थंडीचे दिवस सुरु झाले की, वेध लागतात ख्रिसमसचे आणि न्यु इयरचे. थंडीच्या दिवसात हे दोन मोठे सण साजरे केले जातात. या काळात सुट्ट्या देखील बऱ्याच मिळतात. ज्यांना सुट्ट्या मिळत नाही ते थंडीच्या दिवसात फिरायला जायचे म्हणून वर्षभर सुट्ट्या वाचवतात. गुलाबी थंडीमध्ये थंडीच्याच ठिकाणी फिरायला जाण्यामध्ये एक वेगळीच मजा आणि एक वेगळाच आनंद असतो. मात्र जर तुम्ही या थंडीच्या दिवसांमध्ये थंडी एन्जॉय करण्यासाठी मस्त आणि बजेटमधली ठिकाणं शोधत असाल तर हा लेख नक्कीच तुमच्यासाठी आहे. चला जाणून घेऊया या दिवसात तुम्ही कोणत्या ठिकाणी फिरायला जाऊ शकतात.
गुलमर्ग
भारताचे स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील गुलमर्ग नक्कीच एक उत्तम आणि बेस्ट पर्याय आहे. इथला हिमवर्षाव पाहण्यासाठी असंख्य पर्यटक देशविदेशातून गुलमर्गला येतात. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये येथील तापमान -४°C आणि -११°C दरम्यान असते. ज्यामुळे तुम्ही येथे बर्फवृष्टीचा आनंद देखील घेऊ शकता. याशिवाय इथे जवळ अनेक नेत्रदीपक स्थळ आहेत. सोबतच गुलमर्गमध्ये स्कीइंग, स्नोबोर्डिंग आणि गोंडोला राईड करता येते.
पहलगाम
जम्मू-काश्मीरला भेट देण्यासाठी पहलगाम हे सर्वोत्तम ठिकाण आहे. जर तुम्ही काश्मीरला गेलात आणि पहलगामचे सौंदर्य अनुभवले नाही तर काहीच नाही. पहलगामला येणारा कोणताही पर्यटक हा तेथील निसर्ग सौंदर्याने भारावून जातो. पहलगाममधील बेताब व्हॅली या व्हॅलीमध्ये पाइनची झाडे, बर्फाच्छादित पर्वत आणि सुंदर नद्या आहेत. पहलगामपासून बेताब व्हॅली अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर आहे. शिवाय तुलियन सरोवर बर्फाने झाकलेला असून हे देखील अतिशय सुंदर आहे.
लेह
लेह हे एक सुंदर निसर्गरम्य हिल स्टेशन आहे. नोव्हेंबरपर्यंत हे ठिकाण वंडरलँडमध्ये बदलते. इथून हिमवर्षावाच्या सुंदर दृश्यांचा आनंद घेता येतो. या सुंदर ठिकाणी बर्फाच्छादित शिखरे आणि स्वच्छ निळे आकाश पाहणे अनेक पर्यटकांना आकर्षित करते. पँगॉन्ग त्सो तलाव, नुब्रा व्हॅली, चुंबकीय टेकडी, झंस्कर व्हॅली, हेमिस मठ, लेह पॅलेस आदी अनेक ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकतात.
कुफरी
शिमल्या जवळील कुफरी हे देखील हिमवर्षाव पाहण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. येथे वर्षाच्या शेवटी बर्फवृष्टी पाहायला मिळते. कुफरी हे एक छोटेसे हिल स्टेशन आहे, जिथे तुम्ही याक राइडिंग आनंद घेऊ शकता. हिमालयन नेचर पार्क, फागू, कुफ्री बाजार, जाखू मंदिर, महासू शिखर, इंदिरा टूरिस्ट पार्क आदी स्थळ देखील रमणीय आहेत.
औली
उत्तराखंड राज्यात चामोली जिल्ह्यात औली हे ठिकाण आहे. औलीमध्ये नोव्हेंबरमध्ये हिमवर्षाव सुरू होतो. हे पर्यटन स्थळ स्कीइंग आणि स्नो ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. येथे तापमान -2 डिग्री सेल्सियस इतके कमी होते. येथून सुंदर दृश्यांचा आनंद घेता येतो. येथे अतिशय उंचच उंच बर्फाच्छादित पर्वत असून डोळयांचे पारणे फेडणारे निसर्गाचे सौंदर्य आपल्याला इथे पाहायला मिळते.