प्रत्येकजणला आपल्या जीवनात पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. मग ते करिअरच्या बाबतीत असो, आरोग्याच्या बाबतीत असो, धन लाभाच्या बाबतीत असो की अगदी प्रेमाच्या बाबतीत… त्यामुळे हा आठवडा बारा राशींसाठी कसा असेल, कोणत्या राशींवर कुठल्या ग्रहांचा प्रभाव असेल हे जाणून घेऊयात…(Weekly Horoscope 06 Mar to 12 Mar)
मेष – दिनांक 6 मार्च रोजी होळी असून चंद्राचे भ्रमण आपल्या राशीच्या पंचमस्थानातून होत आहे तर राशी स्वामी मंगळाचे भ्रमण आपल्या धनस्थानातून होत आहे. तेव्हा आठवड्याची सुरुवात आपल्यासाठी अतिशय अनुकूल फलदायी राहील. होळीच्या दिवशी चांदीची वस्तू खरेदी केल्यास फायदा होईल. अनपेक्षित अर्थप्राप्ती होईल. आप्तस्वकीयांकडून भेटवस्तू मिळतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना चांगल्या सुसंधी लाभतील. नोकरी स्त्री अधिकारीवर्गाकडूनन लाभ होतील. भागीदारी व्यवसाय वृद्धिंगत होईल, परंतु स्वतः लक्ष घालण्याची गरज आहे. आठवड्याचे सुरुवातीला आपल्या मेहनतीला योग्य्य न्याय मिळेल.
शुभ दिनांक – 6, 7
वृषभ – राशीतील मंगळ व सुखस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण शुभ फले देणारे राहील. नवीन वाहन वास्तूचे योग येतील. गृह सजावटीसाठी शोभेच्या वस्तूंची खरेदी होईल. घरात शुभ समारंभाचे आयोजन होईल. मातृ सौख्य लाभेल. होळी पौर्णिमा आपल्यासाठी अनेक चांगल्या गोष्टींची पर्वणी घेऊन येईल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता लाभेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मनाजोग्या ठिकाणी प्रवेश घेता येईल. सुसंगत लाभेल. नवनवीन उपक्रम राबवाल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना चांगल्या संधी चालून येतील. नावलौकिक लाभेल. नोकरीत वरिष्ठांचा सल्ला पटला नाही तरी त्यावर अंमलबजावणी करावी लागेल. आपली मते बाजूला ठेवावी लागतील. Boss is always right हे लक्षात ठेवावे.
शुभ दिनांक – 8 ते 10
मिथुन – आपल्या राशीच्या पराक्रम स्थानातून चंद्राचे तर भाग्यस्थानातून राशी स्वामी बुधा बरोबर रवी, शनीचे भ्रमण होत आहे. दशमातील गुरु, शुक्र नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल राहतील. धाडसी निर्णय घेतले जातील. भावंडांचे सहकार्य लाभेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. सुसंगत लाभेल. अनुकूल ग्रहमानमुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढल्यामुळे अतिशय आनंदी आणि उत्साही राहाल. लेखकांच्या हातून दर्जेदार लिखाण होईल. कवी, कलाकार, गायक, वादक यांना चाहत्यांकडून चांगली दाद मिळेल. घराच्या नूतनीकरणाकडे लक्ष द्याल. आपल्या मूळ पत्रिकेत योग असल्यास नवीन वाहन वास्तूचा देखील लाभ होईल. घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. संततीच्या उत्कर्षास अनुकूल ग्रहमान आहे.
शुभ दिनांक – 11, 12
कर्क – आपल्या राशीच्या धनस्थानातून चंद्राचे भ्रमण तर दशमेश मंगळाचे लाभस्थानातून आणि भाग्यस्थानातून गुरु शुक्राचे भ्रमण होत आहे. दिनांक सहा रोजी होणारी फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा आपला भाग्योदय करणारी राहील. जुनी व्यावसायिक येणी वसूल होतील. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातून लाभ होतील. भावंडांशी सुसंवाद साधाल. महत्त्वाची कागदपत्रे हाती लागतील. कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रांवर सह्या करण्यापूर्वी योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. कामानिमित्त प्रवास घडतील. उत्तरार्धात कुटुंबातील व्यक्तींना वेळ द्याल. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये.
शुभ दिनांक – 6, 7
सिंह – आपल्याच राशीतून चंद्राचे भ्रमण तर सप्तमस्थानातून रवि, बुध, शनीचे आणि अष्टमस्थानातून गुरु, शुक्राचे तर दशमस्थानातून मंगळाचे भ्रमण होत आहे. असे आपल्यासाठी अनुकूल ग्रहमान लाभलेले असल्यामुळे येणारी होळी पौर्णिमा आपल्यासाठी शुभफळे घेऊन येणारी राहील. समाजात आपल्या व्यक्तिमत्त्वाचा चांगला ठसा उमटेल. स्वकर्तृत्वाच्या बळावर मोठी मजल माराल.नवनवीन उपक्रम राबवून यशस्वी केले जातील. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. भागीदारी व्यवसायातून नवीन कार्यारंभ केले जातील. जुनी येणी वसूल होतील. आपल्या पत्रिकेत होणारा शशयोग आणि बुधादित्ययोग आपल्या मेहनतीला योग्य न्याय देणारा राहील. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातून लाभ होतील. अनोखी व्यक्तींवर मात्र विश्वास ठेवून कोणतेही काम करू नका.
