राज्यात विधानसभा निवडणुकीची रंगत अगदी अंतिम टप्यात आली आहे. अनेक मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या लढती होत आहेत. दोन प्रमुख पक्षांत फूट पडल्याने या वेळी मतदारसंघातील गणितंही बदलली आहेत. महत्वाचं म्हणजे, अनेक इच्छुकांना यामुळे लढण्याची संधी मिळाली आहे. मतदारसंघात केवळ वन टू वन लढती न होता तिरंगी, चौरंगी लढती होत आहेत. मतदारसंघांचा आढावा आपण गाजावाजाच्या माध्यमातून घेत आहोत. विधानसभेच्या रणधुमाळीत आज आपण पाहाणार आहोत सांगोला विधानसभा मतदारसंघ. सांगोला तालुक्यात महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शेतकरी कामगार पक्ष व महायुतीने शिवसेना पक्षाचे उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीतील दोन उमेदवारीमुळे बिघाडीची चिन्हे निर्माण झाली आहेत. शेकापच्या देशमुखांसह दोन्ही शिवसेनेच्या तालुक्यातील दोन प्रमुख पाटलांनी शड्डू ठोकल्यामुळे तालुक्यातील राजकारणात यंदा तिरंगी लढत होणार हे फिक्स आहे. त्यामुळे हे लढत नेमकी कशी आहे? या लढतीत कोण पुढे आहे? तिरंगी लढत कोणाला फायद्याची ठरणार जाणून घेऊया. (vidhansabha election)
काय झाडी, काय डोंगर आणि काय हाटील, म्हणत राज्यभर प्रसिद्धी मिळवेल्या सेलिब्रिटी आमदार शहाजी बापू पाटील यांचा हा मतदारसंघ. पण हि मतदारसंघाची गेल्या पाच वर्षातील ओळख. त्याआधी शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि दिवंगत गणपत आबा देशमुख यांचा हा मतदारसंघ म्हणून राज्यभर प्रसिद्ध होता. शेतकरी व कामगारांसाठी लढणारा नेता म्हणून तब्बल 11 टर्म या मतदारसंघातून गणपत देशमुख यांनी प्रतिनिधित्व केलं. मात्र, २०१९ मध्ये त्यांनी निवडणुकीच्या लढण्यातून माघार घेतली आणि तिथंच जुने विरोधक शहाजी बापू पाटील यांनी उचल खाल्ली आणि सांगोल्याची आमदारकी मिळवली. गणपत देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांना शाहजी बापूंनी केवळ ८१३ मतांनी धूळ चारली होती. मात्र त्यानंतर शहाजी बापूंनी मतदारसंघात चांगलाच जोर लावला . मोठ्या प्रमाणात निधीही आणला, ज्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीतही दिसून आला. माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांना जिल्ह्यातील सांगोला वळगता माढा,पंढरपूर,करमाळा आणि माळशिरस या 4 मतदारसंघातून लीड मिळालं होतं. सांगोला मतदारसंघातून भाजप महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना मताधिक्य मिळालं. सांगोल्यातून जवळपास 4,500 मतांचा लीड निंबाळकर यांना मिळाला होता. सांगोल्यात शाहजी बापूंमुळेच हा लीड मिळाला, हे वेगळं सांगायला नको. (Political News)
मात्र त्यानंतर एक मोठी उलटफेर झाली आणि शहाजी बापूंपुढे एक मोठं आव्हान निर्माण झालं आहे. शहाजी बापूंना २०१९ मध्ये
साथ देणारे दीपक आबा साळुंखे आता स्वतः निवडणुकीत उतरले आहेत. आजपर्यंत तालुक्यातील माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी कधी शेकाप पक्षाला तर कधी शेकाप विरोधी उमेदवाराला पाठिंबा दिला होता. २०१९ च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून स्वतःचा अर्ज असतानाही साळुंखे-पाटीलांनी आमदार शहाजी पाटलांना पाठिंबा दिला होता. मात्र यावेळी साळूंखे पाटलांनी निवडणुकीच्या अगदी तोंडावर धक्का दिला आहे. या विधानसभा निवडणुकीमुळे प्रथमच माजी आमदार साळुंखे पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत थेट शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश करत उमेदवारी मिळवून त्यांनी शेकाप व शिवसेनेचे विद्यमान आमदार शहाजी पाटील यांना धक्का दिला आहे. शहाजी बापूंना धक्का कारण शहाजी बापू दीपक साळुंखे यांच्या पाठिंब्यानेच, आणि ते हि केवळ ८०० मतांनी निवडून आले होते. शेकापला यासाठी कारण महाविकास आघाडीतून हा मतदारसंघ शेकापला पाहिजे होता. मात्र, उद्धव ठाकरेंच्या सेनेनं हा मतदारसंघ शेवटपर्यंत सोडला नाही आणि दीपक आबांना उमेदवारी मिळाली. दीपक आबा यांनी सुद्धा गेल्या वर्षभर अजित दादांची साथ देत सत्तेचा लाभ घेत आपला गट चांगलाच मजबूत केला आहे. त्यामुळॆ त्यांचं आव्हानही शहाजी बापूंपुढे असणार आहे. मात्र महाविकास आघाडीत अजून एका पक्षाची इथं उमेदवारी आहे. (vidhansabha election)
======
हे देखील वाचा : पनवेल मतदारसंघ कोणाच्या बाजूने?
====
शेतकरी कामगार पक्षानेही आपला उमेदवार इथं उतरवला आहे. शेकापमधून गणपतराव देशमुखांचे दोन नातू. 2019 ची निवडणूक लढवलेले डॉ. अनिकेत देशमुख व पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख, या दोन चुलत बंधूंमध्ये काही वर्षांपासून पक्षांतर्गत वर्चस्ववाद सुरू होता. दोन्ही डॉक्टर बंधू आपल्या कार्यकर्त्यांसह अनेक वेळा वेगवेगळे कार्यक्रम घेत होते.पक्षांतर्गत कार्यक्रम पत्रिकेतील नावावरूनही काही वेळा वाद निर्माण झाला होता. मात्र मग देशमुखांचा अस्त्तिव टिकवण्यासाठी हे दोन्ही भाऊ एकत्र आले आणि बाबासाहेब देशमुखांची उमेदवारी फायनल करण्यात आली. सांगोला हा विधानसभा मतदार संघात मतदार संघात शेतकरी कामगार पक्षाची मोठी ताकद आहे. मागिल निवडणुकीत शेकापचा उमेदवार थोड्या मताने पराभूत झाला होता. दिवंगत गणपतराव देशमुख यांचा हा मतदार संघ आहे. शेकापचा हा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे आता सध्या संपूर्ण तिरंगही लढत या मतदारसंघात आहे. सध्या प्रचारात तरी शहाजी बापू यांनी अगदी घेतल्याचं चित्र आहे. पाठोपाठ उद्धव ठाकरे हेही दीपक आबा साळुंखेंसाठी ताकद लावताना दिसतील. तर बाबासाहेब देशमुख यांच्यामागे गणपतराव देशमुखांना मानणार मोठा वर्ग आहे. त्यामुळॆ तिन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत आणि जो निकाल येईल त्यातही अगदी चुरशीची फाईट असेल हे नक्की. (Political News)