Home » माधुर्याचा राजा

माधुर्याचा राजा

by Correspondent
0 comment
VVS Laxman | K Facts
Share

वाचकहो शीर्षक वाचून आपल्याला निश्चितच असे वाटेल की मी फळांचा राजा आंब्याविषयी बोलत आहे. काहींना असेही वाटेल की मी संगीतातल्या माधुर्याचा रसास्वाद आपल्याला देऊ इच्छितो. पण आपल्या कल्पनाशक्तीला अधिक ताण न देता मी स्पष्ट करू इच्छितो की मी क्रिकेटमधील एका माधुर्याचे रसग्रहण आपल्यासमवेत करत आहे.
ओळखलं का ??

नाही ना, पण नाव वाचलं तर आपण आपल्यालाच म्हणाल की मला कसं हे आठवले नाही. हे नाव आहे वांगीपुराप्पू वेंकट साई लक्ष्मण. आता आपल्या लक्षात आले असेल की अरे हाच तो आपला व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण.
१ नोव्हेंबर हा लक्ष्मणचा जन्मदिन. त्याच्या ४७ व्या वाढदिवसानिमित्त त्याला मनापासून शुभेच्छा.

Happy Birthday VVS Laxman
Happy Birthday VVS Laxman

लक्ष्मणचा (VVS Laxman) जन्म अतिशय सुसंकृत उच्चविद्याविभूषित घरात झाला. त्याचे आई वडील व्यवसायाने डॉक्टर आहेत. स्वतः लक्ष्मण सुद्धा अतिशय बुद्धिमान आहे. तो १२ विच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत आला होता. क्रिकेटवरील अत्यंतिक प्रेमामुळे त्याने वैद्यकीय शिक्षणाऐवजी क्रिकेट हेच आपले करियर निवडले.

१९९६ मध्ये भारताला मिळालेल्या राहुल द्रविड, सौरव गांगुली या हिऱ्यांच्या कोंदणातील तिसरा हिरा. १९ वर्षाखालील संघात संदीप पाटीलने हेरलेले हे रत्न विश्वनाथाच्या निवड समितीने भारतीय संघाला प्रदान केले. संदीप पाटील खरा रत्नपारखी. त्याने स्वकीयांची टीका सहन करून मुंबईच्या अमोल मुझुमदारपेक्षा हैद्राबादच्या लक्ष्मणला पसंती दिली.

वयोगट संघातील कामगिरीच्या जोरावर लक्ष्मणने रणजी, दुलीप च्या पायऱ्या झपाट्याने पार करत कसोटीचे दार ठोठावले. १९९६ मध्ये भारतात झालेल्या दक्षिण  आफ्रिकेच्या मालिकेत लक्ष्मणला कसोटीचे दरवाजे खुले झाले. पदार्पणातच अर्धशतक ठोकून त्याने आपली चुणूक दाखवली ती अॅलन डोनाल्डसमोर. त्यानंतर मात्र त्याचा प्रवास जरा खडतरच होता.

लक्ष्मणाला मधल्या फळीत जागा नसल्याने बळजबरीने सलामीवीर बनवण्यात आले. तो जातिवंत मधल्या फळीतील फलंदाज असल्याने ही नवी भूमिका निभावणे त्याला जड गेले. पण अझरुद्दीन असेपर्यंत इलाज नव्हता. तरीसुद्धा १९९८ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतातील मालिकेत कोलकत्ता कसोटीत त्याने सलामीला येऊन ९५ धावा काढून सिद्धूबरोबर शतकी सलामी दिली.

त्याच्या पहिल्या १६ कसोटीतील सरासरी केवळ २४ च्या आसपास होती. त्याला त्याचे पूर्वसुरी अशोक मंकड व अंशुमन गायकवाड या मूळ मधल्या फळीतील, पण संघाची गरज म्हणून सलामीवीर बनलेल्या खेळाडूंची कसोटी कारकीर्द कशी अल्पजीवी ठरली ते माहित होते. तो ठाम राहिला आणि त्याने मधल्या फळीतच खेळण्याचा आग्रह धरला.

१९९९ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला चांगला सूर गवसला होता पण तशा धावा होत नव्हत्या. शेवटी सिडनी कसोटीत सलामीला येऊन त्याने ब्रेट ली, मॅकग्रा, वॉर्न याना चोपून काढत १६७ धावा ठोकल्या आणि सचिन व्यतिरिक्त ढेपाळलेल्या भारतीय फलंदाजीत नव्याने घुगधुगी निर्माण केली. ही खेळी त्याच्या कारकिर्दीला कलाटणी देणारी ठरली. त्याचा एकदिवसीय मालिकेत ऐनवेळी समावेश करण्यात आला.

