Home » Vidhansabha Election : महाराष्ट्राच्या महिला मंत्री राज्यात काय बदल घडवतील ?

Vidhansabha Election : महाराष्ट्राच्या महिला मंत्री राज्यात काय बदल घडवतील ?

by Team Gajawaja
0 comment
Vidhansabha Election
Share

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर उत्सुकता होती ती त्यांच्या मंत्रिमंडळाची. आधीच तीन प्रमुख पक्षांची महायुती आणि त्यातही एकट्या भारतीय जनता पक्षाला दणदणीत विजय मिळालेला. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुकांची संख्या स्वाभाविकपणेच जास्त होती. स्वतः फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी 10 दिवसांपेक्षा जास्त वेळ लागला. त्यामुळे मंत्रिमंडळाची रचना तर जास्तच आव्हानात्मक होती. अशा स्थितीत फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील 39 आमदारांनी रविवारी शपथ घेतली. त्यात तब्बल चार महिला मंत्री आहेत. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात आदिती तटकरे या एकमेव महिला मंत्री होत्या. त्यात चौपटीने वाढ होऊन त्यांच्या जोडीला आणखी तीन महिला आमदार आल्या आहेत. त्यातही कॅबिनेट मंत्री म्हणून दोन महिला आहेत, हे आणखी विशेष! त्याबद्दलच जाणून घेऊया… (Vidhansabha Election) 

नव्या मंत्रिमंडळात भाजपला 19, शिवसेनेला 11 आणि राष्ट्रवादीला 9 जागा मिळाल्या आहेत. यात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या आदिती तटकरे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली तर माधुरी मिसाळ आणि मेघना बोर्डीकर यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. यंदाच्या विधानसभेत एकूण 288 जागांपैकी 21 महिला निवडून आल्या आहेत. त्यातील केवळ एक महिला आमदार विरोधी पक्षाच्या आहेत. भाजपच्या 14 महिला उमेदवारांनी विजय मिळवला, तर राष्ट्रवादीच्या चार महिला आमदार आहेत. शिवसेनेच्या दोन महिला आमदार आहेत. (Political News)

या चारही मंत्र्यांकडे नजर टाकली तर लक्षात येते, की राजकीय वारसा हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरला आहेच, परंतु त्यांच्या कार्याचाही त्यांना फायदा मिळाला आहे. पंकजा मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणे ही निव्वळ औपचारिकता होती. एकवेळ मुख्यमंत्रीपदावर लक्ष असलेल्या पंकजा यांना गेल्या काही वर्षांत सातत्याने निवडणुकीत अपयश आलेले असले, तरी भाजपचा बहुजन चेहरा म्हणून त्यांचे स्थान मोठे आहे. परळी मतदारसंघ हा त्यांचा गड मानला जातोच, परंतु बीड आणि नगर जिल्ह्यात त्यांचा मोठा प्रभाव आहे. दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या असल्याचा त्यांना वारसा आहेच. शिवाय 15 वर्षांपासून त्या राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. (Vidhansabha Election) 

भाजपचे पहिले सरकार येण्यापूर्वी, 2014 मध्ये, त्यांनी ‘पुन्हा संघर्ष यात्रा’ काढून पक्षाच्या विजयात मोठे योगदान दिले होते. फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या कार्यकाळात, 2014 ते 2019 पर्यंत त्यांनी ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री, महिला आणि बालविकास मंत्री आणि भूकंप पुनर्वसन मंत्री म्हणून काम केले आहे. त्यामुळे मंत्रिपद मिळणे हा त्यांचा स्वाभाविक दावा होता. शिवाय त्यांच्या रूपाने मंत्रिमंडळात विधान परिषदेलाही प्रतिनिधित्व मिळाले आहे, कारण शपथ घेतलेले अन्य सर्व मंत्री हे विधानसभेचे सदस्य आहेत. मुंबई विद्यापीठातून त्यांनी व्यवस्थापन शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. (Political News)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आदिती तटकरे यांचाही राज्य़ सरकारमध्ये पुन्हा प्रवेश झाला आहे. महाविकास आघाडीचे सरकार 2019 मध्ये आले तेव्हापासून प्रत्येक मंत्रिमंडळाच्या त्या सदस्य राहिल्या आहेत. श्रीवर्धनच्या आमदार असलेल्या आदिती या एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात एकमेव महिला मंत्री होत्या. आता त्यांना पुन्हा कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाली आहे. अवघ्या 36 वर्षांच्या असलेल्या आदिती या फडणवीस सरकारमधील सर्वात तरुण मंत्री आहेत.यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही योजना महायुतीच्या विजयाला कारणीभूत ठरली, अशी बोलले जात आहेत. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या योजनेमुळे आम्ही जिंकलो, अशी नुकतीच कबुली दिली आहे. मात्र ही योजना यशस्वी करण्याची कामगिरी ज्या महिला व बालविकास मंत्रालयाकडे होती, त्याची जबाबदारी मंत्री म्हणून आदिती तटकरे यांच्यावर होती. ती त्यांनी पार पाडली, त्याचे बक्षीस त्यांना मिळाले आहे. शरद पवार हे आदिती तटकरे यांचे आदर्श आहेत. (Vidhansabha Election) 

