अमेझॉनवरील पंचायत वेबसिरीजच्या दुसऱ्या भागानंही आपला क्रम रेटींगमध्ये अव्वल ठेवला आहे. या भागाच्या यशानंतर आता पंचायत वेबसिरीजच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे. पंचायत वेबसिरीजच्या यशाचे सर्व रहस्य त्यातील कलाकारांमध्ये आहे.
फुलोरा गावाभोवती गुंफलेल्या या सिरीजमधले सर्व कलाकार मूळ त्या गावातीलच वाटतात. त्यातलाच एक कलाकार म्हणजे चंदन रॉय (Chandan Roy). फुलोरा गावाच्या सचिवांचा सहाय्यक म्हणून चंदन रॉयची पंचायत वेबसिरीजमधून छोट्या पडद्यावर एन्ट्री झाली. या विकासच्या भूमिकेच्या माध्यमातून चंदन प्रेक्षकांचा लाडका अभिनेता ठरला आहे.
बिहारच्या गावातून आलेला चंदन रॉय (Chandan Roy) आता अन्य वेबसिरीजमध्येही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. बिहारच्या ग्रामीण भागातून सुरु झालेला चंदनचा प्रवास पटना, जेएनयु, पत्रकार ते आता अभिनयाच्या वळणावर स्थिरावलाय.
पंचायत वेबसिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये बिहारच्या ग्रामीण भागातून आलेला चंदन रॉय (Chandan Roy) हा अभिनेता लोकांच्या खास पसंतीस उतरत आहे. चंदन बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील ‘महनार’ या साध्या गावाचा रहिवासी आहे. चंदनला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. त्याची पाठांतर क्षमताही विलक्षण आहे. गावात दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये नाटकं बसवली जायची. आठ वर्षाचा असल्यापासून चंदन या नाटक मंडळांच्या मागे-मागे असायचा. त्यातील प्रत्येक कलाकारांचे संवाद चंदनला माहित असायचे.
पुढे या गोष्टीचा फायदा चंदनला पटना येथील शिक्षणादरम्यान झाला. चंदन उच्च शिक्षणासाठी दिल्लीला, जेएनयूमध्ये दाखल झाला. या सर्वात चंदनचे नाते रंगभूमीबरोबर अधिक जोडले गेले. वास्तविक चंदन रॉय यांचे कुटुंब मध्यमवर्गीय. आर्थिक प्रश्न त्यांच्यासमोर होते. त्यामुळे चंदन यांच्यावर नोकरी करुन कुटुंबाला मदत करण्याची जबाबदारी होती. त्यात त्यांनी दिल्ली येथील एका वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम करायला सुरुवात केली. मात्र त्यांच्यातला कलाकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता.(Chandan Roy)
=====
हे ही वाचा: मणिरत्नमचे हे सर्वोत्कृष्ट चित्रपट तुम्ही पाहिले नसतील तर काय पाहिले, पाहा OTT वर
=====
इकडे चंदन यांच्या गावी असलेली त्यांची आई मुलांनी सरकारी नोकरी करावी म्हणून हट्ट करीत होती. आणि चंदन दिल्लीत राहून बॉलिवूडमध्ये जाण्याची स्वप्न बघत होते. दिड वर्ष नोकरी करुन चंदन यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि मुंबई गाठली. चार महिने वेगवेगळ्या स्टुडीओच्या चकरा लावल्यावर त्यांना एक साईड हिरोचा रोल मिळाला.
========
हे ही वाचा: या आयआयटी इंजिनिअरने अभिनयासाठी सोडली आयटी कंपनीमधली भरमसाठ पगाराची नोकरी
========
या सर्वात दिल्लीमधील नोकरीत साठवलेले पैसे संपले होते. मुंबईमध्ये भाड्याच्या घराचे पैसेही देता येत नव्हते. यात कुटुंबानंही पुन्हा दिल्लीला परत जा, म्हणून घोषा लावला होता. या सर्व संघर्षातच पंचायत या वेबसिरीजसाठी ऑडीशन दिली आणि विकासची भूमिका चंदनला मिळाली. सुरुवातीला ही भूमिका छोटी वाटत होती मात्र चंदन यांनी आपल्या अभिनयातील सहजतेमुळे विकासला प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करुन दिलं. त्यामुळेच पंचायत वेबसिरीजच्या पहिल्या भागापेक्षा दुसऱ्या भागात विकासच्या भूमिकेची लांबी वाढली. आता तिसऱ्या भागात विकासची पत्नी खुशबू सुद्धा दाखवण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे.
या सिरीजमुळे चंदन रॉय (Chandan Roy) यांना ओळख मिळाली. त्यातून त्यांना अनेक नवीन भूमिकाही मिळाल्या आहेत. लवकरच चंदन आपल्याला एखाद्या नवीन वेबसिरीजमध्ये एखाद्या मोठ्या आणि आव्हानात्मक दिसेल यात शंकाच नाही.
– सई बने