शुभ दिनांक – 7 ते 9
कन्या – आठवड्याच्या सुरुवातीला राशीच्या व्ययस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. त्यामुळे कामानिमित्त दूरचे प्रवास संभवतात. षष्ठस्थानातील शशयोग आणि बुधादित्ययोग यामुळे नोकरी- व्यवसायात बढती-बदली संभवते. आजवर केलेल्या सकारात्मक मेहनतीमुळे वरिष्ठांकडून आपली प्रशंसा होईल. विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. भागीदारी व्यवसायातून नवीन कामे घेतली जातील. जोडीदाराचेही चांगले सहकार्य लाभेल. कवी, कलाकार प्रसिद्धीच्या झोतात राहतील. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात अनपेक्षित खर्च उद्भवण्याची शक्यता राहते.
शुभ दिनांक – 8 ते 10
तूळ – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या लाभस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे .पंचमस्थानातील रवी, बुध, शनि आणि षष्ठस्थानातील गुरु, शुक्र आपल्यासाठी अनुकूल फलदायी ठरतील. पौर्णिमेच्या दिवशी लाभस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण आपला व्यवसायिक उत्कर्ष करणारे राहील. नवनवीन व्यावसायिक उपक्रम राबवले जातील. अनपेक्षित आर्थिक लाभाचे योग येतील. सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्याल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. कामानिमित्त परदेश प्रवास घडतील. मित्र परिवाराचा एखादा सल्ला अतिशय महत्त्वाचा ठरेल. कोर्ट कचेरीच्या कामातून आपल्या बाजूने निकाल लागतील. उत्तरार्धात महत्त्वाचे निर्णय घेऊ नका.
शुभ दिनांक – 6 ते 8
वृश्चिक – आपल्या राशीच्या कर्मस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण नोकरी व्यवसायात नवीन संधी देणारी राहील. नवीन व्यावसायिक कार्यारंभ केले जातील. आपल्या मेहनतीला योग्य न्याय मिळेल. वडीलधाऱ्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल, त्यांचा एखादा महत्त्वाचा सल्ला आपले जीवन बदलून टाकणारा राहील. आपले सकारात्मक विचार आपला नावलौकिक वाढवतील. भविष्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाईल. तसेच पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ होतील. संशोधनपर अभ्यासक्रमातून यश लाभेल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. आपली इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील. उत्तरार्धात घडणाऱ्या प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळा.
शुभ दिनांक – 8 ते 10
धनु – होळी पौर्णिमेच्या दिवशी भाग्यस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण आपला उत्कर्ष करणारे राहील. वैयक्तिक उत्कर्षाच्या दृष्टीने अतिशय अनुकूल ग्रहमान आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जाता येईल. मनाजोग्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल. तरुणांना नोकरीच्या संधी चालून येतील. महत्त्वाचे निर्णय घेताना अतिशय विचारपूर्वक तसेच योग्य व्यक्तीच्या सल्ल्याने घ्यावेत. कामाचा व्याप वाढणार आहे. वरिष्ठानकडून आपल्या पूर्वी केलेल्या कामाची प्रशंसा होईल. नवनवीन व्यावसायिक उपक्रम राबविण्यात यश येईल. गुंतवणुकीतून लाभ होतील. वाहन वास्तूचे योग आहेत. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. उत्तरार्धात आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल.
शुभ दिनांक – 11, 12
मकर – आठवड्याच्या सुरुवातीला अष्टमस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण अनपेक्षित धनप्राप्ती देणारे राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्याल. आपल्या मदतीमुळे अनेकांना फायदा होईल. सामाजिक पतप्रतिष्ठा उंचावेल. तीर्थस्थळांना भेटी द्याल. संत सज्जनांचा सहवास लाभेल. कुटुंबात धार्मिक शुभ समारंभाचे आयोजन केले जाईल. विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल कवी, कलाकारांचे चहात्यांकडून कौतुक होईल. कामानिमित्त प्रवास घडतील. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातून लाभ होतील. तरुणांनी तूर्तास नोकरीत बदल करू नयेत, फसवणूक होण्याची शक्यता राहते.
शुभ दिनांक – 8 ते 10
कुंभ – होळी पौर्णिमेनी या आठवड्याची सुरुवात होत आहे. आपल्या राशीच्या सप्तम स्थानातून चंद्राचे होणारे भ्रमण जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता देणारे राहील. तसेच सप्तमेश रवीचे भ्रमण आपल्या राशीतून होत असल्यामुळे प्रकृतीच्या तक्रारी दूर होणार आहेत. आपल्या वाक्चातुर्याच्या जोरावर मोठी मजल माराल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. कामानिमित्त अनेकांची सुसंवाद साधता येईल. भागीदारी व्यवसायातून कामाचा व्याप वाढेल. इम्पोर्ट एक्सपोर्टच्याा व्यवसायातून चांगला फायदा होईल. नवनवीन व्यावसायिक उपक्रम राबवाल. संशोधनपर अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना यश लाभेल.
शुभ दिनांक – 10 ते 12
मीन – आपल्या राशीतून गुरु शुक्राचे तर तृतीय स्थानातून मंगळाचे आणि षष्ठस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला न्याय मिळेल. संगीत, कला क्षेत्रातून लाभ होतील. धार्मिक शुभसमारंभात सक्रिय सहभाग घ्याल. कुटुंबातील व्यक्तीसंबंधी सुवार्ता कानी येतील. नवीन व्यावसायिक संधी चालून येतील. भागीदारी व्यवसायातून नवीन कार्यारंभ होतील. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. जोडीदाराशी सुसंवाद साधाल. सकारात्मक ऊर्जा वाढेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. अनेक चांगल्या संधींचा लाभ घेता येईल. सामाजिक पतप्रतिष्ठा वाढेल. मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. विवाहेच्छूक तरुणांना मनाजोगा जोडीदार लाभेल. उत्तरार्धात प्रवासात आपले खिसा पाकीट सांभाळावे. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये.
शुभ दिनांक – 8 ते 10
- श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे
9011149780 / 8668293104
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.