निरोगी आणि उत्तम आरोग्य सगळ्यांनाच पाहिजे असते. मात्र आपले आरोग्य टिकवण्यासाठी आपल्याला प्रयत्न देखील करावे लागतात. पोषक आणि सकस आहार आणि त्या जोडीला थोडा व्यायाम. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात या दोन्ही गोष्टी करण्यासाठी लोकांकडे अजिबातच वेळ नाही. भूक भागवण्यासाठी मिळेल ते खाणे आणि कामाच्या व्यापामुळे वेळ न मिळाल्याने व्यायाम न करणे हेच सगळ्याचे दैनंदिन जीवन झाले आहे. मात्र खरंच हे आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी चांगले आहे का?
रोज स्वतःसाठी जास्त नाही पण किमान अर्धा तास वेळ काढलाच पाहिजे. आणि एकदम डाएट फूड नाही किमान घरचे सकस आणि त्यातल्या पोषक जेवण जेऊन बाहेरचे खाणे टाळले पाहिजे. यातही अनेक लोकं म्हणतील आम्हाला तरीही वेळ नाही. जेवण घरचे करू पण आमच्याकडून व्यायाम होत नाही आणि होणारही नाही. अशा लोकांसाठी किंबहुना सर्वांसाठीच चालणे हा अतिशय सोपा, सहज होणारा, विनाखर्चिक आणि कष्टरहित व्यायाम आहे.
रोज किमान ३० तर ४५ मिनिटे चालल्याने तुम्हाला उत्तम आरोग्य प्राप्त होईल आणि इतर कोणताही व्यायाम करण्याची गरज देखील भासणार नाही. दररोज न चुकता चालणे हा अतिशय कमालीचा व्यायाम आहे. चालण्याने अनेक लाभ आपल्या शरीराला होतात. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीने विशिष्ट वेळ चाललेच पाहिजे. दिवसभरात भरपूर चालल्याने आपल्या सर्वांगाचा व्यायाम होतो. चालण हे निरोगी शरीर आणि मनासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.
रोजच्या धावपळीत तासंतास जिममध्ये जाऊन कसरत करणे कठीण जाते अशा परिस्थितीत चालणे हा कमी प्रयत्नात स्वतःला निरोगी ठेवण्याचा एक मार्ग आहे. जिममध्ये जाऊन अनेक तास व्यायाम करण्यापेक्षा काही मिनिटे चालण्याने शरीराला जिममध्ये व्यायाम केल्याइतकेच फायदे होतात. नक्की किती मिनिटे आपण चालणे आवश्यक असते. याबद्दल लोकं अनभिज्ञ असतील चला मग जाणून घेऊया वयानुसार प्रत्येकाने किती मिनिटे चालणे आवश्यक असते?
१८ ते ३० वर्षे (१२००० पावले)
तरुण आणि प्रौढांमध्ये उच्च ऊर्जा पातळी आणि स्नायूंची ताकद असते. त्यामुळे ते दररोज ३० ते ६० मिनिटे वेगाने चालू शकतात.
३१ ते ५० वर्षे (११००० पावले)
वयाच्या ३१ ते ५० व्या वर्षी तुम्ही दररोज ३० ते ४५ मिनिटे चालले पाहिजे. नियमित चालल्याने वजन नियंत्रणात राहण्यास, स्नायू मजबूत ठेवण्यास आणि जुनाट आजारांपासून बचाव तसेच मानसिक दृष्ट्या निरोगी राहण्यास मदत होते.
५१ ते ६५ वर्षे (११००० पावले)
५१ ते ६५ वर्ष वयोगटातील लोकांसाठी दिवसातून ३० ते ४० मिनिटे चालणे चांगले आहे. मध्यम वयात शरीरातील नैसर्गिक बदलांमुळे लोकांना स्नायू कमकुवत आणि चयापचय कमी झाल्यासारखे वाटू लागते आणि यासाठी चालणे खूप महत्त्वाचे आहे.
६६ ते ७५ वर्षे (८००० पावले)
वृद्धांसाठी दिवसातून सुमारे २० ते ३० मिनिटे चालणे खूप महत्त्वाचे आहे. या वयात चालणे वृद्धांची ऊर्जा टिकवून ठेवून हृदयाशी संबंधित आजार टाळता येतात.
- दररोज चालण्यामुळे स्नायू आणि हाडे मजबूत होतात. हृदयविकार, पक्षाघात, उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो. शिवाय आपल्या शरीरातील कॅलरीज बर्न होतात आणि वजन कमी होते. हाडे मजबूत होतात आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो. यासोबतच चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. दररोज चालण्यामुळे तणाव आणि चिंता कमी होत झोपेची गुणवत्ता सुधारते.
(टीप : ही माहिती केवळ वाचनासाठी आहे. कोणतेही उपाय करताना तज्ज्ञ लोकांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या)