यानंतरचे २००१ मधील इडन गार्डन वर ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावलेले द्विशतक (२८१) ही भारतीय क्रिकेट इतिहासातील आख्यायिका आहे. भारताला फॉलो ऑन मिळाल्यावर लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांनी जो चमत्कार घडवला त्याचे वर्णन करताना शब्द अपुरे पडतील. लक्ष्मणची ही एकच खेळी त्याच्या एक तपाहून अधिक कसोटी कारकिर्दीचे सार आहे. पहिल्या डावात ५९ धावांवर  सदोष पंचगिरीमुळे बाद झालेला लक्ष्मण दुसऱ्या डावात तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आला आणि काय खेळलाय?

त्याने ४४ चौकारांची बरसात केली. वॉर्नला लेग स्टंप च्या बाहेर टप्प्यावर उचलून ऑफला मारलेले उंच ड्राइव्हस अचंबित करणारे होते. आखूड टप्प्याचे चेंडू पूल व कट केले तर ओव्हरपीच चेंडूना दिमाखदार ड्राईव्हस मारले .शेन वॉर्न, मॅकग्रा, गिलेस्पी, कास्प्रोव्हिच आपला टप्पा विसरले. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या न्यायाने त्याने कमीतकमी ताकदीचा वापर करून चेंडूच्या वेगाचा उपयोग करून चेंडूला नुसती दिशा देऊन अनेक चौकार मिळवले. यू ट्यूब वर ही खेळी परत परत पाहत असताना कंटाळा येत नाही. या अजरामर डावाच्या जोरावर भारताने पारडं फिरवले आणि सामना जिंकला व त्यापुढचा चेन्नई चा चुरशीचा सामना जिंकून मालिकाही जिंकली.

लक्ष्मण एकूण १३४ कसोटी सामने खेळला त्यात ४५.९७ च्या सरासरीने ८७८१ धावा काढल्या. त्याने १७ शतके आणि ५६ अर्धशतके काढली. नऊ शतके परदेशात मारली त्यातील चार ऑस्ट्रेलियात. सिडनीचे दोन सामने वगळता लक्ष्मणने मारलेल्या इतर १५ शतकांमुळे भारत अपराजित राहिला.

२००३-०४ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऍडलेड येथे राहुल द्रविडबरोबर त्रिशतकी भागी करताना त्याने भारताला ४ बाद ८० अशा अवस्थेतून सावरले होते. त्याच्या १४८ व राहुलच्या २३३ धावांमुळे सामन्याचे चित्र पालटले व भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.

ऍडलेड नंतर सिडनी कसोटीत त्याने १७८ धावा काढताना सचिन बरोबर त्रिशतकी भागी रचली आणि भारताने त्या वेळची उचांकी धावसंख्या ७ बाद ७०५ नोंदवली.

२००४ मध्ये ऑस्ट्रेलियन संघ भारताच्या दौऱ्यावर आला. पाहुण्यांनी दोन सामने जिंकून मालिका खिशात टाकली पण मुंबईच्या तुटलेल्या खेळपट्टीवर दुसऱ्या डावात लक्ष्मणने आक्रमक ६९ धावा काढल्या आणि ऑस्ट्रेलियाला ९३ धावात गुंडाळून भारताने १३ धावानी निसटता विजय मिळवला.

२००७-०८च्या मालिकेत सिडनी ला त्याने पुन्हा एक शतक नोंदवले पण भारत अखेरच्या क्षणी सामना हरला. पण पर्थ च्या कसोटीत दुसऱ्या डावात त्याने उत्कृष्ट ७९ धावांची खेळी केली आणि भारताला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका वठवली.

