रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन ४-५ डिसेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. भारताचा मित्र देश म्हणून रशियाला ओळखले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतिन यांची मैत्रीही खास आहे. पुतिन यांच्या स्वागतासाठी दिल्लीमध्ये अनेक कार्यक्रम होत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांच्या सन्मानार्थ रात्रीच्या जेवणाचे आयोजन करणार आहेत. २०२१ नंतर पहिल्यांदाच व्लादिमीर पुतिन भारताच्या दौ-यावर येत आहेत. पुतिन यांचा हा दौरा भारतासाठी महत्त्वाचा आहे. अमेरिकेच्या टेरिफ कार्डाचा भारतावर दबाव असतांना पुतिन यांनी भारताला साथ दिली आहे. त्यामुळे या दौ-यात रशियन कच्च्या तेलावर चर्चा होणार आहे. शिवाय रशिया आणि भारत यांच्यातील अणुऊर्जा, तंत्रज्ञान आणि व्यापार या क्षेत्रातील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला जाईल. (Vladimir Putin)

या सर्वात ७३ वर्षीय व्लादिमीर पुतिन यांच्या या दौ-यावर अमेरिकेचेही लक्ष असणार आहे. भारतानं अफगाणिस्तानसोबत वाढवलेली मैत्री ही अमेरिकेसाठी त्रासदायक आहे. असे असतांना आता भारत आणि रशिया यांच्यातील मैत्रीचे नवे पर्व या दौ-यापासून सुरु होणार आहे. या सर्वात व्लादिमीर पुतिन आणि त्यांचे किस्से पुन्हा चर्चेत आले आहेत. व्लादिमीर पुतिन हे माजी केजीबी अधिकारी आहेत. १९७५ मध्ये केजीबीसाठी पुतिन यांनी काम करण्यास सुरुवात केली आणि १९९१ मध्ये सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर राजकारणात प्रवेश केला. १९९९ मध्ये पुतिन रशियाचे पंतप्रधान आणि २००० मध्ये राष्ट्राध्यक्ष झाले, या सर्व प्रवासात पुतिन यांचे अनेक किस्से सर्वमुखी झाले. गेली पंचवीस वर्ष रशियाचे राष्ट्राध्यक्ष असलेले पुतिन यांच्या मनात काय चालले आहे, याचा थांगपत्ता कुणालाही लागत नाही. (International News)
भारतासोबतच्या मैत्रीसाठी अनेकवेळा त्यांनी नियम बाजूला सारले आहेत, त्यामुळेच या सच्चा मित्राचे स्वागत करण्यासाठी राजधानी दिल्ली सज्ज होत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन ४ डिसेंबर रोजी भारताच्या दौ-यावर येत आहेत. त्यांचा हा दौरा भारताच्या धोरणात्मक स्वायत्ततेचे संकेत देतो. पुतिन यांनी २०२१ मध्ये शेवटचा भारत दौरा केला होता. या दौ-यामुळे पुतिन यांचा सर्वच प्रवास पुन्हा चर्चिला जात आहे. एक गुप्तहेर रशियाचा सर्वात शक्तिशाली व्यक्ती कसा बनला, हेही जाणण्यासारखे आहे. पुतिन गेल्या २५ वर्षांपासून रशियामध्ये सत्ता सांभाळत आहेत. त्यांच्याकडे रशियाची सत्ता आली, तोही एक किस्ता आहे. ३१ डिसेंबर १९९९ रोजी, रशियाचे तत्कालीन अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांनी अचानक राजीनामा देण्याची घोषणा करत सर्वांना आश्चर्यचकित केले. (Vladimir Putin)
रशियाला नवीन नेत्यांची, नवीन चेहऱ्यांची, नवीन उर्जेची गरज असल्याचे सांगून येल्त्सिन यांनी राजीनामा दिला. या काळात रशिया कम्युनिस्ट अर्थव्यवस्थेतून खुल्या बाजारातील अर्थव्यवस्थेत बदलत होता. हा आर्थिक बदल होत असतांना या देशात मोठी राजकीय उलथापालथही होत होती. येल्त्सिन यांनी राजीनामा दिल्यावर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून व्लादिमीर पुतिन यांनी कार्यवाहक अध्यक्ष म्हणून त्यांचे पहिले टेलिव्हिजन भाषण दिले. या पहिल्याच भाषणात रशियन नागरिकांना त्यांच्या राष्ट्रप्रेमाची कल्पना आली. या भाषणात पुतिन यांनी कायद्याच्या मर्यादा ओलांडण्याचे आणि रशियन संविधानाचे उल्लंघन करण्याचे प्रयत्न कठोरपणे दडपले जातील, हा इशारा दिला, आणि रशियन नागरिकांचे मन जिंकले. कारण हा नेता आपल्या देशातील भ्रष्ट्राचार संपवून देशाला सुबत्ता आणेल हा विश्वास जनतेला वाटला. (International News)
