणार आहे. त्यामुळे करुणा शर्मा प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण या दोन्ही प्रकरणांमध्ये मंत्री असतानाच धनंजय मुंडे फसले आहेत.(Political News)

============

हे देखील वाचा : Dhananjay Munde : मुंडेंचा मंत्रीपदाचा राजीनामा, संतोष देशमुख यांना न्याय मिळणार ?

============

आता करुणा शर्मा यांच्याबाबत जाणून घ्यायचं झालं तर, करूणा शर्मा (Karuna Munde) मूळच्या इंदोरच्या आहेत. काही कामानिमित्त त्या मुंबईमध्ये राहत होत्या. १९९६ पासून करुणा आणि धनंजय मुंडे एकमेकांना ओळखत होते. १९९८ दोघांनी लग्न केलं. हे आंतरजातीय लग्न होतं. सर्वात आधी करूणा शर्मा यांचं नाव २०२१ साली समोर आलं होतं करूणा यांची लहान बहीण रेणू शर्माने धनंजय मुंडेंनी तिच्यावर अत्याचार केल्याचे आरोप केले होते. तेव्हा धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत करूणा शर्मा यांच्यासोबतच्या नात्याबद्दलची माहिती दिली होती.

२०१९ ला मविआ सरकार सत्तेत आल्यावर धनंजय मुंडे यांच्या शपथविधीलाही करूणा शर्मा आणि त्यांची मुलं उपस्थित असल्याचं बोललं जातं. त्यानंतर धनंजय मुंडे आणि करूणा शर्मा यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे मंत्रीपदी असतानाच एक एक संकट धनंजय मुंडे यांच्यावर येतच आहेत. एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरण तर दुसरीकडे करूणा शर्मा प्रकरण…यामुळे धनंजय मुंडे यांचे पाय आणखी किती खोलात जातात, हे येणारा काळच दाखवेल.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.