आजकाल ट्रेकिंग, ट्रॅव्हलिंगसोबत आकाश दर्शन करण्याची ओढ सर्वांनाच असते. रात्री फिरताना डोक्यावर असलेलं ताऱ्यांचं छत पाहून मग आपल्याला तो फोटो आठवतो, फाय स्टार हॉटेल आणि फाय मिलियन स्टार हॉटेल… पण तुम्हाला जर फाय मिलियन स्टार सोबत आपली आकाशगंगासुद्धा पहायची आहे. तर पुण्यामध्ये एक खास जागा आहे. जिथे तुम्ही आकाशातल्या सुंदर गंगेचा अनुभव घेऊ शकता, चला तर जाणून घेऊ आपल्या पुण्यातील या जागेबद्दल…(Galaxy)
नाणेघाट आपल्या सर्वांनाच माहित असेल. नाणेघाट हा महाराष्ट्राला लाभलेला सर्वात सुंदर स्थळांपैकी एक ! महाराष्ट्राच्या इतिहासात नाणेघाटला फार महत्त्व आहे. सातवाहन साम्राज्याच्या काळापासून प्रचलित असलेला हा प्रमुख प्राचीन व्यापारी घाट मार्ग कोकण आणि देश यांना जोडत होता. त्याकाळी मुंबई किंवा इतर ठिकाणांहून येणाऱ्या व्यापारी मालाची वाहतूक नालासोपारा म्हणजेच तत्कालीन शूर्पारक इथे आणला जात होता. सोपारापासून हाच माल नाणेघाटमार्गे इतर ठिकाणी पोहोचवला जात होता. नाणेघाटमध्ये आजही प्राचीन गुहा, सातवाहनांच्या वंशजांचे पुतळे, पाण्याचे टाके, जकातीचे पैसे ठेवण्यासाठीचा हंडा आणि ब्राम्ही लिपीतील शीलालेखदेखील आहे. याच कारणाने भारतीय पुरातत्व संरक्षण खात्याने प्राचीन वारसा लाभलेल्या नाणेघाटला ‘राष्ट्रीय महत्त्वाचं स्थळ’ म्हणून घोषित करण्यात आलं. मात्र आणखी एक गोष्ट आहे जी नाणेघाटला अजून सुंदर बनवते, ती म्हणजे रात्रीच्या अंधारात डोळ्यांना दिव्य दर्शन घडवणारी भव्य आकाशगंगा ! (Galaxy)
नाणेघाट हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त काळोख असलेला भाग म्हणून ओळखला जातो. देशभरात आकाशदर्शनासाठी किंवा अंतराळ संशोधनासाठी अशा अनेक जागा प्रसिद्ध आहेत. त्यातच महाराष्ट्रातील नाणेघाट ही खगोलप्रेमींची आवडती जागा आहे. शिवकाळातही अनेक खगोलीय घटनांचा उल्लेख समकालीन साहित्यात करण्यात आला आहे. त्यात ग्रहण आणि धुमकेतू दिसल्याचे उल्लेखदेखील आहेत. या सर्व घटना मोहन आपटे यांच्या खगोलीय शिवकाल या पुस्तकात नमूद करण्यात आल्या आहेत. जसे नाणेघाटच्या माथ्यावरून कळसुबाई शिखरापासून ते भिमाशंकरपर्यंतचा डोंगरी पसारा अनुभवता येतो तसेच अंधाऱ्या रात्री आभाळात डोळ्यांचे पारणे फेडणारी आकाशगंगा अनुभवता येते.(Galaxy)
नाणेघाटहुन फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यात गिर्यारोहकांसाठी आणि खगोलप्रेमींसाठी आकाशगंगा पाहण्याची एक पर्वणीच असते. नाणेघाट किंवा त्याच्यासमोरील जीवधन किल्ल्यावरून चांगल्या वातावरणात आपल्याला आकाशगंगा सहजरित्या दिसते. विशेष म्हणजे अमावास्येला रात्री दिसणारी आकाशगंगा सर्वात जास्त सुखद अनुभव देणारी असते. आता सर्वप्रथम आकाशगंगा म्हणजे काय आणि तिचं महत्त्व काय, हे समजण गरजेचं आहे.(Marathi News)
