Home » चतुर्मास म्हणजे काय ?

चतुर्मास म्हणजे काय ?

by Team Gajawaja
0 comment
Chaturmasya
Share

हिंदू धर्मात हिंदू दिनदर्शिकेला महत्त्व आहे.  या दिनदर्शिकेनुसार येणा-या बारा महिन्यांमध्ये वेगवेगळे सण समारंभ येतात.  हे सण ऋतुनुसार आहेत.  तीन ऋतुंमध्ये या सणांची विभागणी झाली आहे.  याच हिंदू दिनदर्शिकेनुसार आषाढीतील शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीपर्यंतचा कालावधी हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो.  कारण हे सर्व चार महिने सण, समारंभ आणि व्रत, उपवास यांनी युक्त असे आहेत.  या चार महिन्यांच्या कालावधीला चौमासा किंवा चातुर्मास असे म्हणतात.  आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. (Chaturmasya)

कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीला देवूठाणी एकादशी म्हणतात.  याच दोन एकादशीच्या दरम्यान हा चातुर्मास पाळला जातो.  हे चार महिने भगवान विष्णू हे निद्रा घेतात, अशी भक्तांची भावना आहे.  त्यामुळेच या चार महिन्यात कोणतेही शुभ काम केले जात नाही.  हे चार महिने पावसाचे असतात.  या चार महिन्यात त्यामुळे आहारावरही मर्यादा ठेवल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होत नाही, असे सांगण्यात आले आहे.  त्यामुळेच या चातुर्मासामध्ये व्रत आणि उपवास केले जातात.  तसेच सात्विक आहारावर भर देण्यात येतो.  

यावर्षी चातुर्मास हा १७ जुलैपासून सुरु होणार आहे.  १२ नोव्हेंबर रोजी चातुर्मास संपणार आहे. १७ जुलै रोजी देवशयनी एकादशी आहे.  त्याच दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते.  देवूठाणी एकादशीच्या दिवशी म्हणजे,  १२ नोव्हेंबर रोजी चातुर्मास संपाणार आहे.  या सर्व कालावधीत भगवान विष्णू दिर्घ निद्रा घेतात.  त्यामुळेच या कालावधीत शुभ कार्य करु नयेत असे धार्मिक ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे.  (Chaturmasya)

सनातन धर्मात चातुर्मास अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळात अधिकाधिक वेळ देवाच्या भक्तीत घालवला जातो. चातुर्मासात अनेक महत्त्वाचे उपवास आणि सणही साजरे केले जातात. चातुर्मासात ऋषी-मुनी प्रवासही करत नाहीत.  ज्या देवाची ते पुजा करतात, त्यांचे मंदिर असेल अशा ठिकाणी थांबून पूजा करतात.  हिंदू धर्माव्यतिरिक्त जैन धर्मातही चातुर्मास अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. चातुर्मासाच्या चार महिन्यांत जैन साधू एकाच ठिकाणी मुक्काम करून तपश्चर्या करतात.  चातुर्मास हा भगवान विष्णुच्या पुजेचा महिना मानण्यात येतो.  विश्वाचे पालनकर्ते भगवान विष्णू यावेळी निद्रावस्थेत असतात. या काळात भगवान शिव सृष्टीची काळजी घेतात.  यावेळी अधिकाधिक धार्मिक कार्य करावे.  त्यामुळेच या काळात देशातील सर्वच तिर्थस्थळांवर भाविकांची गर्दी असते.  

याच चातुर्मासात हिंदू धर्मात सर्वात आदर्श मानल्या जाणा-या श्रावण महिन्याचेही आगमन होते.  श्रावण महिना हा भगावन शंकराचा महिना मानला जातो.  या महिन्यातील सोमवार, शुक्रवार, शनीवारी उपवास केले जातात.  आणि भगवान शंकराची पुजा केली जाते.  रक्षाबंधन, नागपंचमी, हरियाली तीज, संतन सप्तमी, करवा चौथ व्रत असे सणही याच चातुर्मासात साजरे होतात.  याशिवाय महाराष्ट्रात मोठ्या उत्सावात साजरा होणारा गणपती उत्सव,  त्यानंतरचा पितृपक्ष आणि देवीचा उत्सव म्हणजेच नवरात्रीही याच चातुर्मासात येतात.  वर्षातील सर्वात मोठा सण, दिवाळी हा देखील याच चातुर्मासात साजरी करण्यात येते.  

==============

हे देखील वाचा : ‘या’ लघुग्रहामुळे पुन्हा एकदा पृथ्वीवरील सजीवांना धोका

==============

धार्मिक मान्यतेनुसार या महिन्यात भगवान विष्णूसह भगवान शिवाची पूजा करण्याची परंपरा आहे.  चातुर्मासाच्या ४  महिन्यांत मुंडन, जनेयू संस्कार, गृहप्रवेश आणि लग्न-विवाह ही शुभ कार्य करु नयेत, असे धार्मिक ग्रंथांत सांगण्यात आले आहे.  याशिवाय घराचे बांधकाम सुरू करणे, नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करणे देखील अशुभ मानले जाते.  या काळात देवाची आराधना, स्तोत्र जप आणि दानधर्म करणे हे श्रेष्ठ मानले जाते.  चातुर्मासाच्या समाप्तीनंतर भगवान विष्णू जेव्हा योगनिद्रातून जागे होतात तेव्हाच ही सर्व कार्ये केली तर त्यांचे शुभ फळ मिळते, असे सांगितले जाते.   या महिन्याच्या कालावधीत आहार कसा असावा याबद्लही धार्मिक ग्रंथांत सांगण्यात आले आहे. (Chaturmasya)

त्यानुसार सात्विक पदार्थांचे सेवन करावे,  अती तिखट, तेलकट पदार्थ खाऊ नयेत.  या चार महिन्यात पाऊस असतो, आणि वातावरणही थंड असते.  अशावेळी दुधाचे पचन चांगले होत नाही.  त्यामळे या कालावधीत तुळशीची पाने टाकून केलेला काढा सेवन करावा असेही काही धार्मिक ग्रंथात सांगितले आहे.  तुळशीची पाने ही भगवान विष्णुला प्रिय असतात.  त्यामुळे या चातुर्मासात तुळशीच्या झाडांची काळजी घ्यावी आणि त्यांच्या सानिध्यात रहावे, असे सांगण्यात आले आहे.  चातुर्मासात पवित्र स्थळांची यात्रा करणेही अत्यंत शुभ मानले जाते.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.