जगभर युद्धजन्य परिस्थिती असून त्यात वाढ होत आहे. रशिया आणि युक्रेन मधील युद्धापासून गेल्या तीन वर्षात अन्य देशांमध्येही तणाव वाढत चालला आहे. अझरबैजान-आर्मेनिया, चीन-तैवान, उत्तर कोरिया-दक्षिण कोरिया यांच्यासह अमेरिका रशिया आणि चीनमधील तणावही वाढत आहे. त्यामुळेच जग तिस-या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळेच EU म्हणजेच युरोपियन युनियन या 27 देशांच्या संघटनेनं दिलेला एक इशारा चर्चेत आला आहे. ही संघटना या 27 देशांमधील राजकीय, आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीची पाहणी करते, यावरुनच युरोपियन युनियननं या 27 देशातील नागरिकांना 72 तासांचा आपत्कालीन किट सोबत ठेवा असे आवाहन केले आहे. युरोपियन युनियनला भविष्यात कधीही भयानक युद्ध सुरु होऊ शकते, हे स्पष्ट झाले आहे. युरोपियन युनियनच्या या आवाहनामुळे या देशांमध्ये खळबळ उडाली आहे.(War Situation in Europ)
युरोपियन युनियन ही युरोपमधील 27 देशांची एक राजकीय आणि आर्थिक संघटना आहे. यातून सदस्य राष्ट्रांमध्ये सहकार्य आणि एकात्मतेला प्रोत्साहन देत व्यापार वाढवण्यावर भर देण्यात येतो. तसेच सदस्य असलेल्या देशांमध्ये शांतता, समृद्धी, सहकार्य वाढवण्यासाठी ही संघटना भर देते. या संघटनेत ऑस्ट्रिया, बेल्जियम, बल्गेरिया, क्रोएशिया, सायप्रस, झेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, एस्टोनिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, आयर्लंड, इटली, लाटविया, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, माल्टा, नेदरलँड्स, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, स्लोवाकिया, स्लोव्हेनिया, स्पेन आणि स्वीडन या 27 देशांचा समावेश आहे. (International News)
आता याच युरोपियन युनियननं या देशांसाठी एक सूचना जाहीर करत आपत्कालीन किट सोबत ठेवण्याबाबत आवश्यक सूचना दिली आहे. यामध्ये अन्न, पाणी, औषध, टॉर्च आणि पॉवर बँक यासारख्या मूलभूत वस्तूंचा साठा असावा असे सांगण्यात आले आहे. यासाठी युरोपियन युनियननं युरोपमधील वाढत्या तणावाचे कारण दिले आहे. या देशांच्यावरही या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम होणार असल्याची भीती युरोपियन युनियननं व्यक्त केली आहे. त्यातील अनेक देश हे रशिया आणि युक्रेनच्या सीमेवर आहेत. या देशातील युद्ध भडकल्यास या सीमेवर असलेल्या देशांनाही युद्धाची झळ बसणार आहे. शिवाय येथील अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होण्याचीही शक्यता आहे. या 27 देशांपैकी अनेक देश हे आकारानं लहान आहेत. त्यांची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे. युद्धजन्य परिस्थिती अधिक गंभीर झाल्यास या देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याचा धोकाही युरोपियन युनियननं व्यक्त केला आहे. असा सर्व परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी नागरिकांना तयार व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.(War Situation in Europ)
यासंदर्भात युरोपियन युनियननं एक अहवालच जाहीर केला आहे. त्यानुसार कोणत्याही गोष्टीसाठी तयार राहा, आपत्कालीन किटसह रहाणे, ही आपली नवीन युरोपियन जीवनशैली असणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यात जो आपत्कालीन किट दाखवण्यात आला आहे, त्यात रोख रक्कम, आवश्यक औषधं, अन्न, पाणी, बॅटरी, रेडिओ, गरम कपडे यासारख्या वस्तूंचा समावेश आहे. युद्धासह अचानक लागलेल्या आगीपासून सुरक्षित ठेवतील, अशी साधनेही जवळ बाळगण्याचे या आवाहनात सांगण्यात आले आहे.
=================
हे देखील वाचा : Summer :उन्हाच्या तडाख्यातही हिवाळ्याचा फील देणारी पर्यटन स्थळं
=================
पूर आणि जंगलातील आगीपासून ते सायबर हल्ले, साथीचे रोग आणि अगदी सशस्त्र आक्रमणापर्यंतच्या आपत्कालीन परिस्थितीचा आपल्याला कधीही सामना करावा लागणार असल्याचे युरोपियन युनियननं आपल्या 27 सदस्य देशातील नागरिकांना सांगितले आहे. फिनलंडचे माजी अध्यक्ष सौली निनिस्टो यांनी केलेल्या पाहणीवरुन युरोपियन युनियननं हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. मात्र युरोपियन युनियनचे सदस्य असलेल्या अनेक देशांनी याआधीच युद्धजन्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयारी सुरु केली आहे. स्वीडन या देशानं नागरिकांना तसे आदेशच दिले आहेत. त्यानुसार घरात पाणी, कोरडे अन्न पदार्थ, ब्लँकेट आणि घर गरम ठेवण्यासाठी पर्यायी स्रोत तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहेत. शिवाय नॉर्वे देशात तर आण्विक आणीबाणीची परिस्थिती कधीही येऊ शकते, त्यामुळे नागरिकांना आयोडीनच्या गोळ्या जवळ ठेवण्यास सांगण्यात आले आहे. तर जर्मनीमध्ये नवीन कायदाच तयार करुन घरांमध्ये सुरक्षित निवारा समाविष्ट करणे आवश्यक करण्यात आले आहे. प्रत्येक घराखाली, आपत्कालीन बंकर तयार करण्याचे आदेश दिले आहेत. पोलंडमध्येही असेच आदेश आहेत. एकूण युरोपमधील देशांमध्ये युद्धाची भीती किती अधिक आहे, हेच यातून स्पष्ट होत आहे.
सई बने