आकाशातलं रहस्य मानवासाठी नेहमीच कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. आदिमानवाने सर्वांत पहिल्यांदा आकाशगंगेकडे पाहिले असेल, तेव्हा त्याच्या मनातही असंख्य प्रश्न निर्माण झाले असतील. याच कारणाने आपल्या पूर्वजांनी तारकांच्या विश्वाचा अभ्यास सुरू केला. पण आजच्या प्रगत काळातील आकाशगंगा पाहणाऱ्या मानवाला तिच्या रहस्याचं फारसं कुतूहल राहिलेलं नाही. खगोलविश्वात रस असणारे किंवा वैज्ञानिकच त्याला अपवाद ठरतात. आकाशगंगा म्हणजे अब्जावधी ताऱ्यांच्या आणि ग्रहांचा एक समूह आहे. ज्यामध्ये सूर्य हा G क्लास प्रकारात मोडणारा एक अत्यंत लहानसा तारा आहे आणि त्याच्याभोवती घिरट्या घालणारी आपली सूर्यमाला ! उदाहरण द्यायचं झालं तर आपण आपल्या घरात राहतो, आपलं घर चाळीत आहे, चाळ एका विभागात आहे, विभाग एका शहरात आहे, शहर एका राज्यात आहे, राज्य एका देशात आहे, देश एका खंडात आहे, खंड पृथ्वीवर आहे, पृथ्वी सूर्यमालेत आहे, सूर्यमाला आंतरतारकीय क्षेत्रात आहे आणि हे क्षेत्र आपल्या आकाशगंगेत आहे. विशेष म्हणजे अशा अब्जावधी आकाशगंगा या अलौकिक ब्रह्मांडात भ्रमण करत आहेत. (Galaxy)
================
हे देखील वाचा : Rajasthan : राजस्थानी बोरं सफरचंदापेक्षा महाग !
================
मानवाच्या दृष्टीला दिसणारी आपली ही बलाढ्य आकाशगंगा या ब्रह्मांडाच्या तुलनेत मात्र फारच लहान आहे. आपल्या सर्वात जवळची आकाशगंगा म्हणजे अँड्रॉमेडा किंवा देवयानी, जी आपल्या आकाशगंगेपासून २२ लाख प्रकाशवर्ष दूर आहे. जगातील अनेक काळोख्या किंवा निरभ्र आकाश असलेल्या भागांमधून आकाशगंगेचा तारकांनी भरलेला पट्टा सहज दिसतो. भारतात आकाशगंगेला मंदाकिनी, स्वर्णगंगा, स्वर्नदी, सुरनदी, आकाशनदी, देवनदी, नागवीथी, हरिताली अशी अनेक नावं आहेत. आपल्या पूर्वजांनी आकाशात तारकांचे ८८ समूह केले होते. यातील हंस, वृषपर्वा, देवयानी, ययाती, ब्रह्महृदय, पुनर्वसू, मृग, नौका, वृश्चिक, धनु आणि गरुड या तारकासमूहांमधून आपली आकाशगंगा पसरत गेली आहे. आकाशगंगेच्या केंद्रापासून सूर्य २७ हजार प्रकाशवर्ष दूर आहे. (Galaxy)
जीवधन किल्ल्याच्या पायथ्याशी घाटघर गावात राहणारे सुभाष अढारी यांनाही खगोलीय गोष्टी आणि जैवविविधतेचे कुतूहल आहे. कित्येक खगोलप्रेमींनी या ठिकाणाहून टिपलेले आकाशगंगेचे छायाचित्र त्यांच्या घराच्या भिंतींवर लावलेले आहेत. काही पर्यटकांना आणि गिर्यारोहकांना राजगड आणि हरिश्चंद्रगडावरूनही आकाशगंगेचं दर्शन घडलं आहे. सह्याद्री आणि आकाशगंगेचं हे नातं आजही अबाधित आहे. सह्याद्रीतून दिसणारं हे खगोलविश्व अनुभवण्याची संधी पुन्हा पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राहणाऱ्या पर्यटकांनो आणि गिर्यारोहकांनो नाणेघाटहुन आकाशगंगा पाहण्याची ही संधी कधीही चुकवू नका.