२००९ मध्ये न्यूझीलंड मध्ये नेपियर कसोटी वाचवताना गंभीरने दुसऱ्या डावात खेळपट्टीवर नांगर टाकला होता. त्याच्याबरोबर लक्ष्मणने नाबाद १२४ धावा केल्या. हा सामना वाचवल्याने भारताने ती मालिका जिंकली. २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली येथे अशक्य वाटणारा विजय त्याने इशांत शर्मा व प्रज्ञान ओझा या गोलंदाजांना साथीला घेऊन खेचून आणला. लक्ष्मण यावेळी तंदुरुस्त नव्हता. तो सुरेश रैनाला रनर घेऊन खेळला. आठ बाद १२४ वरून त्याने २१६ धावांचे विजयी लक्ष्य गाठून दाखवले. त्याने वैयक्तिक नाबाद ७३ धावा काढल्या. शेवटी गोंधळलेल्या प्रज्ञान ओझाला रागे भरून विजयी धावेसाठी पळायला लावले.

श्रीलंकेत २०१० ची मालिका बरोबरीत सोडवताना त्याने अखेरच्या कसोटीत नाबाद १०३ धावा काढल्या आणि संघाला ५ गडी  राखून विजय मिळवून दिला. श्रीलंकेत चौथ्या डावात २०० धावा काढणे किती दुरापास्त असते याची सर्वाना कल्पना आहे.

२०१०-११ च्या दक्षिण आफ्रिकेतील डर्बनच्या दुसऱ्या कसोटीत दुसऱ्या डावात त्याने काढलेल्या ९६ धावांची  किंमत शतकापेक्षाही मोठी होती कारण गोलंदाजांना साथ देणाऱ्या या खेळपट्टीवर टिकून राहणे हेच दिव्य होते. भारताने हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवली. लक्ष्मणचे वैशिष्ट्य म्हणजे तो कसोटीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या डावात अधिक यशस्वी ठरला .

लक्ष्मणने खेळलेल्या १३४ कसोटींपैकी भारत ४७ सामन्यात विजयी झाला तर ४१ सामन्यात पराभूत झाला. उरलेले सामने अनिर्णित राहिले. विजयी सामन्यातील लक्ष्मणची सरासरी ५५ च्या आसपास होती तर पराभूत झालेल्या सामन्यात त्याची सरासरी २५ च्या जवळपास होती. यावरून लक्ष्मणचे भारतीय विजयातील योगदान स्पष्ट होते.

लक्ष्मण हा एक उत्कृष्ट क्लोज इन क्षेत्ररक्षक होता ही बाब कोणी फारसे बोलत नाही. त्याने १३५ झेल घेतले. कुंबळेच्या गोलंदाजीवर त्याने २६ झेल पकडले. स्लिप मध्ये द्रविड व लक्ष्मण ही जोडगोळी असे व कित्येकदा दोघांपैकी कोणी झेल घेतला हे लगेच समजत नसे. लक्ष्मणने एक दिवसीय सामन्यात सुद्धा छाप पाडली आणि सहा शतके ठोकली त्यातील चार ऑस्ट्रेलियाविरुद्ध होती. मात्र धावा पळण्यातील चापल्य कमी पडल्याने तो एकही विश्वचषक स्पर्धा खेळू शकला नाही.

२०११ चा ऑस्ट्रेलिया दौरा द्रविडप्रमाणेच लक्ष्मणसाठी अपयशी ठरला आणि दोघांची ती अखेरची मालिका ठरली. भारतातील न्यूझीलंड मालिकेसाठी त्याला संघात निवडले होते मात्र त्याला हैदराबादच्या घरच्या मैदानावर शेवटचा सामना खेळण्याची इच्छा होती ती फलद्रुप झाली नाही. आंब्यासारखा गोड लक्ष्मण धोनीसाठी मात्र शेवटी आंबट ठरला.

लक्ष्मणची सहजसुंदर फलंदाजी बघणे हा नेत्रसुखद सोहळा होता. आपण नेहमी फटक्यांच्या टाइमिंगचा उल्लेख करतो पण लक्ष्मणच्या बाबतीत बॅट चेंडूच्या जवळ नेण्याचे टाईमिंग हीच खासियत होती. त्याचे फटके एवढे मुलायम असत की चेंडू तर सोडाच पण मैदानावरील गवताला सुद्धा इजा होऊ नये याची तो काळजी घेतो की काय असे वाटायचे. तो सर्व प्रकारचे फटके मारत असे.

निवृत्तीनंतर त्याने क्रिकेट समालोचक म्हणून सुद्धा यशस्वी कारकीर्द घडवली आहे आणि आपल्या रसाळ वाणीने श्रोत्यांचे मन जिंकले आहे.

– रघुनंदन भागवत
(लेखक क्रीडा अभ्यासक आहेत)

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.