राज्यातील 14 महापालिकांच्या निवडणुका लवकरच होतील अशी शक्यता आहे. त्या दृष्टीन सर्वच पक्षांनी संघटन बांधणीला सुरुवात केली आहे. एकीकडे विधानसभा निवडणुकीतील यशामुळे भाजपाचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला आहे. त्याच्या नेतृत्वाखालील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हेही जोमात आहेत. दुसरीकडे काँग्रेस, तळ्यात मळ्यात असलेले शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना असा सामना होणार आहे. या पार्श्वभूमीवर आधी शिर्डीत भाजपाचे राज्य अधिवेशन, त्यात गृहमंत्री अमित शहा यांचे भाषण आणि नंतर मुंबईत महायुतीच्या आमदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मार्गदर्शन अशा राजकीय कार्यक्रमांनी जानेवारी महिन्याची सुरूवात झाली. (Maharashtra Politics)
या दोन्ही कार्यक्रमांमधील भाजपच्या या दोन ज्येष्ठ नेत्यांच्या भाषणातून एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे येत्या निवडणुकांमध्ये भाजप स्वबळावर लढणार नाही, तर मित्रपक्षांसह लढणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांना नक्कीच हायसे वाटले असेल. त्याच वेळेस विरोधी तंबूत मात्र पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र दुसरीकडे दुबळी पडलेली मविआ अंतर्गत राजकारणामुळे आणखी दुबळी पडत चालली आहे. त्यामुळे ते स्वबळावर लढतील की इतरांशी हातमिळवणी करतील, जाणून घ्या….. (Latest News)
भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीची कट्टर विरोधक असलेली महाविकास आघाडी नुकतीच फुटली आहे. तशी अधिकृत घोषणा झालेली नाही, परंतु वस्तुस्थिती तीच आहे. महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्याला काँग्रेसने तितक्याच दमदारपणे प्रत्युत्तरही दिल आहे. अशा परिस्थितीत खर तर भाजप एकट्याने लढेल आणि अनेक दशकांच स्वप्न असलेल ‘शत-प्रतिशत भाजप’च स्वप्न पूर्ण करेल, अशी अपेक्षा होती.पण ती पूर्ण होताना दिसत नाहीये. उलट मुळातच कमी असलेल बळ आणखी कमी होऊन दुर्बळ झालेली शिवसेना स्वबळाची भाषा करत आहे. (Maharashtra Politics)
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नौदलाच्या तीन युद्धनौकांच राष्ट्रार्पण केल. त्यानंतर त्यांनी नौदलाच्या आंग्रे सभागृहात महायुतीचे नेते आणि आमदारांशी संवाद साधला. महायुतीतील सर्व पक्षांच्या आमदारांनी आपल्या मतदारसंघाची काळजी घेताना स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आपल्याकडे सर्वाच लक्ष असतं, त्यामुळे माध्यमाशी बोलताना काळजी घ्या. आपल्या हातून चुकीच्या बाबी घडणार नाहीत याकडे लक्ष द्या. आमदारांनी विरोधकांना उत्तर देण्यापेक्षा कामातून उत्तर दिले पाहिजे. इतर राज्यात किंवा दुसऱ्या मतदारसंघात जर एखादी गोष्ट चांगली असेल तर त्याबाबत अभ्यास दौरा काढला पाहिजे, अशा उपदेशाच्या चार गोष्टी त्यांनी या आमदारांना ऐकविल्या. त्याचा या आमदारांना फायदा झालाच असेल. (Latest News)
विशेष म्हणजे मोदी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवर्जून उदाहऱण दिले. ठाकरे हे गुजरात दौऱ्यावर आले होते, त्यांचे उदाहरण देत त्यांच्याप्रमाणे आमदारांनी अभ्यास दौरा करण्याचा सल्ला मोदींनी दिला. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना जवळजवळ सर्व राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी त्यांना जणू वाळीत टाकल होत. मोदी यांच्याशी जवळीक दाखवण सर्वजण टाळत होते. अशा वेळी संपूर्ण भारतातील केवळ दोनच नेत्यांनी मोदी यांच्याशी आपली मैत्री जगजाहीर केली होती. एक तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता आणि दुसरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे. त्याची जाण मोदी नेहमी ठेवताना दिसतात. या दोन नेत्यांतील ही जवळीक वारंवार दिसून आली आहे. (Maharashtra Politics)
पंतप्रधानांनी राज यांचा असा आदरार्थी उल्लेख करणे राजकीयदृष्ट्या आणखी महत्त्वाच आहे. कारण गेल्याच आठवड्यात गृहमंत्री अमित शहा यांनी शिर्डीत बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून हल्ला चढवला होता. शरद पवार यांनी 1978 पासून सुरू केलेल्या दगाफटक्याचे राजकारण 20 फूट जमिनीखाली गाडले गेले आहे. उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये बाळासाहेबांची विचारधारा सोडून दगा देत खोटारडेपणाने मुख्यमंत्रीपद मिळविले, त्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली, धोकेबाजीची राजनीती करणाऱ्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना घरी बसविण्याचे काम केले आहे, अशा शब्दांत त्यांनी वाभाडे काढले होते. (Latest News)