इथेच पुतिन अर्धी लढाई जिंकले होती. केजीबी या गुप्तहेर संघटनेचा हा एजंट कार्यवाहक अध्यक्ष झाल्यापासून रशियाच्या शेजारी राष्ट्रांमध्येही दहशत निर्माण झाली. त्याचवर्षी चेचन्याशी सुरू असलेल्या युद्धात पुतिन यांच्या भुमिकेला अवघ्या रशियानं पाठिंबा दिला. मार्च २००० मध्ये झालेल्या निवडणुकीत त्याचा लाभ मिळून व्लादिमीर पुतिन यांना पहिल्या फेरीत ५३ टक्के मते मिळाली आणि पुतिन रशियाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. ज्युडोमध्ये ब्लॅक बेल्ट असलेले पुतिन गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरले. पुतिन हे कट्टर राष्ट्रप्रेमी आहेत. व्लादिमीर पुतिन यांचा जन्म दुसऱ्या महायुद्धानंतर सात वर्षांनी १९५२ मध्ये झाला. त्यावेळी लेनिनग्राडला वेढा होता आणि त्यानंतर झालेल्या वेढ्यात त्याचा मोठा भाऊ मरण पावला. घरची स्थिती अत्यंत सामान्य होती. त्यांचे लहानपण सेंट पीटर्सबर्ग येथे गेले. (Vladimir Putin)
पूर्वी लेनिनग्राड म्हणून ओळखले जात असे. झार पीटर द ग्रेट यांनी स्थापन केलेले हे शहर पाश्चात्य प्रभावाखाली होते. या सर्वांचा पुतिन यांच्यावर बालमनावर परिणाम झाला. देश सर्वोपरी ही भावनाही त्यांच्या मनात याच शहरामुळे पक्की झाली. १९६८ मध्ये आलेल्या “द शील्ड अँड द स्वॉर्ड” या चित्रपटाने त्यांना केजीबीमध्ये सामील होण्याची प्रेरणा मिळाली. हा चित्रपट दुसऱ्या महायुद्धादरम्यान एका रशियन एजंटच्या कथेवर आधारित होता. पुतिन यांनी विद्यापीठात शिक्षण घेत असतानांच केजीबीमध्ये प्रवेश मिळवला, आणि पुढची १६ वर्ष एक गुप्तहेर म्हणून कामगिरी केली. बर्लिनची भिंत पडल्यावर पुतिन रशियात परतले आणि त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. (International News)

आता पुतिन २५ वर्षांहून अधिक काळ रशियामध्ये सत्तेत आहेत. सोव्हिएत शासक जोसेफ स्टॅलिननंतर कोणत्याही नेत्याचा हा सर्वात मोठा कार्यकाळ आहे. या कार्यकाळात पुतिन यांच्याबाबत अनेक किस्से प्रसिद्ध झाले आहेत. व्लादिमीर पुतिन किंवा त्यांच्या धोरणांना विरोध करणाऱ्या व्यक्तींचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू होतो, असे सांगण्यात येते. यामध्ये माजी रशियन खासदार डेनिस व्होरोनेन्कोव्ह, रशियाचे उपपंतप्रधान बोरिस नेमत्सोव्ह, प्रख्यात रशियन उद्योगपती आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे विरोधक बोरिस बेरेझोव्स्की, मानवाधिकार आयोगाचे वकील स्टॅनिस्लाव मार्केलोव्ह, वकील सर्गेई मॅग्निट्स्की, सामाजिक कार्यकर्त्या अँना पोलिटकोव्स्काया, माजी केजीबी एजंट अलेक्झांडर लिटव्हिनेन्को, रशियन सैन्याचे कर्नल सर्गेई, पत्रकार आणि लेखक युरी सेकिवोचकिन यांचा समावेश आहे. या सर्वांच्या झालेल्या संशयास्पद मृत्यूला पुतिन यांना जबाबदार धरण्यात आले. (Vladimir Putin)
========
हे देखील वाचा : Venezuela : अमेरिका व्हेनेझुएला मधला तणाव युद्धाच्या वाटेवर…
========
मात्र यामुळे पुतिन यांच्या लोकप्रियतेवर कुठलाही परिणाम झाला नाही. गेल्या साडेतीन वर्षाहून अधिक काळ सुरु असलेल्या युक्रेन युद्धामुळेही पुतिन यांची रशियावरची पकड कमजोर होईल, अशी आवई उठली होती. मात्र पुतिन सर्व विरोधकांना पुरून उरले. याच युद्धाच्या काळात त्यांना भारताला कच्चा तेलाचा पुरवठा चालू ठेवला. आता त्यांच्या या दौ-यामध्ये भारतीय बनावटीच्या विमानांवरही चर्चा होणार आहे. शिवाय भारताला अन्य कुठल्या क्षेत्रात व्यापाराची संधी खुली होणार याचीही प्रतीक्षा आहे. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
