बीग बॉसचा विजेता ‘विशाल निकम’ (Vishal Nikam) हा आता दिवसेंदिवस इतका लोकप्रिय होत चालला आहे की, अनेक कार्यक्रमांसाठी ‘प्रमुख आकर्षण’ म्हणून त्याच्याकडे लोक पाहू लागले आहेत. त्याची तारीख मिळवून देण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, युवा नेते सुहास बाबर यांना रोज इतके फोन येऊ लागले आहेत की त्यांनी, “आता तुझा व्यवस्थापक म्हणूनच माझी नेमणूक कर”, अशी मागणी विशालकडे केली.
बीग बॉसचा विजेता विशाल निकम याचा देवीखिंडी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली या त्याच्या गावी सुहास बाबर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सुहास बाबर यांनी विशाल निकमच्या आजवरच्या प्रवासाचे कौतुक केले.
शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे पुत्र आणि विद्यमान सांगली जिल्हा परिषद सदस्य सुहास बाबर यांचा विशाल हा चांगला मित्र. दोघांनाही व्यायामाची आवड असल्याने अनेकदा जिम करणे, क्रिकेट खेळणे हे ओघाने एकत्रितच झाले होते. सुहास बाबर व विशाल निकम यांचे संबंध लक्षात घेता लोक आता सुहास बाबर यांनाच त्याच्याबाबत विचारणा करू लागले आहेत.
‘आमचे उदघाटन आहे’, ‘आमचा कार्यक्रम आहे’, ‘आम्हाला प्रमुख अतिथी म्हणून विशालची तारीख मिळावी म्हणून तुम्ही शब्द टाका’, अशी विनंती लोक करू लागले आहेत, असं सुहास बाबर सांगत होते.
विशाल (Vishal Nikam) हा मनाने खूप निर्मळ आणि हळवा आहे. आम्ही बीग बॉस बघत होतो तेव्हा सर्व स्पर्धक डोक्याने खेळायचे आणि विशाल मनाने खेळाताना दिसत होता. त्याचा प्रामाणिकपणा आम्हा सर्वांना व महाराष्ट्राला भावला होता. तो विजेता झाल्यावर त्याने त्या प्रसिद्धीच्या मायाजाळात न अडकता, आपल्या गावाकडे येऊन आपल्या माणसांना भेटणे पसंत केले.
हे ही वाचा: टिकटॉकपासून बिगबॉसच्या घरापर्यंतचा प्रवास – अभिनेत्री सोनाली पाटील (sonali Patil)
विशालचे पाय जमिनीवर आहेत हे यातून दिसते. त्यामुळे तो खूप मोठा होणार असल्याचा विश्वास व्यक्त करून, आपल्या भागातील मुलगा एवढी मोठी मजल मारतो, याचा गर्व असल्याचेही बाबर यांनी सांगितले. तर, विशाल निकम यानेही, “ही सुरवात आहे. आपल्याकडून ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करणार”, असा निर्धार व्यक्त केला.
– बी संतोष