सध्या इराणमध्ये २२ वर्षीय महिलेच्या मृत्यूनंतर तेथील महिला आपला हिजाब जाळत आहेत तर दुसऱ्या बाजूला आपली केसं कापत आहेत. खरंतर माहसा अमीनी नावाच्या महिलेला पोलिसांनी अशासाठी अटक केली होती की, तिने हिजाब व्यवस्थितीत घातला नव्हता आणि तिची केस ही दिसत होती. त्यानंतर प्रत्यक्षदर्शीनी असे दावे केले की, पोलीस तिला आपल्या गाडीतून घेऊन गेले आणि तिला खुप मारहाण केली. यामुळे ती कोमामध्ये गेली आणि ३ दिवसानंतर तिचा मृत्यू झाला. इराण मधील महिलांच्या विरोधातील काही कायदे अत्यंत कठोर आहेत ज्यामुळे त्यांना नेहमीच शिक्षेला सामोरे जावे लागते. अशाच आम्ही तुम्हाला इराण मधील अशा काही कायद्यांबद्दल सांगणार आहोत जे अत्यंत विचित्र तर आहेतच पण ऐकून आणि वाचून ही तुम्हाला तुमचा राग अनावर होईल. (Weird laws of Iran)
-वडील आणि मुलीचे लग्न
इराण मध्ये वडील आपल्या दत्तक घेतलेल्या मुलीशी लग्न करु शकतात. वर्ष २०१३ मध्ये इराणच्या संसदेने वडील आणि दत्तक घेतलेल्या मुलीच्या विवाहावर बंदी घातली होती. मात्र इराणच्या धर्मगुरुंना हा कायदा मंजूर नव्हता. त्यांना लग्नासाठी परवानगी हवी होती. तेव्हा संसदेने नियम तयार केला की, लग्न फक्त एकाच अटीवर होईल जेव्हा कोर्टाचे न्यायाधीश त्या लग्नासाठी मंजूरी देतील.
-१३ वर्षीय मुलगी करु शकते लग्न
वर्ष १९७९ मध्ये महिलांसाठी लग्न करण्याचे कमीत कमी वय १८ वर्षांवरुन कमी करत १३ वर्ष केले होते वर्ष १९८२ मध्ये हे वय कमी करुन ९ वर्ष केले होते. म्हणजेच ९ वर्षाची मुलगी सुद्धा लग्न करु शकत होती. परंतु २००२ मध्ये पुन्हा लग्नाचे वय वाढवून १३ वर्ष केले तर मुलाचे वय १५ वर्ष आहे.
-स्री आणि पुरुषांना लग्नासाठीचे वेगवेगळे नियम
जेथे महिला एकाच व्यक्तीशी लग्न करु शकते, तर दुसऱ्या बाजूला एक व्यक्ती एकाच वेळी ४ महिलांसोबत लग्न करु शकतो. महिलेचा विवाह वडिल किंवा आजोबांच्या परवानगी नंतरच होतो. तर मुस्लिम महिला त्यांच्या धर्माव्यतिरिक्त अन्य पुरुषाशी लग्न करु शकत नाहीत. परंतु पुरुष यहूदी, ख्रिस्चन आणि पारसी महिलेशी विवाह करु शकतो.(Weird laws of Iran)
हे देखील वाचा- ईराणमध्ये महिलांनी कापले केस तर जाळला हिजाब, कारण ऐकून व्हाल हैराण
-तलाकसाठी सुद्धा भेदभाव
एक महिला आपल्या नवऱ्याला फक्त कोर्टाच्या माध्यमातून तलाक देऊ शकते जेव्हा तिचा नवरा किंवा तो ५ वर्षांपेक्षा अधिक काळ तुरुंगात असेल तर, मानसिक रुपात अस्थिर, तिला मारहाण करत असेल किंवा त्याला एखाद्या नशेची लत असेल. मात्र एक पुरुष आपल्या पत्नीला फक्त बोलूनच तलाक देऊ शकतो.
-कपड्यांसंदर्भात नियम
इराण प्राइमर नावाच्या वेबसाइटनुसार महिलांना आपले डोकं आणि चेहरा हा हिजाब किंवा बुरख्याने झाकणे गरजेचे आहे. त्याचसोबत खांद्यापासून ते पायापर्यंत अत्यंत ढगळे कपडे घालणे गरजेचे आहे. अशातच महिलेने याचे उल्लंघन केल्यास तिला ६ महिन्याचा तुरुंगवास किंवा चाबकाने मारण्याचा नियम आहे.