रायगड जिल्ह्यातील रोहा येथून त्यांनी एम. ए. पर्यंत शिक्षण घेतलं आहे. राजकारणात त्या 17 वर्षांपासून सक्रिय आहेत. सुरूवातीला 2011- 12 मध्ये सुप्रिया सुळे यांच्यासोबत युवती काँग्रेसचे काम त्यांनी केले. सात वर्षांपूर्वी 2017 मध्ये त्या पहिल्यांदा रोहा तालुक्यातील वरसे गटातून जिल्हा परिषद सदस्या झाल्या. मार्च 2017 मध्ये त्या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झाल्या. पुढे 2019 मध्ये त्या श्रीवर्धन मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार बनल्या. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण राजशिष्टचार, माहिती व जनसंपर्क विभागाच्या मंत्री म्हणून त्यांनी कार्य केले. अजित पवारांच्या बंडानंतर 2023 मध्ये त्या एकनाथ शिंदे सरकारमध्ये आल्या. तिथे महिला व बालविकास मंत्री म्हणून त्यांनी काम केले. (Political News)

रूढ अर्थाने राजकीय वारसा नसलेल्या आणि स्वतःच्या कार्याच्या बळावर मंत्रिपद मिळालेल्या महिला आमदार म्हणून भाजपच्या नेत्या माधुरी मिसाळ यांच्याकडे पाहावे लागेल. सलग चार टर्म आमदार म्हणून निवडून आलेल्या त्या एकमेव महिला आमदार आहेत. पुण्यातील पर्वती मतदारसंघावर त्यांनी सातत्याने वर्चस्व राखले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळविणाऱ्या त्या पुण्यातील केवळ दुसऱ्या महिला आमदार ठरल्या आहेत. यापूर्वी शांती नाईक या 1978 मध्ये पुलोद सरकारमध्ये राज्यमंत्री होत्या. स्वातंत्र्य सेनानी केशवराव देशपांडे यांची नात आणि बी. कॉम. पदवीधर असलेल्या माधुरी मिसाळ अपघातानेच राजकारणात आल्या. भाजपचे नगरसेवक असलेल्या सतीश मिसाळ यांची फेब्रुवारी 2003 मध्ये पुण्यातील टिळक रस्त्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या पत्नी असलेल्या माधुरी यांना सामाजिक क्षेत्रात यावे लागले. (Vidhansabha Election) 

गेल्या 18 वर्षांपासून त्या भाजपशी जोडल्या गेल्या आहेत. त्यांनी राजकारण सोडण्याचाही विचार केला होता. परंतु गोपीनाथ मुंडे यांनी समजूत घालून त्यांना काम करण्यासाठी प्रवृत्त केले. कसबा पेठ भागातून 2007 मध्ये त्या पहिल्यांदा नगरसेविका झाल्या. दोनच वर्षांनी त्यांना विधानसभेची संधी मिळाली. त्यानंतर 2009 ते 2024 सलग चार वेळा त्या पर्वती मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. विधिमंडळाच्या लोकलेखा समितीचे सदस्यपद अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. पुण्यातील पूरग्रस्त नागरिकांचे पुनर्वसन असो किंवा महिलांना स्वसंरक्षणाचे धडे असोत, अशा प्रत्येक कार्यात माधुरी यांचा सक्रिय सहभाग दिसून येतो. गेली 35 वर्षे त्या बँकिंग क्षेत्रात आहेत, तसेच बांधकाम, पायाभूत सुविधा व विकास हा त्यांच्या अभ्यासाचा विषय मानला जातो. (Political News)

चौथा चेहरा असलेल्या मेघना बोर्डीकर हे काहीसे आश्चर्यचकित कऱणारे नाव ठरेल. उर्वरित महाराष्ट्राला हे नाव काहीसे अपरिचित असले, तरी मराठवाड्यात ते प्रसिद्ध आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभेच्या आमदार असलेल्या भाजपच्या मेघना बोर्डीकर यांचा राजकीय वारसा काँग्रेसचा. मेघना यांनी दुसऱ्यांदा आमदारकी मिळवली आहे. त्यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर हे काँग्रेसचे पाच वेळेस आमदार होते. रामप्रसाद बोर्डीकर परभणी जिल्ह्याच्या राजकारणात दिग्गज मानले जातात. नंतरच्या काळात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. (Vidhansabha Election) 

====================

हे देखील वाचा : 

Dalai Lama : कोण आहे दलाई लामांचा उत्तराधिकारी !

Manmohan Singh : जेव्हा देशहितासाठी एकत्र आले होते ते तिघे!

====================

रामप्रसाद यांच्यानंतर मेघना बोर्डीकर या भाजपमध्ये सक्रिय झाल्या आणि त्यांच्या राजकीय वारसदार म्हणून पुढे आल्या. जिंतूर तालुक्यातील बोरी गटातून जिल्हा परिषद सदस्या म्हणून राजकीय कारकीर्द सुरू कऱणाऱ्या मेघना यांनी टप्प्याटप्याने वाटचाल केली आहे. परभणी जिल्ह्यात भाजप रूजविण्यात त्यांचा मोठा वाटा मानला जातो. पाच वेळेस आमदार होऊनही त्यांच्या वडिलांची मंत्रिपदाची आकांक्षा पूर्ण झाली नाही. त्यांचे ते स्वप्न मेघना यांनी पूर्ण केले, असे मानले जाते. राजकारणाच्या बरोबरीनेच एक यशस्वी उद्योजिका म्हणूनही मेघना यांची ओळख आहे. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळात त्या आहेत. अशा या चार महिला मंत्री सध्या फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळात आहेत, आता महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा किती प्रभाव पडतो, हे औत्सुक्याच ठरेल. (Political News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.