मुंबईत बोलताना पंतप्रधानांनी आणखी एक महत्त्वाच वाक्य उच्चारल. महायुती म्हणून संघटन वाढवण्यावर भर द्या, मतदारसंघात घटक पक्षातील आपले जे आमदार, पदाधिकारी आहेत, त्यांच्या कार्यालयांना एकमेकांनी भेटी द्या. महायुतीचा एकोपा वाढवायचा असेल तर गावोगावी डब्बा पार्टी आयोजन करा, अशा सूचना मोदी यांनी केल्या. सरकारमध्ये महायुतीतील पक्षांनी एकमेकांमध्ये समन्वय पाळला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच महायुतीमधील आमदारांनी एकमेकांविषयी द्वेषभाव ठेवू नये. महायुती म्हणून काम करतांना समन्वय ठेवावा, असं आवाहन केलं. (Maharashtra Politics)
मोदी यांच्या या उपदेशाचा परिणामही झालेला दिसला. मोदीजींनी आम्हाला आमची दिनचर्या विचारली. त्यात कुटुंबाला कधी वेळ देतात ते विचारले. त्यांनी आम्हाला योग आणि आरोग्याचे महत्व सांगितले. महायुती भक्कम आहे हे आजच्या बैठकीतून अधोरेखित झालं आहे. आज प्रचंड ऊर्जा घेऊन निघालो आहोत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार आणि मंत्री संजय शिरसाठ यांनी बैठकीनंतर नोंदवली. मोदी यांच्याआधी शिर्डीत बोलताना अमित शहा यांनीही जवळपास हीच लाईन पकडली होती. आमच्या सहयोगी पक्षांनाही या महाविजयातून महाराष्ट्राच्या जनतेने मजबूत केले असून एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच बाळासाहेबांची शिवसेना आहे, अजित पवार यांची राष्ट्रवादीच खरी राष्ट्रवादी आहे, हेही सिद्ध केल आहे, अस शहा म्हणाले. (Latest News)
एकीकडे स्थानिक पातळीवर मित्र पक्षांशी युती करायची का नाही हा निर्णय स्थानिक पातळीवरचे नेते घेतील, असे मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल. मात्र मोदी शहा यांच्यासारखे सर्वोच्च नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे राज्यातील सर्वोच्च नेते मित्र पक्षांना अंतर देणार नाहीत हे स्पष्ट आहे. त्यामुळे शिंदे आणि अजित पवार यांना दिलासा मिळेल यात शंका नाही. एकेकाळी भाजपच्या शत-प्रतिशतच्या घोषणेमुळे तत्कालीन एकसंघ शिवसेना आणि भाजपमध्ये बेबनाव निर्माण झाला होता. आज तोच भाजप यशाच्या शिखरावर असतानाही मित्रपक्षांना सोबत घेऊन जाण्याची भाषा करत आहे. विरोधाभास असा, की ज्यांना एकत्र लढण्याची गरज आहे त्या महाविकासह आघाडीचे मात्र तीन तेरा वाजताना दिसत आहेत. स्थानिक संस्थांच्या निवडणुका आघाडी म्हणून नव्हे तर स्वबळावर लढणार असल्याचे शिवसेनेने आधीच जाहीर केल आहे. (Maharashtra Politics)
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशामुळे विधानसभा निवडणुकीतही आपल्याला सहज यश मिळेल, असा भ्रम मविआमध्ये निर्माण झाला होता. त्यामुळे निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार, यावरून शिवसेना उबाठा आणि काँग्रेस यांच्यात वादावादी सुरू झाली होती. संजय राऊत आणि नाना पटोले एकमेकांवर आग पाखडत होते. त्यामुळे या पक्षांमध्ये समन्वय राहिला नाही आणि विधानसभा निवडणुकीत मविआचा पराभव झाला. या पराभवामुळे मविआतील तिन्ही पक्षांमध्ये कटूता निर्माण झाली आहे. मविआच्या नेत्यांनी सुरुवातीला मतदान यंत्रावर आपल्या अपयशाच खापर फोडल. परंतु हळूहळू आघाडीचे नेते या नामुष्कीचे विश्लेषण करत असून एकमेकांवर दोषारोप करत आहेत. त्यामुळे आघाडीचा नाद सोडून भाजपशी जुळवून घेण्याचे धोरण शरद पवार यांनी स्वीकारल्याच दिसत आहे. अजित पवार यांच्याशी झालेली बैठक तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पवार यांनी केलेल कौतुक यातून त्याचे संकेत मिळाले. पवार यांची हीच गती कायम राहिली तर अजित पवार गट आणि शरद पवार गट लवकरच एकत्र झालेले दिसतील. (Latest News)
==============
हे देखील वाचा : Hindenburg : हिंडेनबर्गच्या दुकानाला टाळे का लागले ?
==============
परंतु उबाठा सेनेच तस नाही. मुळातच उबाठा सेनेचे केवळ वीस आमदार आहेत, त्यातीलही अनेक जण एकनाथ शिंदे यांच्याकडे जाण्यास उत्सुक आहेत, अशा बातम्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या धोरणाला कंटाळून अनेक जण दुसऱ्या पक्षांचा आसरा शोधत आहेत. पुण्यातील उबाठाच्या 5 माजी नगरसेवकांनी अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावर वैतागून उद्धव ठाकरे यांनी ज्यांना जायच आहे त्यांनी निघून जाव, असे उद्गार काढले. या परिस्थितीत उबाठा सेनेच बळ एवढ कमी झाल आहे, की खर तर काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आधाराची त्या पक्षाला सर्वाधिक गरज आहे. आणि तोच पक्ष स्वबळाची भाषा करत आहे. दुर्बळ पक्ष स्वबळावर लढाई करायचं म्हणतोय आणि सबळ असलेला पक्ष मित्रांसह तयारी करतोय. ही एक विसंगतीच म्हणावी लागेल. (Maharashtra Politics)