Home » Raj Thackeray : राज ठाकरे आणि उदय सामंत यांच्या भेटीमध्ये काय घडलं ?

Raj Thackeray : राज ठाकरे आणि उदय सामंत यांच्या भेटीमध्ये काय घडलं ?

by Team Gajawaja
0 comment
Raj Thackeray
Share

राज्याच्या राजकारणात कधी काय धक्कादायक घडामोड घडेल सांगता येत नाही. आता अशीच एक बातमी आली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या बाबतीत. बरं तीसुद्धा राज ठाकरेंच्या एका नेत्याबरोबर झालेल्या भेटीतून. त्याचं झालं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. नेहमीप्रमाणे जसे नेते करतात तसे यात राजकारण काय नव्हतं, वैयक्तिक भेट होती अशी सारवासारव उदय सामंत यांच्याकडून करण्यात आली. सोबतच या भेटीत मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावर चर्चा झाल्याचं उदय सामंत यांनी माध्यमांना सांगितलं. मात्र जेव्हा या भेटीच्या बातम्या समोर आल्या तेव्हा वेगळेच डीटेल्स समोर आले. आणि यात पुन्हा चर्चा चालू झाली ती ऑपरेशन टायगरची ! (Raj Thackeray)

एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंच्या नेत्यांचे पक्षप्रवेश करून घेणार अशी चर्चा असताना आता या ऑपरेशनच्या हिटलिस्टवर राज ठाकरेंची मनसे असल्याचंही समोर आलं. समोर आलं म्हणजे तशा बातम्याही समोर आल्या. पण या सगळ्यात एकनाथ शिंदे यांना साधा एकही आमदार नसलेल्या मनसेकडून काय मिळू शकतं ? राज ठाकरेंची मनसे खरंच फुटू शकते का ? यावर प्रकाश टाकूया या लेखाच्या माध्यमातून ! (Political News)

तर राज ठाकरेंची स्पेसीफिकली उदय सामंत यांना भेटण्यामागचं कारण सांगितलं जात आहे, ते म्हणजे मनसे फोडण्याचा आखलेला प्लॅन ! आता जी माहिती समोर येत आहे त्यानुसार शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरच्या निशाण्यावर मनसे असल्याचं कळतं. पश्चिम महाराष्ट्रातील मनसेच्या जिल्हाध्यक्षांना उदय सामंत यांनी फोन केला आणि शिवसेनेत येण्याच्या ऑफर दिल्या होत्या. यापैकी काही जणांना तर थेट महामंडळ देण्याचे आश्वासन दिले होते, अशी माहिती बाहेर आली आहे. यातही महत्वाची घडामोड म्हणजे तर मंत्री शंभूराज देसाई यांच्या बंगल्यावर यासंदर्भात एक बैठकदेखील झाली होती. यानंतर राज ठाकरेही ऍक्टिव्ह मोडमध्ये आले आणि त्यांनी संबंधित जिल्हाध्यक्षांसोबत बैठक घेतली. सोबतच आता माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काहीच नाहीये, त्यामुळे पुढचा निर्णय तुमचा आहे, असं राज ठाकरे यांनी जिल्हाध्यक्षांना सांगितलं. त्यानंतर या सर्व जिल्हाध्यक्षांनी मनसेतच थांबण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळते. सोबतच प्रकरण आपल्या लेव्हलला हँडल करत राज ठाकरेंनी थेट उदय सामंत यांनाही ताकीद दिली आहे. (Political News)

मात्र यात खरा मुद्दा आहे की मनसे अजूनही फुटू शकते. यामागचं महत्वाचं कारण म्हणजे मनसेला सुरवातीपासूनच पक्ष फुटीचा शाप आहे. राज ठाकरेंमुळे आमदार झालेले अनेकजण दुसऱ्या पक्षात जाऊन मोठे झाले आहेत. राज ठाकरेंनी २००९ च्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत १३ आमदार निवडून आणले होते. यापैकी राम कदम, मंगेश सांगळे, शिशिर शिंदे, प्रविण दरेकर, वसंत गीते, हर्षवर्धन जाधव ही नाव राज ठाकरेंची साथ सोडून गेले आहेत. पक्षात दूरदृष्टी नसणे, इतर पक्षात मिळणाऱ्या संधी यामुळे या आमदारांनी ही वाट धरल्याच समोर आलं होतं. त्यानंतर ही पक्षाची गळती चालूच राहिली. उदाहरणार्थ २०१४ मध्ये निवडून आलेले पक्षाचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांनीही पुढे पक्ष बदलला. (Raj Thackeray)

