मुंबई पुण्यातील गणपतीबरोबरच भव्य आरास , सजावट आणि उत्तम नियोजन यासाठी राज्यभरात ओळख निर्माण करणाऱ्या विट्याचा राजाचे आयोजन यंदा साधेपणाने करण्यात येणार आहे. गणेशोत्सव मंडळाने याबद्दल निर्णय घेतला असून मंडळाचे संस्थापक अमोल बाबर यांनी याबद्दल माहिती दिली.

नगरसेवक अमोल बाबर आणि सांगली जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला ‘विट्याच्या राजा’ पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान बनला आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून त्याची सर्वदूर ख्याती आहे. मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन विटा येथे करण्यासाठी विट्याच्या राजाची ओळख आहे. याचबरोबर भव्य सजावट हे या मंडळाचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते.
मुंबईच्या लालबाग गणेश मंडळाच्या मूर्तीचे मूर्तिकार संतोष कांबळे हेच विट्याच्या राजाची मूर्ती बनवतात. गतवर्षीची लालबागच्या राजाच्या मूर्तीची प्रतिकृती विट्याच्या राजाला बनवून मिळते. प्रसिद्ध कला दिग्दर्शक योगेश शेळके यांच्या संकल्पनेतून दरवर्षी विट्याच्या राजासाठी मुंबई-पुण्यालाही मागे टाकेल असा भव्य देखावा केला जातो. १०० कलाकार मेहनत घेऊन दरवर्षी हा देखावा साकारतात. याचबरोबर आकर्षक रोषणाई, ढोल ताशा पथकाचे सादरीकरण यामुळे सर्वत्र विट्याचा राजा ओळखला जातो.
मात्र यंदाच्या वर्षी साधेपणाने यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या अादेशाप्रमाणे गर्दी टाळून व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. यंदा मंडळ ४ फुटाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करणार आहे. यावेळी डेकोरेशनसह मिरवणूक काढली जाणार नाही, मोजक्या मंडळाच्या सदस्यांच्या उपस्थित आरती व पूजा केली जाणार आहे असे मंडळाच्या वतीने ठरवण्यात आले आहे.
विशेष म्हणजे सर्व भाविकांना विट्याचा राजाचे दर्शन मिळावे यासाठी सर्व भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच यानिमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे संस्थापक अध्यक्ष अमोल बाबर यांनी सांगितले.