आता एकही आमदार नसताना राज ठाकरेंच्या पक्षाला फोडण्यात येऊ शकतं, याच दुसरं कारण म्हणजे राज ठाकरे सतत भूमिका बदलतात अशी निर्माण झालेली प्रतिमा ! एकला चलो म्हणत सुरुवात केलेल्या राज ठाकरेंनी आतापर्यंत तरी कोणत्या मोठ्या पक्षाशी जाहीर युती केलेली नाहीये. मात्र २०१४ मध्ये मोदींना साथ मग २०१९ मध्ये मोदींना विरोध मग २०२४ मध्ये मोदींना सपोर्ट अशी ठाकरेंची भुमीका राहिली. त्यातच लोकसभा निवडणूक लढवल्या नाहीत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तर राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारसांसाठी सभा घेतल्या. त्यामुळे पक्षाचं कॅडर अजूनच कन्फ्युज झालं. सोबतच अशा काही घटना घडल्या ज्यामुळे राज ठाकरेंच्या भूमिकेचं कार्यकर्त्यांना अजूनच कोडं पडलं. उदाहरणार्थ राज ठाकरेंनी श्रीकांत शिंदे यांच्यासाठी सभा घेतली. पक्षाचे कल्याण डोंबिववलीचे एकमेव आमदार राजू पाटील यांची श्रीकांत शिंदेंशी रायव्हलरी असतानाही ठाकरेंनी सभा घेतली. त्यानंतर श्रीकांत शिंदे खासदार झाले. मात्र खासदार झाल्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीत राजू पाटील यांच्याविरोधात जोरदार फिल्डिंग लावली आणि मनसेचा एकमेव आमदार पुन्हा निवडून येऊ शकला नाही. यामुळे जरी ओपनली सांगत नसले तरी राज ठाकरेंच्या पक्षाचं कॅडर अजूनही कन्फ्युज असल्याचं जाणकार सांगतात. (Political News)

तिसरी गोष्ट म्हणजे राज्यात दोन मोठ्या पक्षात झालेल्या फुटीनंतर निर्माण झालेल्या संधी ! राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षात फूट पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात संधी निर्माण झाल्या आहेत. अगदी शाखाप्रमुख, नगरसेवकपद, इतर स्थानिक स्वराज संस्थांच्या संधी आता सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना खुणावत आहेत. त्यातच जर सत्तेत असलेल्या पक्षाबरोबर गेल्यास संघर्ष संपून किमान नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य अशा पदांसाठी लढण्यास आर्थिक रसदही मिळते. त्यामुळेच मग कधी सत्तेत न आलेला किंवा यापुढेही लागलीच मोठी कामगिरी करण्याची सध्यातरी शक्यता नसलेल्या मनसेतुन मोठया प्रमाणात ऑऊटफ्लो होऊ शकतो. (Raj Thackeray)

===============

हे देखील वाचा :  Maratha History : मोघलाई की पेशवाई पहिली आली ? नेमकं सत्य काय ?

===============

आता महत्वाचं कारण म्हणजे यातून एकनाथ शिंदेंना काय मिळणार. तर तुम्ही नीट बघितला तर लक्षात येईल ते म्हणजे एकनाथ शिंदेनी आमदार आणि खासदार फोडले. त्यानंतर या आमदार खासदारांना घेऊन त्यांनी दोन निवडणुका लढल्या. राज्यात पुन्हा सत्तेतही आले. पण आता सत्तेत आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यापुढे आव्हान असणार आहे पक्ष संघटना उभारण्याचं. कारण जर पक्षाची ओळख कायमस्वरूपी ठेवायची असेल तर एकनाथ शिंदेंना कार्यकर्त्यांची फौज तयार करावी लागणार आहे. सोबतच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत चांगली कामगिरी करावी लागणार आहे. अशावेळी मनसेची जिथे जिथे काही प्रमाणात ताकद आहे, असे कार्यकर्ते एकनाथ शिंदेसाठी रेडिमेड कॅडर असेल.

महत्वाचं म्हणजे या कार्यकर्त्यांना, स्थानिक नेत्यांना पक्षात घेताना त्यांना ऑफर देण्यासारख्या गोष्ठीही एकनाथ शिंदेकडे आहेत. सत्तेत असल्याने अशा स्थानिक नेत्यांना एकनाथ शिंदे महामंडळाची अध्यक्षपदे आणि इतर पदांची ऑफर देऊ शकतात. त्यामुळे सुरवातीपासून जरी मनसेची साथ दिली असली तरी यातून हाती काय आलं असा विचार मनसेचे कार्यकर्ते करू लागतील तेव्हा एकनाथ शिंदे हा सोप्पं ऑप्शन त्यांच्यापुढे असेल. महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे पक्षाची पूर्ण रसद ही उमेदवारांच्या मागे उभा करताना दिसून आले आहेत. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक डोळ्यसमोर ठेवूनही शिंदेंच्या पक्षात इनकमिंग वाढू शकतं. या सर्वाला परतवून लावण्यासाठी सध्यातरी राज ठाकरेंनी उदय सामंतांना समज दिल्याचं चित्र आहे मात्र असं कितीवेळ चालणार असा प्रश्न आहे. जर राज ठाकरेंनी पक्षाला पुन्हा प्रगती पथावर आणलं नाही, तर त्यांच्या पक्षाला अशीच गळती लागू शकते आणि त्याचा फायदा आपसूकच सत्तेत असलेल्या पक्षांना जास्त होईल, हे काय वेगळं सांगायला नको.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.